हिरव्या लुसलुशीत चार्‍यासाठी… | पुढारी

हिरव्या लुसलुशीत चार्‍यासाठी...

शेतकर्‍यांचे आणि पाळीव जनावरांचे एक भावनिक नाते असते. त्यामुळे जनावरांना अन्न देताना शेतकरी आपल्या अन्नाइतकीच काळजी घेत असतो. विशेषतः चार्‍याबाबत शेतकरी कटाक्ष बाळगतात.

जनावरांना हिरवा लुसलुशीत चारा देण्याचा प्रत्येक शेतकर्‍याचा प्रयत्न असतो. अलीकडच्या काळात बरसीम या द्विदलवर्गीय चारा पिकाची शेतकरी लागवड करू लागले आहेत. काही भागात घोडाघास म्हणून ओळखले जाणारे आणि मेथीसारखे दिसणारे हे चारा पीक आहे. विशेष म्हणजे अल्पावधीत भरपूर हिरवा चारा देणारे, पालेदार, रूचकर, सकस असे हे चार्‍याचे पीक असून त्यापासून 3 ते 4 कापण्या घेता येतात. या चार्‍यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 16 ते 19 टक्के इतके असते. म्हणून दुभत्या जनावरांच्या प्रकृतीला हा चारा चांगला मानवतो. आपल्याकडील पशुधनास हिरवा लुसलुशीत अथवा वाळलेला चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याच्या द़ृष्टीने बरसीमची लागवड करणे फायदेशीर ठरते.

पाण्याचा योग्य निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन या पिकास अधिक मानवते. काही खारवट जमिनीतही हे पीक घेता येते. विशेष करून भुसभुशीत जमिनीत हे पीक चांगले घेता येते. पेरणीपूर्वी 4 ते 5 टन चांगले कुजलेले शेणखत पूर्वमशगतीच्यावेळी जमिनीत मिसळून द्यावे. द्विदलवर्गीय असल्याने या पिकास नत्राची मात्रा कमी लागते. तर स्फुरदाची मात्रा जास्त लागते. पेरणीच्या वेळी 20 किलो नत्र (43 किलो युरिया), 120 किलो स्फुरद (750 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 40 किलो पालाश (65 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) दिले तर या पिकाची वाढ जोमदार होते.

थंड हवामानाला प्रतिसाद देणारे हे पीक असल्यामुळे या पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या तिसर्‍या आठवड्यापासून ते नोव्हेेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत करावी. म्हणजे या पिकास थंडीचा जास्तीजास्त काळ मिळतो आणि त्यामुळे बियाणाची उगवण आणि पिकाची शाखीय वाढ झपाट्याने होते. उशिरा पेरणी केल्यास शेवटची कापणी एप्रिलमध्ये जाते आणि उष्ण हवामानाचा उत्पन्नावर परिणाम होतो. हेक्टरी 25-30 किलो बियाणे 25 सेमी अंतरावर ओळीत पेरावे. पेरणी बी फोकून करु नये. पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम जिवाणूसंवर्धक 250 ग्रॅम प्रती 10 किलो या प्रमाणात चोळावे. पेरणीनंतर 5 बाय 3 मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावे. वरदान, मेस्कावी आणि जे बी 1 हे बरसीमचे सुधारित वाण प्रसिद्ध आहेत.

या पिकात सुरुवातीला तणांच्या नियंत्रणाकडे लक्ष द्यावे. जरुरीनुसार एक किंवा दोनदा खुरपणी करावी. दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. बरसीमची पहिली कापणी साधारणपणे 50 ते 55 दिवसांनी करावी. नंतरच्या कापण्या 21 ते 25 दिवसांच्या अंतराने कराव्यात. ऑक्टोबर पेरणीच्या बरसीमपासून 3 ते 4 कापण्या घेणे शक्य होते. अशा प्रकारे बरसीम पिकाचे व्यवस्थापन केल्यास 3 ते 4 कापण्या मिळून हेक्टरी 650-800 क्विंटल ओला चारा मिळतो.

– सतीश जाधव

Back to top button