वेळीच करा केसाळ अळीचे नियंत्रण | पुढारी

वेळीच करा केसाळ अळीचे नियंत्रण

अलीकडे विविध पिकांवर केसाळ अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या नष्ट करण्यासाठी शेतकर्‍यांनी एकत्र येऊन सामूहिकरीत्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्यास त्यावर निश्चितपणे नियंत्रण मिळवता येते.

केसाळ अळींचा प्रचंड प्रादुर्भाव काही भागात आढळतो. यामागे नष्ट झालेली वनराई हे प्रमुख कारण आहे. जंगलातील खाद्य नष्ट झाल्यामुळे केसाळ अळ्या शेतातील पिकांवर दिसू लागल्या आहेत. केसाळ अळींच्या नियंत्रणासाठी शासनाच्या कृषी विभागाने काही शिफारसी केल्या आहेत. त्या शिफारसी शेतकरी बंधूंनी सामूहिकरित्या राबवल्यास केसाळ अळींचे नियंत्रण शक्य होईल.

केसाळ अळींचे कोष जमिनीत सुप्तावस्थेत जातात. म्हणून एप्रिल महिन्यात खोल नांगरट केल्यास अळींचे कोष वर येतील. प्रखर उष्णतेमुळे आणि पक्ष्यांनी वेचून खाल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोष नष्ट होऊन अळींची पुढची पिढी नष्ट होईल.

पावसाळा सुरू झाला म्हणजे कोषातून पतंग बाहेर पडतात. हे पतंग प्रकाशाकडे आकर्षिले जातात. म्हणून रात्री शेतात बल्ब किंवा कंदिल ठेऊन त्याखाली रॉकेलमिश्रित पाण्याने भरलेले घमेले ठेवल्यास पतंग प्रकाशाकडे आकर्षित होऊन घमेल्यात पडून नष्ट होतील.

अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सामूहिकरित्या शेतातील पीक खाण्याकरिता एका शेतातून दुसर्‍या शेतात येतात. म्हणून आपल्या शेताच्या चहूबाजूने पाणी साचेल असा चर काढावा. या चरात मिथिल पॅराथिऑन भुकटी (लिंडेन) 2 टक्के किंना क्विनॉलफॉस 1.5 टक्के टाकावे. यामुळे लहान अळ्या लवकर मरतील. मादी पतंग गवताच्या पानाखाली अंडी घालत असल्यामुळे शेतीचे बांध व्यवस्थित खुरपून काढावेत.

शेतात मध्यम आकाराच्या अळ्या दिसतील तेव्हा मिथिल पॅराथिऑन (लिंडेन) 2 टक्के किंवा क्विनॉलफॉस 1.5 टक्के भुकटी टाकावी. पाच टक्के निंबोळीअर्काची फवारणी करावी. दोन मिली क्विनॉलफॉस किंवा क्लोरापायरीफॉस 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

मोठ्या झालेल्या अळ्या औषधाला दाद देत नाहीत. म्हणून टोकदार काठीने अळ्या जमिनीवर माराव्यात. वरील सर्व उपाययोजना शेतकरी बंधूंनी एकत्र येऊन राबवल्या तरच या केसाळ अळींचे नियंत्रण शक्य आहे.

– सतीश जाधव

Back to top button