

हिरवळीचे खत म्हणजे वनस्पतीचे हिरवे अवशेष जमिनीत वाढवून किंवा बाहेरून आणून जमिनीत गाडणे किंवा वनस्पतींच्या हिरव्या अवशेषावरून तयार झाले खत होय.
हिरवळीच्या खताचे फायदे
* हिरवळीच्या खतांमध्ये ह्युमस नावाचे सेंद्रिय द्रव्य असते. त्यामुळे मातीला काळा रंग येतो.
* हिरवळीच्या खतामधील सेंद्रिय द्रव्यामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंना अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते; परिणामी जीवाणूंची वाढ भरपूर होऊन त्यांचे कार्य जोमाने वाढते. जमिनीतील पोषक द्रव्ये रासायनिक क्रियेने विरघळून ती पिकांना सुलभ स्थितीत प्राप्त होतात.
* लवकर कुजणारी हिरवळीची खते वापरल्यामुळे एकूण नत्र, उपलब्ध स्फुरदचे प्रमाण आणि अॅझोटोबॅक्टरसारख्या जीवाणूंचे प्रमाण वाढते.
* जमिनीत टिकून राहणार्या कणसमूहांचे प्रमाण वाढते.
* जमिनीची जलधारणा क्षमता वाढते. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूपही कमी होते.
* सेंद्रिय पदार्थांमुळे माती रवेदार होण्यास मदत होते. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत साचून न राहता, त्याचा निचरा लवकर होतो. हलक्या जमिनीतदेखील सेंद्रिय पदार्थांमुळे पाणी धारण करण्याची क्षमता वाढते.
* हिरवळीच्या पिकांच्या दाट वाढीमुळे तणांचा नायनाट होण्यास मदत होते.
* क्षार जमिनीत हिरवळीचे पीक गाडण्यामुळे जमिनीतील क्षार कमी होऊन त्या जमिनी लागवडीखाली आणता येतात.
* द्विदल वर्गातील हिरवळीची पिके ही हवेतील नत्र शोषून घेतात आणि ते नत्र जमिनीत साठविले जाऊन ते पुढील पिकांना उपलब्ध होते.
* हिरवळीच्या खताची पिके जमिनीतील असेंद्रिय+स्फुरदाचे सेंद्रिय
स्फुरदात रूपांतर करतात आणि जमिनीतील स्फुरदाची उपलब्धता वाढवितात.
– अनिल विद्याधर