हरभरा पिकावरील घाटेअळीचे नियंत्रण कसे करावे? | पुढारी

हरभरा पिकावरील घाटेअळीचे नियंत्रण कसे करावे?

सद्यस्थितीत हरभरा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. साधारणतः, 15-20 दिवसांनंतर फुलोरा अवस्थेत प्रवेश करेल व यादरम्यान या घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटेअळी ही हरभरा पिकाची प्रमुख कीड असून, या किडीची मादी पतंग पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यांवर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखशीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून 2-3 दिवसांत अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरितद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोड्या मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्‍त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पीक फुलोर्‍यावर आल्यावर या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व या अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणतः 30-40 घाट्यांचे नुकसान करते.

एकात्मिक व्यवस्थापन :
घाटे अळीचे परभक्षक उदा., बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पिकामध्ये फिरून घाटेअळ्या वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी कीटकनाशकांची फवारणी केल्यास पक्षी कीटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे कीटकनाशकाचा जास्त वापर टाळावा.

ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल त्या शेतामध्ये बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रतिहेक्टर 20 पक्षी थांबे) तयार करून शेतामध्ये लावावे. त्यामुळे पक्ष्यांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते.

कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटेअळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्युर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यामध्ये सतत तीन दिवस आठ ते दहा पतंग आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.

शेतकरी बंधूंनी आपला पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा 40 ते 50 टक्के पीक फुलोर्‍यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी खालील दोन फवारण्या 10 लिटर पाण्यात मिसळून कराव्या.
पहिली फवारणी (50 टक्के फुलोर्‍यावर असताना)

1) निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एच.ए.एन.पी.व्ही. (1109 पीओबी/मि.लि.) 500 एल. ई./हे. किंवा
2) क्‍विंनॉल्फॉस 25 ई.सी., 20 मि.लि..

दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीच्या 15 दिवसांनंतर)

1) इमामेक्टिन बेंजोएट 5 टक्के एस.जी. 3 ग्रॅम किंवा
2) इथिऑन 50 टक्के ई.सी. 25 मि.लि. किंवा
3) फ्लूबेंडामाईड 20 टक्के डब्ल्यू.जी. 5 मि.लि. किंवा
4) क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल 18.5 टक्के एस.सी. 2.5 मि.लि.

– विकास पाटील, कृषी संचालक, कृषी आयुक्‍तालय, पुणे

 

Back to top button