

खाद्य तेल उत्पादनामध्ये भुईमुगानंतर सूर्यफुलाचा वापर केला जातो. सूर्यफुलाच्या (sunflower) बियांमध्ये 35 ते 45 टक्के तेल असते. सूर्यफुलाच्या तेलातील लिनोलिक आम्ल आपल्या रक्तामधील वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करत असते. रक्ताभिसरण चांगले व्हावे याकरिता सूर्यफुलाचे तेल अत्यंत उपयुक्त ठरते. या कारणामुळेच सूर्यफुलाच्या पिकाला मागणी वाढू लागली आहे. शेतकर्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे.
सूर्यफुलाचे पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात घेतले जाते. ज्या शेतकर्यांना शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नाही अशांकरिता सूर्यफूल लागवड हा उत्पन्नवाढीचा चांगला पर्याय ठरू शकतो. राज्यात सूर्यफुलाच्या एकूण लागवडीपैकी 40 टक्के लागवड खरीप हंगामात तर उर्वरित रब्बी आणि उन्हाळी हंगामात केली जाते. बागायती जमिनीत सूर्यफुलाची लागवड अधिक फायदेशीर ठरते.
सूर्यफुलाचे तेल हृदयाच्या आरोग्याला चांगले असल्याचे सिद्ध झाल्याने सूर्यफुलाच्या बियाणांना सध्या बाजारात मोठी मागणी आहे. या सूर्यफुलाला बाजारात चांगला बाजारभाव मिळत आहे. 80 ते 100 दिवसांत येणारे हे पीक अत्यंत कमी पाण्यातही येते. त्यामुळे या पीकासाठी फारसा खर्च येत नाही. या पिकावर येणार्या किडीचा आणि रोगांचा वेळीच बंदोस्त केला तर यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. सूर्यफुलाबरोबर जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन करावे असा सल्ला दिला जातो.
गेल्या काही वर्षांमध्ये कोकणातही अनेक शेतकरी सूर्यफुलाची लागवड करू लागले आहेत. खतांचे आणि पाण्याचे योग्य नियोजन केले तर यातून चांगले उत्पादन मिळू शकते. फुलकळी ते दाणे भरण्याच्या अवस्थेत या पिकाला पाणी द्यावे लागते. या काळात पाण्याचा ताण पडला तर दाणे भरत नाहीत. ते पोकळच राहतात. त्यामुळे लागवडीपासून पाण्याचे नियोजन करावे लागते. या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी प्रतीची जमीन आवश्यक असते.
पाणथळ जमिनीत तसेच आम्लयुक्त जमिनीत सूर्यफुलाचे पीक चांगले येत नाही. लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करावी लागते. कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. अखेरच्या कुळवाच्या पाळीअगोदर हेक्टरी 20 ते 25 गाड्या एवढ्या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. (sunflower)
रब्बी सूर्यफुलाची लागवड ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापासून नोव्हेंबरपर्यंत/डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत केव्हाही करावी. दोन चाड्याच्या पाभरीने सूर्यफुलाची पेरणी करावी. असे केल्याने बी आणि खत एकाच वेळी पेरता येते. सूर्यफुलाचे बियाणे पाच सेंटिमीटरपेक्षा अधिक खोल पेरू नये. बागायती पिकाची लागवड करताना सरी-वरंब्यावर टोकन पद्धतीने करावे.
लागवडीसाठी सुधारित वाणाचे सात ते आठ किलो बियाणे आणि संकरीत वाणाचे पाच ते सहा किलो बियाणे प्रती हेक्टरी वापरावे लागते. रोग पडू नयेत याकरिता दोन ते अडीच ग्रॅम थायरम प्रती किलो बियाण्याला चोळावे लागते. पेरणीपूर्वी प्रतीकिलो 25 ग्रॅम एवढे हेझॅटोबॅक्टर बियाण्याला चोळावे लागते. कोरडवाहू पिकाला प्रतिहेक्टरी अडीच टन शेणखत, गावखत, 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश पेरणीच्या वेेळेला दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे.
बागायती पिकाला प्रतिहेक्टरी 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद, 30 किलो पालाश या प्रमाणात पेरणीच्या वेळी द्यावे लागते. उरलेल्या 30 किलो नत्राची मात्र पेरणी झाल्यावर एक महिन्याच्या आत द्यावी लागते. ज्या जमिनीत गंधकाचे प्रमाण कमी आहे अशा जमिनीत प्रती हेक्टरी 20 किलो याप्रमाणे गांडूळ खतातून गंधक पेरणीवेळी दिले पाहिजे. पेरणी झाल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांनी म्हणजे 15-20 दिवसांनी दोन रोपातील अंतर 30 सेंटिमीटर ठेवून विरळणी करावी. पेरणीनंतर दोन आठवड्यांनी एक खुरपणी करणे आवश्यक आहे. खुरपणीनंतर दोन कोळपण्या कराव्यात.
