

महापूर आणि अतिवृष्टी यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीला सामोरे जात कोल्हापुर जिल्ह्यातील शेतकर्यांनी या वर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली आहे. हवामानाने साथ दिल्याने पिकेही जोमात आहेत. पिकाला चांगला दर मिळण्याच्या शक्यतेने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. यावर्षी जूनमध्ये केलेल्या खरीप हंगामातील सोयाबीनवर महापुराने पाणी फेरले.
महापुराचे पाणी न पोहोचलेल्या भागातील सोयाबीनचे पीक चांगले आले. परंतु, काढणीच्या वेळी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा पिकाला बसला. काही ठिकाणचे सोयाबीन हाती लागले. मात्र, त्याला मॉईश्चरचे प्रमाण अधिक असल्याने दराने मारले. हे सोयाबीन मिळेल त्या भावाने बाजारपेठेत विकल्यानंतरही या शेतकर्यांना तोट्यातच जावे लागले.
शेतात नवीन पीक घेण्यासाठी घात नसल्याने हातकणंगले तालुक्यातील शेतकर्यांनी डिसेंबर, जानेवारी दरम्यान पुन्हा कंबर कसली आणि मोकळ्या राहिलेल्या तसेच खोडवा तुटून गेल्यावर सोयाबीनसाठी मशागत करून उन्हाळी सोयाबीन पेरणीचा प्रयोग राबवला. योग्य वेळी पाणी व औषधे यांचे नियोजन केल्याने पीकही तरारून आले आहे. सोयाबीनला दरही चांगला मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. येत्या खरीप हंगामात काही शेतकर्यांना चांगल्या प्रतीचे घरचेच बियाणे मिळणार तर काहींना कंपनीच्या बियाणापेक्षा कमी दरात आपल्याच गावात बियाणे मिळणार आहे.
हातकणंगले तालुक्याच्या पश्चिमोत्तर विभागात दीडशे हेक्टरहून अधिक क्षेत्रावर केडीएस 726 (फुले संगम) या जातीच्या उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग यशस्वी होत आहे. बदलत्या वातावरणानुसार शेतकर्यांनी पिकावर वेळोवेळी बुरशीनाशक व कीटकनाशकांची फवारणी करावी.
– संतोष पाटील, कृषी सहायक
– राजकुमार चौगुले, किणी