फळपीक : सीताफळ लागवडीतून करा अर्थार्जन - पुढारी

फळपीक : सीताफळ लागवडीतून करा अर्थार्जन

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात येणारे पीक म्हणून सीताफळाचा उल्लेख कराचा लागेल. द्राक्ष, अंजीर, आंबा, संत्रा आदी फळांच्या लागवडीसाठी भरपूर प्रमाणात पाणी आणि पैशांची आवश्यकता असते. त्यामुळे राज्यातील गरीब शेतकरी बागायती लागवड करायचे म्हटले तरी तोंड वाकडे करतो. परंतु अशा शेतकर्‍यांसाठी कमी खर्चात जास्त उत्पन्‍नाची हमखास हमी देणारे पीक म्हणून सीताफळ प्रसिद्ध आहे.

कोरडवाहू फळझाडांमध्ये सीताफळ हे एक महत्त्वाचे फळपीक आहे. सीताफळाची शास्त्रीय पद्धतीने लागवड केली तर यातही भरपूर उत्त्पन्न मिळवता येते.

सीताफळाची लागवड प्रामुख्याने आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, बीड, जळगाव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, भंडारा आदी जिल्ह्यांमध्ये सीताफळाची झाडे, बागा मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. त्यात पुणे व दौलताबाद येथील सीताफळे आपल्या चवीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. मराठवाड्यातील धारूर व बालाघाट ही गावे सीताफळासाठी प्रसिद्ध आहेत. विदर्भात पवनी, भंडारा, गोंदिया, वाशिम, माहूर; तर सातारा जिल्ह्यात शिरवळ, कवठे, जेवळे, वाल्हे आणि खंडाळा; फलटण तालुक्यातील काही भाग सीताफळाच्या यशस्वी लागवडीतून चांगलाच नावारूपाला आला आहे.

सीताफळाची पाने शेळ्यामेंढ्या, जनावरे किंवा इतर कोणताही प्राणी खात नाही म्हणून कोणत्याही प्रकारचे संरक्षण न करताही या फळझाडाची जोपासना सहज करता येते. बागेमध्ये कुंपणाच्या बाजूने या फळझाडाची लागवड करणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे बरड जमीन, ओलाव्याची जागा, नदीकाठची जमीन, शेताचे बांध, माळराने, डोंगर, उताराच्या जमिनी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींमध्ये या पिकाची लागवड करता येते.

सीताफळाच्या झाडातील रसायनांमध्ये औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्म असतात. याच्या पानांचा वापर कडवट औषधे बनविण्यासाठी केला जातो, तर बियांपासून तेलनिर्मितीही करता येते. या तेलाचा उपयोग प्रामुख्याने साबण निर्मितीमध्ये होतो. सीताफळाची भुकटी(पावडर) करून ती आइस्क्रीम बनविण्यासाठीही वापरली जाते. तसेच सीताफळाची मोठी झाडे जुनी झाली असता त्याच्या खोडावरील खरखरीत सालींची आणि वेड्यावाकड्या टणक वाळवेल्या फळांची कुटूक बारीक पावडर करून ती कातडी कमविण्याच्या व्यवसायामध्ये वापरण्यात येते.

महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता, सीताफळाची लागवड होण्यास भरपूर वाव आहे. अत्यंत कोरड्या रखरखीत व उष्ण हवामानाच्या प्रदेशापासून भारी पाऊसमानाच्या हवामाना पर्यंतच्या प्रदेशात सीताफळाची वाढ होते. मात्र उष्ण व कोरड्या हवामानातील सीताफळे चवीला गोड आणि उत्कृष्ट दर्जाची असतात. कोकणासारख्या जास्त दमटपणा असलेल्या भागातही सीताफळाची लागवड होते.

मात्र अशा वातावरणातील फळे आकाराने लहान असतात; परंतु ही झाडे सदैव हिरवीगार असतात. कमी पावसाच्या प्रदेशामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी याकाळात या झाडांची पानगळती होऊन झाडे विश्रांती घेतात. मात्र कडक थंडी आणि धुके या पिकास हानिकारक ठरते. थंड हवामानामध्ये फळे घट्ट व टणक राहून पिकत नाहीत. झाडाला मोहोर येण्याच्या काळात कोरडी हवा आवश्यक असते. पावसाळा सुरू झाला की झाडांना फळधारणा होते. पावसाळ्यात या झाडांना चांगली फळधारणा होत असली तरीही अतिपाऊस या फळासाठी चांगला नसतो.

