आपल्याकडे शेतीमालाच्या साठवणुकीच्या सोयी फारशा उपलब्ध नसतात. तथापि, नाशवंत शेतीमाल वगळता अन्नधान्यांची साठवणूक करण्यासाठी अनेक पारंपरिक पद्धती अस्तित्वात आहेत. परंपरेने त्यांचा वापर केला जात आहे. काळजी न घेतल्यास अन्नधान्याचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते, हे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साठवणुकीच्या सोयी नसल्या तरी घरगुती आणि पारंपरिक उपाययोजना करून शेतीमाल प्रदीर्घ काळ टिकवता येतो आणि किडींपासून त्याचा बचाव करता येतो.
शेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती असून, त्या किफायतशीर आणि पर्यावरणपूरक आहेत. या प्रक्रिया सामान्यतः स्थानिक पातळीवर उपलब्ध असणार्या नैसर्गिक संसाधनांवर आधारित असतात. घरगुती पातळीवर शेतीमालाची साठवणूक करण्याच्या पद्धतींची माहिती शेतकर्यांना असणे गरजेचे आहे. कारण अन्नधान्य आणि कृषी संघटनेने 2011 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, घरगुती स्तरावर साठवणूक केलेला अन्नधान्यांचा मोठा हिस्सा म्हणजे सुमारे 40 ते 50 टक्के हिस्सा खराब होतो, असा अनुभव असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची नासाडी होते.
घरगुती पातळीवर सुरक्षित साठवणूक ही अत्यंत जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे; कारण कीटक आणि सूक्ष्म जैविक घटकांमुळे अन्नधान्याची गुणवत्ता आणि पौष्टिकता बाधित होते आणि शेतीमालाचे वजनही कमी झाल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होते. कीटक, किडी आणि जैविक घटक आपल्या मलमूत्राद्वारे विषारी पदार्थ धान्यात सोडतात आणि ते मानवी आरोग्यास घातक ठरू शकतात. बुरशी, कीटक, भुंगे, पतंग याखेरीज उंदीरही धान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. या किडी आणि कीटकांच्या संक्रमणाची अवस्था योग्य वेळी ओळखता न आल्यामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान होते. साठवणुकीसाठी शीतगृह आणि अन्य पर्याय शेतकर्याच्या जवळपास उपलब्ध नसतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने साठवणूक करण्याचे विविध मार्ग शेतकर्यांनी माहीत करून घेतले पाहिजेत आणि योग्य वेळेत हे उपाय योजून कष्टाने पिकविलेल्या शेतीमालाचे रोग, किडी आणि उंदीर यांपासून रक्षण केले पाहिजे. अन्नधान्य साठवणुकीचा सर्वांत सोपा आणि प्रभावी प्रकार म्हणजे धान्य उन्हात वाळविणे. धान्यातील ओलसरपणा त्यामुळे नष्ट होतो आणि ओलाव्यामुळे होणार्या किडींची प्रजननक्षमता कमी होते. कापणीनंतर धान्य उन्हात वाळविल्यास ते दीर्घकाळ टिकते असा अनुभव आहे.
कीडी आणि कीटकांची प्रजननक्षमताच उन्हामुळे संपुष्टात येत असल्यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव टळतो. छोट्या आणि मोठ्या अशा दोन्ही शेतकर्यांसाठी ही अत्यंत सोपी आणि उपयुक्त पद्धत आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात धान्यावर वाळविण्याची प्रक्रिया केल्यास ते दीर्घकाळ टिकते. धान्यात होणार्या विविध प्रकारच्या कीटकांची वाढ थांबविण्यासाठी आणखी एक सोपा पर्याय म्हणजे कडुनिंबाच्या पानांचा वापर. धान्यात शिरणारे कीड आणि कीटक कडुलिंबाच्या पानांमुळे धान्यापासून दूर पळून जातात. त्यासाठी कडुलिंबाच्या झाडाची ताजी पाने तोडून ती सावलीत वाळवली जातात आणि नंतर ती धान्यात मिसळली जातात. धान्याची पेटी या पानांसह बंद केली जाते. ही प्रक्रिया खूपच सोपी, सुरक्षित आणि प्रभावी आहे. विशेषतः दक्षिण भारतात अनेक पिकांच्या साठवणुकीसाठी ही प्रक्रिया उपयोगात आणली जाते.
