अत्यंत काटक आणि हलक्या ते मध्यम जमिनीत चांगले तग धरणारे पीक म्हणून शेवगा ओळखला जातो. अन्य पिकांप्रमाणेच शेवग्याची लागवडही आर्थिकद़ृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. पण, त्यासाठी शेवग्याची लागवड करताना काय काळजी घ्यावी हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
शास्त्रोक्त पद्धतीने शेवग्याची लागवड केल्यास त्यापासून विक्रमी उत्पादन घेता येते आणि आर्थिक समृद्धीही साधता येते, हे काही शेतकर्यांनी दाखवून दिले आहे.
शेवग्याच्या शेंगांना आहारामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याबरोबरच शेवग्याची पानेही भाजीसाठी वापरता येतात. त्यामुळे प्रथिने, जीवनसत्त्वे जास्त मिळतात. शेवग्याच्या बियांचा वापरही पाणी शुद्ध करण्यासाठी, पाण्यातील जिवाणूंचा नाश करण्यासाठी करता येते. त्याचप्रमाणे शेवग्याच्या बियांपासून तेल निघते. त्याचा उपयोग सुगंधी तेल बनविण्यासाठी, घड्याळे साफ करण्यासाठी केला जातो.
शेवगा हे अत्यंत काटक आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीत चांगल्या प्रकारे उत्पन्न देते. माळरानाच्या हलक्या जमिनी, बरड जमिनी, डोंगर टेकड्यांच्या उतारावरच्या जमिनीत सेेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा समतोल वापर केला तर चांगले उत्पादन मिळते, हे अनेक शेतकर्यांनी सिद्ध केले आहे. भारी काळ्या जमिनीत झाडे नुसती माजतात. परिणामी शेंगा कमी लागतात. अशा जमिनीत शेवग्याचे पीक जिरायती म्हणून घ्यावे.
शेवग्याची लागवड प्रामुख्याने दोन पद्धतीमध्ये केली जाते. फाटे कलम लावून आणि बियांपासून रोपे करून लागवड करता येेते. फाटे कलम लावून लागवड करावयाची असल्यास आपल्या जवळपासच्या भरपूर उत्पादन देणार्या आणि शेेंगांचा दर्जा चांगला असणार्या जातीवंत झाडांपासून लागवड करावी. फाटे कलमासाठी साधारण 5 ते 6 से. मी. जाडीचे आणि 1 ते सव्वा मीटर लांबीचे फुगलेले डोळे असलेले फाटे लागवडीसाठी वापरावेे.
बियांपासून लागवड करताना 3×5 आकारांच्या पिशवीत पोयटा माती भरून त्यात साधारण अर्धा इंच खोलीवर बियाणे लावावे आणि झारीने पाणी द्यावे. 8 ते 20 व्या दिवसपर्यंत बियाणे उगवेल. रोप दीड-दोन महिन्यांचे झाल्यावर योग्य त्या ठिकाणी लावावे. त्याप्रमाणे अलीकडच्या काळात जून-जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यावर प्रत्यक्ष शेेतावर खड्ड्यात बियाणे लागवड करून शेतकर्यांनी भरघोस उत्पादन घेतले आहे.
शेवगा लागवडीसाठी 12×12 फुटांवर, 2×2×2 फूट आकाराचेे खड्डे घेऊन 1 घमेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट आणि 5 ग्रॅम थायमेट टाकून (अर्धा चमचा) खड्डा भरावा आणि चांगला पाऊस झाल्यानंतर या खड्ड्यात बियाणांची लागवड करावी. काही प्रगतशील शेतकर्यांनी 10×10 अंतरावर लागवड करून, योग्य वेळी छाटणी करूनही आणि सेेंद्रिय खतांचा वापर वाढवून चांगले उत्पादन घेतले आहे.
तमिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोईमतूर-1 ही जात बर्याच मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली आहे. याच्या शेंगा सरासरी 2 ते अडीच फूट लांंब, चवदार आणि मध्यम जाड असतात. वर्षात सरासरी 200 ते 300 शेंगा पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून मिळतात. कीड आणि रोगराईला प्रतिकारक्षम ही जात आहे. लागवडीनंतर 5 ते 6 महिन्यांनी शेेंगा येण्यास सुरुवात होते. वर्षातून दोनदा बहार येतो.
कोईमतूर-2 ही जात सुद्धा कोईमतूर विद्यापीठाने विकसित केलेली असून शेंगा आखूड आणि जाडीला जास्त असतात. चवीला स्वादिष्ट असतात. सरासरी 300 ते 350 शेंगा एका झाडांपासून मिळतात. कीड आणि रोगाला ही जातसुद्धा प्रतिकारक्षम आहे.
पी. के. एम.-2 या जातीच्या शेवग्याच्या शेंगा 1.5 ते 2.5 फूट लांब असतात. हिरवट पोपटी रंगाच्या आणि मध्यम जाडीच्या शेंगा यामुळे बाजाराभाव चांगला मिळतो. वर्षातून दोनदा बहार येतो.
दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला कोकण रूचिरा हा वाण 5 ते 6 मीटर उंच वाढतो. शेंगा त्रिकोणी आकाराच्या, गर्द हिरव्या असतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून 35 ते 40 किलो शेंगा मिळतात. या शिवाय महाराष्ट्रातील काही शेतकरी, सेवाभावी संस्थांनीही निवड पद्धतीने स्थानिक रूचकर, चवदार आणि भरपूर उत्पन्न देणार्या जातींची निवड केली आहे आणि त्या त्या भागात त्या प्रचलित आहेत.
जून-जुलै महिन्यात लागवड केल्यानंतर शेवग्याचे झाड फार झपाट्याने वाढते आणि 5 ते 6 महिन्यांत शेंगा येण्यास सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीपासूनच छाटणी करणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर झाड बांबूसारखे उंच वाढेल आणि शेंगा कमी लागतील आणि त्याची काढणीही अवघड होईल. छाटणी करताना बियाणे लागवडीनंतर साधारण अडीच-तीन महिन्यांनंतर 3 ते 4 फूट उंच झाल्यावर शेंडा जरूर खुडावा आणि बाजूनेपण शेेेंडे खुडावेत. त्यामुळे झाडांना फांद्या वाढून झाडाला गोलाकार येतो. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात प्रत्येक फांदीवर 3 ते 4 डोळे ठेवून छाटणी करावी.
बर्याच वेळा खोडाच्या तळाशी किंवा फांद्याच्या बेचक्यातून कोवळे अनावश्यक घुमारे वाढतात. ते देखील काढून टाकावेत. जास्तीत जास्त उत्पादन आणि झाडाची उंची मर्यादित ठेवण्यासाठी छाटणी, वळण देणे फार आवश्यक आहे. शेवग्याची लागवड शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास प्रत्येक झाडापासून सुरुवातीला 15 ते 20 किलो शेेंगाचे उत्पादन मिळते आणि झाडाच्या वाढीनुसार ते वाढत जाऊन 55 ते 60 किलोपयर्र्ंत विक्रमी उत्पादन आज शेतकरी घेत आहे. दीर्घकालीन फळबागेत मुख्य फळझाड मोठे होईपर्यंत मोकळ्या जागेत आंतरपीक म्हणून शेवगा लावगड निश्चितच फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे बांधावर, तालीवर, ओढ्याच्या कडेने, परसबागेत सुधारित जातीच्या शेवग्याची लागवड फायदेशीर आहे.
– प्रसाद पाटील