‘प्‍लग ट्रे’चे नवतंत्रज्ञान

‘प्‍लग ट्रे’चे नवतंत्रज्ञान

Published on

कृषितंत्र

भाज्यांची रोपे तयार करण्यासाठी मुख्यत्वे रोपवाटिकेचा म्हणजेच नर्सरीचा वापर केला जातो. परंतु, आता प्लग ट्रे तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर भाज्यांची रोपे तयार करणे हा एक शहरी लघुउद्योग बनण्याच्या वाटा खुल्या झाल्या आहेत. बंदिस्त वातावरणात मातीविरहित माध्यमात रोपांची उगवण करणे आणि नंतर ती शेतात लावण्याची प्रक्रिया रोगविरहित आणि अधिक सुलभ ठरणार आहे. मातीचा वापर रोपांच्या उगवणीसाठी होतच नसल्यामुळे मातीतून पसरणारे रोग आणि किडींपासून रोपे मुक्‍त राहू शकतील आणि प्रारंभिक काळात गुणवत्ता चांगली राहिल्याने पुढे शेतातही रोपे चांगलेच मूळ धरतील.

भाज्यांच्या शेतीसाठी रोपे तयार करण्याच्या प्रक्रियेला शहरी लघुउद्योगाचे स्वरूप येण्याचा दिवस आता फार दूर नाही. शहरी विभागांत 'प्लग ट्रे' या तंत्रज्ञानाने भाज्यांच्या रोपांची उगवण करण्याची तयारी सुरू झाली आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बीजापासून भाज्यांची शंभर टक्के उगवण आणि रोगविरहित रोपे मिळविणे शक्य आहे. या तंत्रज्ञानातून उगवण झालेल्या रोपांची काळजी घेणेही सोपे असते. याचे मुख्य कारण म्हणजे 'प्लग ट्रे'च्या माध्यमातून भाज्या पिकविण्यास कमीत कमी जागेची गरज असते. या तंत्रज्ञानातून उगवण झालेली रोपे वाटिकेतील रोपांच्या तुलनेत चांगली आणि गुणवत्तापूर्ण असतात. एका 'प्लग ट्रे'च्या माध्यमातून सुमारे शंभर रोपांची उगवण करता येऊ शकते आणि जागा कमी लागत असल्याने देखभाल सुलभ होऊन दुहेरी फायदा होतो. 'प्लग ट्रे'च्या प्रत्येक कप्प्याचा आकार एक इंच बाय दोन इंच एवढा असतो.

'प्लग ट्रे'मध्ये टोमॅटो, मिरची, काकडी, टरबूज, खरबूज, फ्लॉवर, कोबी, ढबू मिरची आदी भाज्यांच्या रोपांची उगवण सहजगत्या केली जाऊ शकते. फळांच्या रोप उगवणीसाठी प्रो-ट्रेमध्ये विशिष्ट आकाराच्या माध्यमाचा वापर केला जातो. कोकोपीट, परलाईट आणि वर्मिक्युलाईट ही माध्यमे आणि त्यांचे मिश्रण 3:1:1 असे ठेवले जाते. याखेरीज केवळ कोकोपीटचाही वापर केला जाऊ शकतो. परंतु, कोकोपीटचा वापर करण्यापूर्वी त्याची विद्युत वाहकता (ईसी) माहीत असायला हवी. जर कोकोपीटची विद्युत वाहकता 1 किंवा त्यापेक्षा जास्त होत असेल, तर ती रोपांसाठी धोकादायक ठरू शकतेे. कोकोपीटची विद्युत वाहकता कमी करण्यासाठी कॅल्शियम नायट्रेटचा वापर केला जातो. त्यानंतर शुद्ध पाणी किंवा पावसाच्या पाण्याने कोकोपीट धुवून घेतले जाते. त्यामुळे कोकोपीटची विद्युत वाहकता एकपेक्षा कमी होण्यास मदत होते आणि त्यानंतर त्याचा सुलभपणे वापर केला जाऊ शकतो.

ट्रेमध्ये वापरली जाणारी सर्व माध्यमे मातीविरहित असल्यामुळे ती जवळजवळ रोगमुक्‍त असतात.

प्रो ट्रेच्या प्रत्येक रकान्यात कोकोपीटचे मिश्रण घातले जाते आणि प्रत्येक रकान्यात एकेक बी पेरले जाते. त्यानंतर व्हर्निक्युलाईट आणि परलाईटच्या पातळ आवरणाने ते झाकले जाते. हिवाळ्याच्या दिवसांत बीजांकुरणासाठी काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याची गरज असते. कारण, तापमान अत्यंत कमी असते आणि त्यामुळेच ज्या खोलीचे तापमान 25 अंश असेल, अशा खोलीची निवड केली जाते, जेणेकरून शंभर टक्के उगवण होऊ शकेल.

ट्रेमध्ये जेव्हा बीजांकुरण होते, तेव्हा ते ट्रे ग्रीन हाऊस किंवा वॉकिंग टनेलमध्ये ठेवले जातात. परंतु, सर्वाधिक काळजी घेण्याजोगी बाब म्हणजे ग्रीन हाऊस किंवा वॉकिंग टनेलचे नेट कीटरोधक (इन्सेक्ट प्रूफ) असायला हवे. तसेच ही जाळी सुमारे 40 मेशची असायला हवी. असे असल्यास पांढरी माशी, थ्रिप्स आदी कीटकांपासून रोपे सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे हिरव्या जाळीचा वापर केला जातो. या जाळीतून पांढरी माशी, थ्रिप्स असे कीटक आत येऊ शकत नाहीत. कीटकांपासून सुरक्षित राहिल्यास विषाणूजन्य आणि इतर रोगांपासून रोपे मुक्‍त राहतात. विषाणूजन्य रोगांमुळे रोपांची पाने दुमडली जाऊ शकतात. म्हणूनच किमान 40 मेशची इन्सेक्ट प्रूफ जाळी असणे गरजेचे आहे.