प्रति एक किलो धान्यात 40 ग्रॅम या प्रमाणात हळदीची पूड मिसळणेही अत्यंत हितकारक ठरते. हळद टाकून धान्यावर हलके रगडल्यानंतर अर्धा तास धान्य सावलीत वाळवले जाते. तसेच धान्य टिकविण्यासाठी काही ठिकाणी कच्च्या हळदीचाही उपयोग केला जातो. हळदीचा उग्र वास आणि कीटकनाशक शक्तीमुळे कीटक धान्यापासून दूर राहतात. हा उपाय धान्याच्या दीर्घकालीन साठवणुकीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. तसेच हळद लावून टिकविलेले धान्य आरोग्यासाठीही चांगले असते. खाद्यपदार्थांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी ग्रामीण महिलांकडून लाल मिरचीची पूडही अनेकदा वापरली जाते. याखेरीज लसणाच्या कुड्यांचा वापर केल्यास किडींचे संक्रमण रोखण्यास मदत होते. लसणाचे गड्डे पेटीच्या तळाशी ठेवून त्यावर धान्य भरले जाते आणि मग पेटी बंद केली जाते. लसणाच्या वासामुळे किडे-कीटक धान्यापासून दूर राहतात. त्यामुळे धान्याच्या, विशेषतः तांदळाच्या साठवणुकीसाठी लसणाच्या गड्ड्यांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.
अगदी पूर्वीच्या काळापासूनच धान्य टिकविण्यासाठी मिठाचा वापर करण्याची पद्धत रूढ आहे. बुरशी आणि जीवाणूंपासून धान्याचे रक्षण करण्यासाठी मीठ उपयोगी ठरते. एक किलो लाल चणे आणि सुमारे 200 ग्रॅम मीठ एकत्रित करून धान्यासह पोत्यात ठेवले जाते. त्यानंतर पोते व्यवस्थित शिवले जाते. अर्थात, धान्य टिकविण्याची ही पद्धती चार ते पाच महिन्यांसाठीच फायदेशीर ठरते. मिठाचा वापर बहुतांश वेळा चिंच सुरक्षित साठविण्यासाठी केला जातो. चिंच तोडल्यानंतर मातीच्या घड्यामध्ये एकावर एक थर रचून ती साठविली जाते. तसे करताना एक किलो चिंचेसाठी दहा ग्रॅम या प्रमाणात मीठ मिसळले जाते. भुंगे, पतंग आदी कीटकांपासून चिंच सुरक्षित राखण्यास मीठ उपयुक्त ठरते. किडींना नियंत्रित करण्यासाठी चुनाही उपयुक्त असतो आणि चुन्याचा वापरही खूप पूर्वीपासून केला जात आहे. हा अत्यंत स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. कीटकांना नियंत्रित करण्यासाठी चुन्याचे चूर्ण बनवून तांदळात मिसळले जाते आणि पोत्यात भरून तांदूळ कोरड्या जागी साठवले जातात. चुन्याच्या वासाने कीटक दूर राहतात आणि त्यांची प्रजनन प्रक्रियाही थांबते. एक किलो धान्यासाठी सामान्यतः दहा ग्रॅम चुन्याचा वापर केला जातो. कीटकांच्या आक्रमणापासून चुन्यामुळे धान्याचा प्रदीर्घकाळ बचाव केला जाऊ शकतो.
जुन्या काळापासूनच धान्य टिकविण्यासाठी शेतकर्यांकडून राखेचाही वापर केला जात आहे. विशेषतः डाळींची साठवणूक करण्यासाठी मातीच्या भांड्यात तीन चतुर्थांश डाळ आणि उर्वरित भागात गाईचे शेण आणि लाकडाचा भुसा यांचे मिश्रण भरले जाते. सहा महिन्यांनंतर हीच प्रक्रिया पुन्हा केली जाते. धान्याच्या बाबतीतही लाकडाची राख आणि शेणाच्या मिश्रणाचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. हे मिश्रण कीटकरोधी असते. ग्रामीण महिला आणखी एक आश्चर्यकारक वाटणारी पद्धती धान्याच्या साठवणुकीसाठी वापरतात. या पद्धतीत धान्याच्या पेटीत सुमारे सहा ते आठ काडेपेट्या ठेवल्या जातात. या काडेपेट्या पेटीच्या तळाशी, मध्यात आणि वरील भागातही ठेवल्या जातात. काडेपेटीच्या काड्यांना फॉस्फरस लावलेला असतो आणि त्यामुळे किडी-कीटक धान्यापासून दूर राहतात.
