वांगी लागवडीतून अर्थार्जन

वांगी लागवडीतून अर्थार्जन
Published on
Updated on

रोजच्या आहारात वापरल्या जाणार्‍या वांग्याची लागवड करून शेतकर्‍यांना चांगले उत्पन्‍न मिळवता येते. खरीप, रब्बी आणि उन्हाळ्यातही वांग्याची लागवड करता येते. हलक्या ते भारी जमिनीत हे पीक येऊ शकते. इतर पिकांप्रमाणेच वांग्यावरही काही रोग पडण्याचा संभव असतो. मात्र वेळीच काळजी घेतली, तर या रोगांना प्रतिबंध घालून वांग्याची चांगली लागवड करता येते.

आपल्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश असतो. वांगीही त्यापैकीच एक महत्त्वाची भाजी आहे. वांगी या पिकाची लागवड खरीप, रब्बी हंगामात आणि उन्हाळ्यातही करता येते. कोरडवाडू शेतीत आणि मिश्र पीक म्हणूनही वांग्याची लागवड करता येते. आहारात वांग्याची भाजी, भरीत इत्यादी अनेक प्रकारे उपयोगात येते. पांढरी वांगी मधुमेह असलेल्या रोग्यांना गुणकारी असतात. वांग्यामध्ये अ, ब, क, ही जीवनसत्त्वे तसेच लोह, प्रथिने यांचे प्रमाण पुरेसे असते. महाराष्ट्रात या पिकाखाली अंदाजे 28,113 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये वांग्याची वाढ चांगली होते. सरासरी 13 ते 21 सेल्सिअस तापमानाला वांग्याचे पीक चांगले येते.

सर्व प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत वांग्याचे पीक घेता येते. परंतु सुपीक, चांगला पाण्याचा निचरा होणार्‍या मध्यम, काळ्या जमिनीमध्ये वांग्याचे झाड जोमाने वाढते. जमिनीचा सामू 6 ते 7 असल्यास पिकाची वाढ चांगली होते. नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याचे उत्पादन चांगले येते. एक हेक्टर लागवडीसाठी 800 ते 1000 ग्रॅम बियाणे पुरेसे होते.पीक चांगले येण्यासाठी त्याची पूर्वमशागतही चांगल्या पद्धतीने करावी लागते. मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन उभी-आडवी नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. कुळवाच्या शेवटच्या पाळीसोबत दर हेक्टरी 30-50 गाड्या शेणखत जमिनीत पसरवून मिसळून घ्यावे. वांग्याची रोपे गादीवाफ्यावर तयार करता येतात. गादीवाफे 3 बाय 1 मीटर आकाराचे करावेत. गादीवाफ्याभोवती पाणी देण्यासाठी सरी ठेवावी. एक हेक्टर वांगी लागवडीसाठी अशा 15 ते 20 वाफ्यातील रोपे पुरेशी होतात. वांग्याच्या 1 हेक्टर लागवडीसाठी 400 ते 500 ग्रॅम बी पुरते. मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे 800 ते 1000 ग्रॅम बी पेरून अधिक रोपे तयार करून ठेवावीत. म्हणजे काही रोपे न उगवल्यास ही रोपे नांगे भरण्यासाठी वापरता येतील. गादी वाफ्यावरील रोपे 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची झाल्यावर म्हणजे 6 ते 8 पानांवर आल्यावर लावणीस तयार होतात. बी पेरणीपासून साधारणपणे 4 ते 4 आठवड्यांत रोप लागवडीसाठी तयार होतात.

बियांची उगवण होईपर्यंत वाफ्यांना सुरुवातीला झारीने आणि नंतर वाफ्याच्या भोवती असलेल्या गरजेनुसार पाणी द्यावे. वांग्याच्या पाणी पिकास दर हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद, पालाश रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावे आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्या लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावे. ही पिके 9 ते 10 सेंटी मीटर खोलीवर झाडाच्या बुंध्याभोवती 10 ते 15 सेंटी मीटर अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावीत. वांग्याच्या कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावे. रोपांची लागवड केल्यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे. पाण्याच्या पाळ्या जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतात. खरिपाच्या पिकास पाऊस नसताना 10 ते 12 दिवसांच्या अंतराने, हिवाळ्यात 7 ते 8 दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या घ्याव्यात. वांगी पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीने देऊन पाण्याची बचत करता येते. वांग्याच्या शेतीतील खुरपणी करून तण काढणे, कोळपणी करणे, पिकाला भर देणे ही आंतर मशागतीची कामे नियमित आणि वेळेवर करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावे. तसेच झाडास मातीची भर द्यावी. काही तणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारूनही करता येतो. वांगी पिकामध्ये आंतरपीक म्हणून मुळा, पालक, मेथी, कोथिंबीर ही पिके घेता येतात.

अन्य पिकांप्रमाणेच वांग्यावरही विविध रोग पडतात. पण त्यासंदर्भात काळजी घेतली तर या रोगांना प्रतिबंध करणे शक्य होते. रोप लावणीनंतर 10 ते 12 आठवड्यांनी फळे तयार होतात. फळे पूर्ण वाढून टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढणी करावी. फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते. तसेच जुन फळे गिर्‍हाइकांच्या पसंतीस उतरत नाहीत. 4 ते 5 दिवसांच्या अंतराने 10 ते 12 वेळा वांग्याची तोडणी करता येते.
– विलास कदम

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news