कोकोपीट हे माध्यम नारळाच्या शेंड्यांपासून बनविले जाते, याचे कारण म्हणजे नारळाच्या शेंडीत रोपांची मुळे सुलभतेने रुजू शकतात. कोकोपीटची धारणक्षमताही चांगली असते. पाण्याचा निचरा होण्याचा कोकोपीटचा गुणधर्म येथे उपयुक्‍त ठरतो. परलाईट या माध्यमाची निर्मिती ज्वालामुखीपासून तयार झालेल्या दगडापासून केली जाते. ज्वालामुखीची उष्णता किमान 980 अंशांहून अधिक असल्यामुळे त्यापासून हे उत्तम माध्यम तयार होऊ शकते. या माध्यमाचा रंग जवळजवळ पांढराच असतो आणि ते वजनाला खूप हलके असते. परलाईटमध्येही मुळे चांगली रुजतात आणि मुळांना हवा मिळणेही सुलभ होते. मुळांना ऑक्सिजन मुबलक प्रमाणात मिळू शकतो. व्हर्मिक्युलाईट हे माध्यम गंधमुक्‍त आणि स्टेराईल प्रवृत्तीचे असते आणि ते सहसा खराब होत नाही. पाणी धारणक्षमता मोठी असलेले हे माध्यम रोपांच्या मुळांना सुलभतेने हवा मिळवून देणारे आहे.

व्हर्मिक्युलाईटमध्ये काही खनिजेही असतात आणि रोपांच्या वाढीसाठी ती पोषक ठरतात. व्हर्मिक्युलाईटचा वापर केल्यामुळे रोपे बुरशी आणि किडीपासून मुक्‍त राहू शकतात. थंडीच्या दिवसांत रोपे तयार करताना खूपच सावधगिरी बाळगावी लागते. ग्रीनहाऊस किंवा अन्य संरक्षित क्षेत्रात रात्रीच्या वेळी तापमान नियंत्रित करण्यासाठी हीटरचा उपयोग करावा लागतो. थंडीच्या दिवसांत रोपांच्या प्राथमिक अवस्थेत 70 पीपीएम मिश्रण तसेच 1:1:1 प्रमाणात पोटॅश, नायट्रोजन आणि फॉस्फोरसचा वापर केला जातो. रोपांची वाढ झाल्यानंतर हे प्रमाण 140 पीपीएम या दराने प्रत्येक आठवड्याला वाढवत नेले जाते.

उन्हाळ्याच्या दिवसांत बी पेरल्यानंतर प्लग ट्रे खोलीत ठेवण्याची आवश्यकता नसते. कारण, तापमान जास्त असते. या दिवसांतही सुरुवातीच्या काळात रोपांना 70 पीपीएम मिश्रण तसेच 1:1:1 प्रमाणात पोटॅशियम, नायट्रोजन आणि फॉस्फोरस दिले जाते. तापमान 20 ते 30 अंशांच्या दरम्यान असेल, तेव्हाच हे मिश्रण दिले जाते. प्लग ट्रेद्वारे रोपे तयार करण्यासाठी सुमारे महिन्याभराचा कालावधी लागतो. 20 किलो माध्यमात (3:1:1) 50 ग्रॅम 19:19:19 सुरुवातीच्या काळात मिसळले जाते. त्यामुळे रोपांना 25 दिवसांपर्यंत पोषण मिळत राहते आणि रोपे तरतरीत तसेच गुणवत्तापूर्ण तयार होतात. प्लग ट्रेमध्ये रोपांच्या वाढीसाठी द्रवरूप खत दिले जाते. खत आणि पाणी देण्यासाठी फवारा पद्धतीच्या वॉटर कॅनचा वापर केला जातो. त्यामुळे सर्व रोपांना समप्रमाणात पाणी आणि खत मिळू शकते आणि रोपांची गुणवत्ता चांगली राहते. प्रो ट्रेमध्ये तयार केलेली रोपे शेतात लावण्यापूर्वी हार्डनिंग प्रक्रिया केली जाते.

जेव्हा रोप जवळजवळ तयार होते, तेव्हा हार्डनिंग प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत सुरुवातीच्या काळात प्लग ट्रे दुपारच्या नंतर जेव्हा सौम्य ऊन असते तेव्हा सूर्यप्रकाशात ठेवले जातात. दुसर्‍या दिवशी ट्रे आणखी थोड्या कडक उन्हात ठेवले जातात. ही प्रक्रिया याच क्रमाने तीन ते चार दिवस केली जाते. तिसर्‍या दिवशी मध्यान्हीच्या उन्हात रोपे ठेवली जातात तर चौथ्या दिवशी पूर्ण दिवसभर रोपे उन्हात ठेवली जातात. या प्रक्रियेमुळे रोपे बाहेरील वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता धारण करतात. हार्डनिंग प्रक्रियेनंतर जेव्हा रोपे तयार होतात, तेव्हा माध्यमासहित त्यांची काढणी करून रोपे शेतात लावली जातात. या वेळेपर्यंत रोपांच्या मुळांचा विकास पूर्णपणे झालेला असतो. त्यामुळे शेतात पिकाची वाढ जोमदारपणे होते. तसेच, शेतात आलेल्या रोपांची गुणवत्ताही अत्यंत उत्कृष्ट असते.

– विलास कदम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news