मात्र, अधिक प्रमाणात हा प्रयोग करणे घातक ठरू शकते. धान्य साठविण्यासाठी वापरण्यात येणारी पोती कडुनिंबाच्या द्रावणात बुडवून नंतर वाळवून घेण्याची पद्धत काही ठिकाणी वापरली जाते. अशा उपचारित पोत्यांमध्ये धान्य सुरक्षित राहते. दहा लिटर पाण्यात दहा टक्के कडुलिंबाच्या बिया मिसळल्या जातात. संपूर्ण रात्रभर या बिया पाण्यात भिजवल्या जातात. त्यानंतर गाळून त्या पाण्यात पोती भिजवली जातात. ही पोती नंतर सावलीत वापरून त्यात धान्याची साठवणूक केली जाते. सुमारे वर्षभर कीड आणि कीटकांपासून धान्याला दूर ठेवण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरतो. अशा पोत्यांचा वापर अजिबात हानिकारक ठरत नसल्यामुळे ही पद्धत सुरक्षित आहे. सामान्यतः दहा पोती भिजवण्यासाठी 2 ते 8 लिटर कडुनिंबाच्या द्रावणाची गरज असते.
कडुनिंबाचा वापर अनेक प्रकारांनी शेतकर्यांना होतो. बियाणे उपचारित करण्यासाठी परंपरागत कडुनिंबाच्या तेलाचा वापर शेतकरी करतात. एक किलो बियाण्यासाठी 20 मिलीलिटर तेल पुरेसे असते. या तेलामुळे भुंगे, कीटक, पतंग आणि अनेक प्रकारच्या किडींपासून बियाणे सुरक्षित होते. कडुनिंबाचे तेल आणि एरंडीचे तेल एकास एक या प्रमाणात मिसळल्यास तेही परिणामकारक ठरते. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयाबीन आणि शेंगदाणा तेलाचाही वापर अनेक ठिकाणी केला जातो. सिट्रोनेला पानांपासून तयार केलेली उत्पादनेही धान्याच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त आहेत.
साठवणूक करावयाची ठिकाणे स्वच्छ आणि कोरडी असावीत. उन्हाळ्यात कीटक आणि अन्य जीवाणू हिवाळ्याच्या तुलनेत अधिक सक्रिय असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांतच धान्यावर संस्करण करणे आवश्यक असते. साठवणूक पोत्यांमध्ये केली असेल किंवा पेट्यांमध्ये, त्याला छिद्रे असू नयेत आणि असल्यास ती भरून घ्यावीत. तसेच ज्या खोलीत साठवणूक केली जाते, तेथेही छिद्रे, फटी असू नयेत. धान्याच्या साठवणुकीचे ठिकाण बदलायचे असल्यास काळजी घ्यायला हवी. केवळ स्वच्छ आणि कोरड्या धान्याचीच साठवणूक केली जावी. धान्यात ओलसरपणा राहिल्यास किडींचा हल्ला होतो. त्याचप्रमाणे भुसा, धूळही किडींना आकर्षित करते आणि त्यांच्या प्रजननास साह्यभूत ठरते. दीर्घकालीन साठवणूक करण्यापूर्वी उन्हात धान्य कडक वाळविणे अत्यावश्यक ठरते. साठवणुकीच्या ठिकाणाबरोबरच ज्या वाहनातून धान्याची वाहतूक केली जाते, तेही कोरडे आणि स्वच्छ असेल, याची दक्षता घेण्यात यावी. प्रक्रिया केलेली असली, तरी साठवणूक केल्यानंतर धान्याच्या परिस्थितीवर कायम देखरेख असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे घरगुती पद्धतीने साठवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असून, प्राचीन काळापासून ते अंमलात आणले जात आहेत. साठवणुकीच्या सुविधा नाहीत म्हणून चिंता करण्यापेक्षा शेतकर्यांनी पारंपरिक पद्धती वापरून धान्याचे जास्तीत जास्त संरक्षण करण्याचा प्रयत्न करावा.
सतीश जाधव