पहिली कोळपणी पेरणीनंतर तीन आठवड्यांनी म्हणजे साधारण 20 दिवसांनी व दुसरी कोळपणी पाच ते सहा आठवड्यांनी म्हणजे 35 ते 40 दिवसांनी केली पाहिजे. सूर्यफुलाचे पीक फुलोर्यात असताना सकाळी सात ते अकरा या काळात हाताला तलम कापड गुंडाळावे आणि फुलाच्या तबकावरून हळू हात फिरवावा. असे केल्याने कृत्रिम परागीभवन होते आणि दाणे भरण्याचे प्रमाण वाढते. फुल उमलण्याच्या अवस्थेत असताना दोन ग्रॅम बोरॅक्स प्रतिलिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी लागते. या फवारणीमुळे दाणे भरण्याचे प्रमाण वाढते. तसेच दाण्याचे वजनही वाढते. (sunflower)
परागीभवन होण्याकरिता हेक्टरी चार ते पाच मधमाश्यांच्या पेट्या ठेवाव्या लागतात. सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोलवर जात असतात. त्यामुळे एकाच जमिनीत वारंवार हे पीक घेतले तर जमिनीचा पोत खराब होतो आणि उत्पादन क्षमता कमी होते. म्हणून कमीत कमी तीन वर्षे त्या जमिनीत सूर्यफुलाचे पीक घेऊ नये. फेरपालट करून हे पीक घ्यावे. कडधान्य सूर्यफूल, तृणधान्य सूर्यफूल अशा पद्धतीने पिकांची फेरपालट करावी. पीक फुलोर्यात असताना त्यावर कीटकनाशक फवारू नये. या पिकावर सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेचा परिणाम होत नाही.
म्हणूनच सूर्यफुलाचे पीक कोणत्याही हंगामात घेता येते. या पिकाला फार कमी पाणी लागते. मात्र, सुरुवातीच्या अवस्थेत आवश्यक तेवढे पाणी कोणत्याही परिस्थितीत दिले पाहिजे. पेरणीनंतर पाणी देण्यासाठी जमिनीत सरी पाडून घेतल्या पाहिजेत. या पिकावर मर रोग येऊ नये याकरिता दोन ते अडीच ग्रॅम थायरम, केवडा रोग येऊ नये याकरिता सहा ग्रॅम मेटॅलॅग्झील, नेक्रॉसीस रोग येऊ नये याकरिता इमीडाक्लोप्रीड अशी औषधे फवारावी लागतात. या औषधांमुळे पिकांवर रोग आणि कीड येत नाही.
रोग आणि किडीमुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट होत असते. हे लक्षात घेऊन औषधांची फवारणी वेळेतच करणे आवश्यक ठरते. पिकावर मावा आणि तुडतुडे येऊ नये याकरिता डायमिथोएट 20 मिलीलिटर प्रतिदहा लिटर पाणी या प्रमाणात फवारले पाहिजे. सूर्यफुलावर केसाळ आळी येत असते. त्याकरिता आळ्यांचे पुंजके वेचावे लागतात आणि ते रॉकेल मिसळलेल्या पाण्यात टाकावे लागतात. केसाळ आळी नष्ट करण्यासाठी वारा नसताना प्रतिहेक्टरी 25 किलो या प्रमाणात कारबारीलची फवारणी करावी. याखेरीज एचएनपीव्ही या कीटकनाशकांचीही फवारणी करावी लागते. बागायती सूर्यफुलापासून प्रतिहेक्टरी 15 ते 20 क्विंटल एवढे उत्पादन मिळते.
सूर्यफुलाची पाणे, देट व फुलाची मागची बाजू पिवळी झाल्यानंतर पिकाची कापणी करावी लागते. नंतर मळणी करावी लागते. सूर्यफुलाला तेल उत्पादकांकडून सध्या मोठी मागणी आहे हे लक्षात घेऊन अनेक शेतकरी या पिकाची लागवड करू लागले आहेत. कमी दिवसात आणि कमी पाण्यात येणारे हे पीक शेतकर्यासाठी हमखास उत्पन्नाचा मार्ग ठरते. सूर्यफुलाचे पीक फुलोर्यात असताना त्यावर कीटकनाशके फवारू नयेत. अगदीच गरज असेल तर संध्याकाळच्या वेळेला फवारणी करावी.
खाद्य तेल उत्पादनामध्ये भुईमुगानंतर सूर्यफुलाचा वापर केला जातो. सूर्यफुलाच्या बियांमध्ये 35 ते 45 टक्के एवढे तेल असते. सूर्यफुलाच्या तेलातील लिनोलीक आम्ल आपल्या रक्तामधील वाईट कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी करत असते. रक्ताभिसरण चांगले व्हावे याकरिता सूर्यफुलाचे तेल अत्यंत उपयुक्त ठरते. म्हणूनच हृदयविकार असणार्या व्यक्तींकरिता सूर्यफुलाच्या तेलाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. (sunflower)
सूर्यफुलाच्या पिकाला या कारणामुळेच मागणी वाढू लागली आहे. चांगल्या उत्पादनासाठी काही शेतकर्यांनी हळवे बियाणे वापरले आहे. 90 दिवसांत येणारे हे संकरीत बियाणे चांगले उत्पन्न मिळवून देणारे ठरल्याचे सिद्ध झाले आहे. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी वर्धमान 10:26:26 10 किलो या प्रमाणात वापरले जाते. सूर्यफुलात दाणे भरण्यापूर्वी फुलधारणेच्या अवस्थेत सकाळी फुलांवरून मलमलच्या कपड्यांनी हात फिरवल्यामुळे चांगले उत्पादन वाढल्याचे दिसून आले.
सूर्यफुलाच्या पिकाचे संवेदनक्षम अवस्थेत काळजी घेणे आवश्यक असते. या काळात या पिकाकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तर उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. रोप अवस्था, फुलकळी अवस्था, फुलोर्याची अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था या संवेदनक्षम अवस्थेत पिकाला कोणत्याही स्थितीत पाणी कमी पडू देऊ नका. फुलकळी अवस्थेपासून दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत पाण्याचा ताण पडला तर उत्पादन कमी होते. सूर्यफुलाचे बियाणे जमिनीत पाच सेंटिमीटरपेक्षा अधिक खोल पेरू नये. (sunflower)
– विलास कदम