बियाणे साठवणूक आणि कीटकनाशके | पुढारी

बियाणे साठवणूक आणि कीटकनाशके

बियाण्याच्या भांडारात होणारे अपघात टाळण्यासाठी कीटकनाशके व बुरशीनाशकांचा काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे आहे.

कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर शेतकर्‍यांनी खालीलप्रमाणे करावा-

* बियाणे भांडारात ठेवण्यापूर्वी भांडार काळजीपूर्वक स्वच्छ करून घेणे अधिक महत्त्वाचे असते. यासाठी बीजभांडारात 0.5 टक्के मेलॅथिऑनची भिंतीवर, छतावर आणि बी ठेवण्यासाठी लागणार्‍या जमिनीवर फवारणी करावी किंवा धुरीजन्य कीटकनाशके वापरली तरी चालतात.

* तसेच बियाणे भरण्यासाठी वापरलेल्या गोण्या अथवा पोती हीसुद्धा कडक उन्हात वाळवून, कीडनाशकांची प्रक्रिया करूनच वापरावे. परंतु, बी भरण्यासाठी शक्यतो नव्या गोण्याच वापरणे फायद्याचे ठरते; परंतु ते शक्य नसल्यास 0.1 टक्के मेलॅथिऑन, सायपरमेथ—ीन, फेनव्हेलरेटच्या द्रावणात 10 मिनिटे बुडवून सावलीत वाळवून वापरावीत. तसेच मेलॅथिऑन कीटकनाशकाचा फवारा 0.1 टक्के प्रमाणात रिकाम्या भांडारात व पोत्यावर मारावा किंवा स्वच्छ केलेल्या गोण्यावर बाहेरील बाजूने पायरेथ—म (0.06 टक्के भुकटी) प्रतिचौरस मीटरला 25 ग्रॅमप्रमाणे धुरळावी किंवा डी.डी.व्ही.पी. नामक धुरीजन्य कीटकनाशकाची प्रक्रिया करूनच या गोण्या वापराव्यात.

* भांडारात बियाणे साठविल्यानंतर किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमितपणे ठरावीक काळानंतर कीटकनाशकाची फवारणी मोकळ्या जागेत करणे आवश्यक असते. बियाणे साठविलेल्या पोत्यांमध्ये अथवा वर कीड आढळल्यास धुरी देणे आवश्यक असते. त्यासाठी सेल्फॉस किंवा अमिफॉस गोळ्या किंवा इ.डी.बी. द्रावण वापरतात. यासाठी बीजभांडार हवाबंद असणे फार आवश्यक असते.

* हवाबंद भांडारात 50 पोत्यांपेक्षा जास्त बियाणे नसल्यास ई.डी.बी. ते धुरीजन्य कीटकनाशक वापरावे. त्यापेक्षा जास्त बियाणे असल्यास अ‍ॅल्युमिनियम फॉस्फाईड वापरावे. एक घनमीटर (सुमारे 5 पोती) जागेतील बियांसाठी 50 मिलिमीटर इ.डी.बी. पुरेसे असते. हायड्रोजन फॉस्फाईड या गोळ्या वापरावयाच्या असल्यास 3 ग्रॅम वजनाची एक गोळी 10 पोत्यांना पुरते. याशिवाय कार्बनडायसल्फाईड, ई.डी.सी.टी. मिश्रण, मिथाईल ब—ोमाईड ड्युरोफूम ही धुरीजन्य कीटकनाशके वापरावीत. परंतु, ती तज्ज्ञांच्या देखरेखीखालीच वापरावीत. कमी प्रमाणावर धुरी देण्यासाठी पोत्याच्या ढिगार्‍यात या गोळ्या ठेवून संपूर्ण ढीग ताडपत्रीने अथवा त्याच्यासारख्या जाड कापडाने सर्व बाजूंनी झाकावा. अशा परिस्थितीत 3-4 दिवस पोती झाकून टाकल्यास किडींचा बंदोबस्त होतो.

* अशा प्रकारे प्रक्रिया केलेले बियाणे हे खाण्यासाठी विषारी असल्याने वापरू नये, हे शेतकर्‍यांना वेगळे सांगायला नको.

– सत्यजित दुर्वेकर

Back to top button