सीताफळाची लागवड प्रामुख्याने बियांपासून रोपे तयार करून केली जाते. ताजे बी तीन दिवस पाण्यात भिजत टाकून नंतर पेरावे. रोप गादीवाफ्यावर किंवा पॅालिथीनच्या पिशवीत तयार करून पावसाळ्यामध्ये शेतात लावाव्यात. एकदा का ही रोपे पावसाळा संपेपर्यंत जगली तर त्यापुढील अवर्षणग्रस्त काळातही ती वाढू शकतात. यात कलमे करण्यासाठी स्थानिक सीताफळीच्या खुंटाचा वापर करता येतो. तसेच छाटे वापरूनही या झाडाची अभिवृद्धी होते. मात्र या छाट्यांची अभिवृद्धी लवकर होत नाही. छाटे घेण्यापूर्वी त्याच्या फांद्या जमिनीत गाडून नंतर त्या फाद्यांची छाटे घेऊन त्यांना पाच हजार पीपीएम एनएएचा वापर करून अतिसूक्ष्म तुषारगृहांमध्ये ठेवल्यास छाट्यांना मुळ्या फुटतात.

सीताफळांच्या झाडांना सहसा नियमितपणे खते दिली जात नाहीत. परंतु मोठे फळ व चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी पावसाळा सुरू झाल्याबरोबर प्रत्येक झाडाच्या बाजूने 2 ते 3 पाट्या कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत देणे योग्य ठरते. पाच वर्षांपुढील प्रत्येक झाडाला पाच ते सात पाट्या शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि दोनशे ते पाचशे ग्रॅम युरिया द्यावा.

सीताफळ निसर्गतःच काटक फळझाड असल्याने वरच्या पाण्याशिवाय वाढू शकते. सीताफळाच्या पिकाला नियमित पाण्याची आवश्यकता नसते. निव्वळ पावसाच्या पाण्यावरही चागले उत्पन्न येऊ शकते. मात्र झाडाला पहिले तीन ते चार वर्षे उन्हाळ्यात पाणी दिल्यास झाडांची वाढ चांगली होते. त्याचप्रमाणे फळधारणेनंतर साधारणपणे सप्टेंबर-अ‍ॅाक्टोबर महिन्यात पाण्याच्या एक ते दोन पाळ्या दिल्यास भरपूर व मोठी फळे मिळतात.

बहुधा सीताफळाची लागवड केल्यापासून 5 ते 6 वर्षांनी फळे मिळू लागतात. कलमे केलेल्या झाडांना 3 ते 4 वर्षांत फळे लागण्यास सुरुवात होते. झाडाला फुले आल्यावर पाच महिन्यांच्या कालावधीत फळे तयार होतात. दिवाळीच्या सुमारास सीताफळ बाजारात दिसते. शेतकर्‍यांनी सर्वसाधारणपणे सीताफळाच्या बहरात फळधारणेपासून 100 ते 130 दिवस काढणीसाठी ग्राह्य धरावेत. अशा वेळी फळांचे खवले(कडा) उकलू लागल्या व आतील दुधाळ भाग किंचित दिसू लागला की फळे तयार झाली असे समजावे व फळांची काढणी करावी. प्रतवारीसाठी झाडावर आलेली फळे काढून आकाराप्रमाणे निवडून काढावीत.

मोठी व आकर्षक फळे निवड करून ‘अ’ ग्रेड ची म्हणून बाजूला काढावीत. मध्यम आकाराची फळे ‘ब’ आणि राहिलेली लहान फळे ‘क’ ग्रेडची म्हणून निवडावीत. स्थानिक बाजारपेठांकरिता माल पाठवायचा असल्यास उपलब्धतेनुसार बांबूच्या करंड्यात खालीवर कडुलिंबाचा पाला घालून त्यात फळे व्यवस्थित भरावीत व विक्रीसाठी पाठवावीत. लहान आकाराची फळे शक्यतो स्थानिक बाजारपेठेमध्ये पाठवावीत. सीताफळ हे जास्त नाशवंत फळ आहे. यामुळे याचा साठा करून ठेवता येत नाही. मोठ्या प्रमाणावर व्यापारी उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांनी सामूहिकपणे शीतगृहाची उभारणी केल्यास या फळासाठी शीतगृहातील साठवणुकीचे तापमान 39 ते 42 फॅरनहीट्स, तर आर्द्रता 45 ते 90 टक्के ठेवायला हवी.

यामुळे साठवणुकीचा कालावधी 5 ते 6 आठवडे राहतो. सीताफळाचा उपयोग मार्मालेट, जाम, डबाबंद सीताफळ (कॅनिंग), आइस्क्रीम बनविण्यासाठी, सीताफळाची भुकटी(कस्टर्ड पाउडर) आदी प्रक्रियांमध्ये होतो. अशा प्रकारे जिरायतीपासून ते बागायतीपर्यंतच्या शेतकर्‍यांसाठी कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून सीताफळ योग्य आहे.
– सत्यजित दुर्वेकर

 हेही वाचलंत का?

Back to top button