गणेश गोडसे, बार्शी : तालुक्यातील सुर्डी येथील भाऊ डोईफोडे यांनी बेदाणा निर्मितीमधून तब्बल बारा लाख रुपयांचे उत्पादन एका एकरामध्ये घेऊन शेतकर्यांसमोर आदर्श उभा केला आहे. डोईफोडे यांनी एकरामध्ये तब्बल सहा क्विंटल सहाशे किलोग्राम बेदाणा निर्मिती करून शेती क्षेत्रामध्ये आदर्शवत असेच काम केले आहे.
जल व्यवस्थापनात उल्लेखनीय असे काम केल्याबद्दल सुर्डी गावाला नुकताच दिल्लीत जल व्यवस्थापनाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. डोईफोडे यांनी शेती व शेतकर्यांच्या बाबतीत होत असलेल्या अपप्रचाराला खोडून काढण्याच्या उद्देशाने सन 2016 -17 मध्ये आपल्या काळ्या प्रतीच्या जमिनीमध्ये नऊ बाय पाच अंतरावर क्लोन जातीच्या बेदाणा निर्मितीसाठी लाभदायक असणार्या वाणाची निवड केली. 2016 मध्ये रोपांची लागवड केल्यानंतर भेसळ डोस, शेणखत, मळी या खतांची मात्रा दिली. तसेच, पाचट टाकून नैसर्गिक मल्चिंग केले. गरजेनुसार डाऊनी, भुरी करपा आदी फवारणी घेण्यात आली.
मार्च 2017 मध्ये क्लोन जातीच्या द्राक्षांचा पहिला भार घेतला. प्रतिवर्षी द्राक्षबागेची निगा राखत वार्षिक उत्पादनांमध्ये वरचेवर वाढच केली. मार्च 2022 मध्ये तर चक्क एक एकर क्षेत्रामध्ये 6 क्विंटल 600 किलोग्राम इतके मनुक्याचे विक्रमी उत्पादन घेतले. बेदाणा निर्मितीसाठी गावामध्येच विविध योजनांमधून मिळालेल्या शेडमध्ये सोय झाल्यामुळे बेदाणा निर्मितीला सोपे पडते. बेदाणा निर्मिती झाल्यानंतर गावांमध्येच असलेल्या प्रक्रिया केंद्रामधून बेदाण्याची प्रतवारी करणेही सहज शक्य होते. बेदाण्याची प्रतवारी झाल्यानंतर तो बेदाणा विक्रीच्या उद्देशाने बाजारपेठेमध्ये पाठवला जातो.
सांगली, तासगाव आदी बाजारपेठेत सुर्डीतील बेदाण्यास जास्त मागणी आहे. बारा लाख रुपयांच्या उत्पादनामधील तीन लाख रुपये द्राक्षबागेची वार्षिक देखभाल करण्यासाठी जातात. त्यामध्ये खतांची मात्रा, फवारणी, विविध जैविक खते व इतर बाबींसाठी हा खर्च होतो. भाऊ डोईफोडे यांना बेदाणा निर्मितीच्या यशात आई सिंधू, वडील दत्तात्रय व पत्नी सारिका यांचा मोठा हातभार लागला. या सर्वांनी त्यांना बेदाणा निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. जेमतेम नववीपर्यंतचे शिक्षण घेतलेला तरुण शेतकरी मनात आणले तर काय करू शकतो हे भाऊ डोईफोडे यांनी दाखवून दिले आहे.
पूर्वी आम्ही तूर, मका यासारखी पारंपरिक पिके घेत होतो, मात्र बेदाणा निर्मितीच्या उद्देशाने आज शेतात द्राक्षबागेची लागवड केली. त्याचे लाखो रुपयांत फळ मिळल्याचे दिसत आहे.
जिद्द, चिकाटी व सततच्या प्रयत्नाने अशक्य ते शक्य होऊन जाते. बार्शी तालुक्यातील सुर्डी येथील द्राक्ष उत्पादन व बेदाणा निर्मिती करून भाऊ डोईफोडे यांनी शेतकर्यांसमोर आर्थिक उत्पादनाचा मार्ग उभा केला आहे…
– भाऊ डोईफोडे
बेदाणा उत्पादक शेतकरी, सुर्डी