

अन्न विकिरण प्रक्रिया शेतीसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामध्ये फळे, भाज्या आणि इतर खाद्यपदार्थांचे शेल्फ लाईफ वाढवून ते जंतूंच्या प्रभावापासून मुक्त ठेवले जाते. फूड इरॅडिकेशन हे रेडिएशनचे तंत्र आहे. यामध्ये खाद्यपदार्थ मर्यादित कालावधीसाठी विशिष्ट प्रमाणात रेडिएशनच्या संपर्कात येतात. हा किरणोत्सर्ग काही कालावधीपर्यंत अन्न पदार्थांमधून जातो आणि त्याच बचत होते. गॅमा किरणोत्सर्गाच्या फवार्यामुळे अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकून राहतात कारण त्यातील सूक्ष्मजीव नष्ट होतात.
पारंपरिक शेती करण्याऐवजी तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. अणू शेती (न्यूक्लिअर अॅग्रिकल्चर) हे आता नव्या युगातील नवीन तंत्रज्ञान आहे. अनेक कृषिप्रधान देश अजूनही या तंत्रज्ञानापासून अनभिज्ञ आहेत. परंतु असे काही देश आहेत, जिथे अणुशेतीचा भरपूर फायदा घेतला जात आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) या क्षेत्रात कार्यरत आहे. कृषी क्षेत्रातील अणु तंत्रज्ञानाच्या वापराचे उत्तम उदाहरण सादर करताना भाभा अणुसंशोधन केंद्राने विविध राज्यांमधील अनेक कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने आतापर्यंत 49 बियाण्यांचे वाण व्यावसायिक वापरासाठी खुले केले आहेत. यामध्ये सोयाबीन आणि तांदूळ याचबरोबर मूग, उडीद, मोहरी आदींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे अणु तंत्रज्ञानासह व्यावसायिक शेतीचा अवलंब करण्यावर केंद्रीय कृषी मंत्रालयसुद्धा भर देत आहे. बीएआरसीच्या अणु कृषी आणि जैवतंत्रज्ञान शाखेशी संबंधित असलेले डॉ. राजेश वत्स म्हणतात की, 'शेतीसाठी कमी जमीन उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे वाढती लोकसंख्या आणि अन्नधान्याची वाढती मागणी यामुळे अणु शेतीचे हे तंत्र अत्यंत महत्त्वाचे ठरते.'
शास्त्रज्ञ धीरज जैन यांच्या मते, 'अणु शेतीमध्ये किरणोत्सर्गाद्वारे वनस्पतींची अनुवांशिक क्षमता वाढविता येते. उत्परिवर्तनाने खूप अधिक उत्पादन देणार्या पिकांची विविधता देखील विकसित केली जात आहे. या तंत्राने पाण्याचा कमी वापर करून अधिक उत्पादन घेणे आणि पीक दीर्घकाळ टिकवून ठेवणे शक्य होते.' अणुसंशोधन क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी वैज्ञानिक संस्था असणार्या बीएआरसी आणि केंद्रीय अणुऊर्जा विभागाचा भाग असलेला बीआरआयटी या संस्था या क्षेत्रात एकत्रितपणे काम करीत आहेत. आकडेवारी असे सांगते की, देशात दरवर्षी 40 टक्क्यांहून अधिक अन्नधान्य साठवणुकीदरम्यान वाया जाते.
देशात तयार होणारे अन्नधान्य सुरक्षित केले, तर कोट्यवधी लोकांना अन्न मिळू शकते. सध्या देशातील लोकांना महागड्या दराने पिके शीतगृहात किंवा धान्याच्या गोदामात ठेवावी लागत आहेत. त्यामुळे अन्नधान्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने केलेल्या सर्व उपाययोजना अपुर्या ठरत आहेत. अशा स्थितीत अणु कृषी जैवतंत्रज्ञान म्हणजेच अन्न विकिरण हा सर्वात चांगला उपाय असल्याचे दिसते. अणु किरणोत्सर्गावर आधारित जैवतंत्रज्ञानामुळे अन्नधान्य दीर्घकाळ स्वच्छ आणि जंतुमक्त ठेवता येते.
अन्न विकिरण प्रक्रिया शेतीसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामध्ये फळे, भाज्या आणि इतर खाद्यपदार्थांचे शेल्फ लाईफ वाढवून ते जंतूंच्या प्रभावापासून मुक्त ठेवले जाते. फूड इरॅडिकेशन हे रेडिएशनचे तंत्र आहे. यामध्ये खाद्यपदार्थ मर्यादित कालावधीसाठी विशिष्ट प्रमाणात रेडिएशनच्या संपर्कात येतात. हा किरणोत्सर्ग काही कालावधीपर्यंत अन्न पदार्थांमधून जातो आणि त्यात बचत होते. गॅमा किरणोत्सर्गाच्या फवार्यामुळे अन्नपदार्थ दीर्घकाळ टिकून राहतात कारण त्यातील सूक्ष्मजीव नष्ट होतात.
आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे; ती अशी की, भारतातील अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे पीक किंवा फळे, भाजीपाला यांचा वास, दर्जा किंवा गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची घट होत नाही. रेडिएशन प्रोसेसिंग प्लँट, वाशी येथेही अशी प्रक्रिया केली जाते. अन्न विकिरण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे माती परीक्षण होय.
आंबा आणि केळींना अन्न किरणोत्सर्ग प्रक्रियेतून नेले असता ते पिकण्यास बराच वेळ लागतो. बटाटे आणि कांद्यामध्ये उगवण थांबते. कडधान्यांसह गहू, तांदूळ यांच्यात किडे होत नाहीत. मासे, अंडी आणि अन्य मांसाहारी पदार्थांमधील सूक्ष्मजीवांची वाढ कमी होते. मसाल्यांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात कीटक आणि सूक्ष्मजीव वाढत नाहीत. आज आपल्या देशात अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी कायमस्वरूपी आणि प्रभावी रसायन नाही. अशा परिस्थितीत अणु कृषी जैव तंत्रज्ञानाचा वापर करून अन्न विकिरणाद्वारे किरणोत्सर्गाच्या संपर्कात आणून अन्न कुजण्यापासून बचाव करता येतो.
रेडिएशन किंवा किरणोत्सर्ग शब्द ऐकल्यावर अनेकांना भीती वाटते. परंतु बीएआरसीशी संबंधित शास्त्रज्ञ धीरज जैन म्हणतात की, आधी रेडिएशनचे फायदे समजून घेण्याची गरज आहे. याबाबतचा संभ्रम दूर करून पिकांवर किरणोत्सर्गाचा कोणताही दुष्परिणाम होत नाही, हेही समजून घ्यावे लागेल. कारण बीएआरसीने आपल्या संशोधनातूनच हे स्पष्ट केले आहे की, अन्न विकिरण ही पूर्णपणे सुरक्षित प्रक्रिया आहे आणि त्याचा अन्न आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही. भारतासारख्या इतर अनेक देशांमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाते.
ज्या ज्या ठिकाणी ते वापरले जाते, तिथे धान्य आणि फळे जास्त वेळ उन्हात ठेवून वाळवावी लागत नाहीत, तर त्याऐवजी अन्नातून गॅमा किरण केवळ 15 सेकंदांपर्यंत सोडले जातात. त्यामुळे आत वाढणारे जंतू नष्ट होतात आणि त्यांच्या हल्ल्यापासून ते फळ किंवा अन्नधान्य सुरक्षित होते. गावांसाठीही अणुऊर्जा आणि संबंधित तंत्रज्ञानांचा वापर केला जात आहे. गेल्या वर्षी छत्तीसगड सरकारने बीएआरसी आणि केंद्र सरकारच्या रेडिएशन अँड आयसोटॉप टेक्नॉलॉजी (बीआरआयटी) या संस्थांशी दोन करार केले आहेत. या अंतर्गत अन्नधान्य, फळे, भाजीपाला आणि किरकोळ वनउत्पादने दीर्घकाळ संरक्षित केली जाऊ शकतात आणि शेणखतापासून वीजनिर्मितीही करता येणे शक्य आहे.
भाभा अणुसंशोधन केंद्राने गेल्या अनेक वर्षांत अणु कृषी जैवतंत्रज्ञान कार्यक्रमांतर्गत विविध राज्यांमधील विद्यापीठांच्या सहकार्याने 49 नवी पिके तयार केली आहेत. यामध्ये भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन आणि सूर्यफूल, ताग आणि कांद्यांच्या अनेक प्रजातींचा समावेश आहे. हे समजावून घेणे गरजेचे आहे की, शेंगदाण्यासह यापैकी अनेक पिके त्यांच्या मूळ प्रजातींपेक्षा केवळ आकारानेच मोठी आहेत असे नव्हे, तर ते अधिक उत्पादनदेखील देतात. अणुसंशोधन केंद्र मुंबई येथील शास्त्रज्ञ डॉ. राजेश वत्स यांनी असे स्पष्ट केले आहे की, अणु विकिरणाचा मुख्य फायदा म्हणजे अनुवांशिक भिन्नता वाढविणे. या तंत्राने अनेक तृणधान्ये, कडधान्ये आणि तेलबियांमध्ये इच्छित गुणधर्म विकसित केले जातात.
– विलास कदम