

Animal Behavior Study : समलैंगिक संबंध केवळ मानवापुरते मर्यादित नसून, ते प्राण्यांमध्येही पाहायला मिळतात. मात्र, प्राण्यांमधील अनपेक्षित प्रकाराने संशोधकांनाही अवाक केले आहे. इथिओपियन उच्चभूमीच्या पठारावर 'गेलाडा बॅबून' (गवतावर चरणारी माकडांची प्रजाती) या वन्यजीवांचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या जीवशास्त्रज्ञांच्या पथकाला असाच एक अत्यंत अद्भूत अनुभव आला. त्यांना बैल आणि नर गाढवामध्ये दुर्मिळ असे आंतर-प्रजातीय संबंध पाहायला मिळाले. या अनोख्या आणि थक्क करणाऱ्या घटनेची माहिती वैज्ञानिक नियतकालिका 'करंट बायोलॉजी'मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, जीवशास्त्रज्ञ अभ्यासकांचा ग्रुप इथिओपियन उच्चभूमीच्या पठारावर 'गेलाडा बॅबून' (एक प्रकारची गवतावर चरणारी माकडांची प्रजाती) यांचा अभ्यास करण्यासाठी गेला होता. तिथे बैल आणि नर गाढवाने एकमेकांसोबत लैंगिक क्रिया करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशोधकांनी नोंदवले की, मार्च महिन्यात चार दिवसांच्या कालावधीत, बैलाने (Bos indicus) एकाच नर गाढवाबरोबर ५१ वेळा लैंगिक क्रिया केली. विशेष म्हणजे संशोधकांना असे आढळले की, हे प्राणी एकत्र राहत नव्हते; त्यांचे मालक त्यांना आणि इतर जनावरांना चरण्यासाठी एका सामायिक कुरणात घेऊन येत असत, तेव्हाच ते संपर्कात येत असत.
इटलीतील 'युनिव्हर्सिटी ऑफ पिसा' येथील जीवशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापिका आणि या अभ्यासाच्या वरिष्ठ लेखिका डॉ. एलिझाबेटा पालागी यांनी स्पष्ट केले की, "बैल आणि नर गाढव यांच्यातील संबंधामुळे आमच्यासमोर संशोधनाचा एक पूर्णपणे नवीन प्रश्न उभा राहिला." संशोधनात आढळले की, बैल आणि गाढव एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यात एक वेगळेच आकर्षण दिसून येत असे. या दोन भिन्न 'प्रजातीय' प्राण्यामधील संबंध हे बैल आणि गायींमधील मिलनापूर्वीच्या वर्तनाशी मिळतेजुळते आढळून आले.
ब्रिटनमधील 'युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड'च्या जीवशास्त्र विभागातील उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ डॉ. मॅटिल्डा ब्रिंडल यांनी सीएनएनला (CNN) पाठवलेल्या ईमेलमध्ये नमूद केले आहे की, "अशा प्रकारच्या नोंदी मानवेतर प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या लैंगिक वर्तनाच्या व्याप्तीबद्दलची आपली समज वाढवण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहेत. प्राणीसृष्टीमध्ये पुनरुत्पादनाशी संबंधित नसलेल्या लैंगिक वर्तनाबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे. अशा प्रकारचे वर्तन अगदी विसंगत मानून दुर्लक्षित केले जाते. अशा प्रकारच्या दुर्लक्षित वर्तणुकीच्या व्याप्तीला समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे."
संशोधकांनी समलैंगिक संबंध ठेवणार्या बैलाला ‘अकिली’ आणि गाढवाला ‘पॅट्रोक्लो’ नाव दिले आहे. ही नावे प्राचीन ग्रीक नायक आणि पॅट्रोक्लस यांच्यावरून ठेवण्यात आली आहेत. यांच्यातील घनिष्ठ आणि उघडपणे प्रेमळ संबंधांचे वर्णन होमरच्या ‘इलियड’ (Iliad) या महाकाव्यात आढळते. होमरने त्यांच्या संबंधांचे वर्णन स्पष्टपणे ‘प्रेमी’ असे केलेले नाही, नंतरच्या काळातील प्राचीन लेखकांनी त्यांच्या नात्याचा अर्थ तसा लावला होता.
वैज्ञानिक यापूर्वीही विविध प्रजातींमधील लैंगिक संबंधांच्या अनेक उदाहरणांची नोंद केली आहे. ब्रिंडल यांच्या मते, केवळ नरच नव्हे, तर मादी प्राणीही लैंगिक समाधानासाठी इतर प्रजातींशी संबंध ठेवतात. जपानी मकाक (एक प्रकारची माकड प्रजात) माद्या ‘सिका’ हरणांच्या पाठीवर चढून हस्तमैथुन करतात. हे संबंध परस्पर संमतीचे नसले, तरी हरणे या माद्यांच्या अशा वर्तनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.
संशोधकांनी बैल आणि गाढव यांच्या समलैंगिक संबंधावर भाष्य करताना म्हटले आहे की, दोन्ही प्राण्यांना त्यांच्याच प्रजातीतील आणि दोन्ही लिंगांच्या व्यक्तींसह इतर संभाव्य जोडीदार उपलब्ध होते, तरीही ते प्राधान्याने एकमेकांशीच संबंध ठेवत असत. तसेच भिन्न प्रजातीतील अन्य जोडीदारही निवडला नाही. संशोधकांनी असेही स्पष्ट केले आहे की, "हा अभ्यास एका विशिष्ट जोडीवर आधारित आहे, त्यामुळे अशा प्रकारचे संबंध किती सामान्य आहेत किंवा त्यातून कोणते फायदे मिळतात, हे यावरून निश्चित करता येणार नाही. मात्र, हे एक पद्धतशीरपणे नोंदवलेले उदाहरण असून, प्राण्यांच्या सामाजिक लवचिकतेबाबत अधिक व्यापक प्रश्न उपस्थित करते."