सुकी फुले : सुक्या फुलांपासून मिळवा चांगले उत्पन्न | पुढारी

सुकी फुले : सुक्या फुलांपासून मिळवा चांगले उत्पन्न

- जगदीश काळे

आपल्या आयुष्यात कोणत्याही झाडाच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. आता ताज्या फुलांबरोबरच सुकी फुले देखील चांगले उत्पन्न मिळवून देत आहेत.

देवाच्या पूजनासाठी तर फुले वापरली जातातच; पण विविध समारंभांतून आणि अन्य प्रसंगीही फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळेच फुलांना कायम मागणी असते. ताज्या फुलांना तर नेहमीच मागणी असते; पण त्याचबरोबर सुक्या फुलांनाही मोठी मागणी आहे. विविध कारणांसाठी ही फुले वापरली जातात. सुक्या फुलापासून विविध वस्तू तयार करण्यात येतात. यापासून लॅम्पशेड, हातकागद, कँडल होल्डर, ज्यूटच्या पिशव्या, फोटो फ्रेम, बॉक्स, पुस्तके, वॉल हँगिंग, कार्डे आणि यासारख्या कितीतरी वस्तू बनवल्या जातात. या वस्तूंसाठी सुक्या फुलांचा वापर केल्यास त्यांची शोभा आणखी वाढते आणि त्या अधिक छान दिसतात. त्यामुळेच या वस्तूंना कायम मागणी असते. आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारात सुक्या फुलांना कायम मागणी असते.

जपान, अमेरिका, युरोपमध्ये भारतातून ही फुले निर्यात केली जातात. भारतामध्ये फुलांचे विविध प्रकार असल्यामुळे फुलांच्या निर्यातीत तो नेहमी अग्रस्थानी असतो. केवळ सुकी फुलेच नाही तर त्यांचे देठ, सुकलेले कोंब, बिया, देठांची साले यांची देखील निर्यात होते. भारतात या फुलांच्या निर्यातीमधून कोट्यवधी रुपये मिळतात. या उद्योगातून 500 प्रकारच्या फुलांचे प्रकार पाठवले जातात.

सुकी फुले वाळवणे आणि डाय करणे अशा दोन्ही प्रकारांनी सुकी फुले बनवता येतात. वाळवण्यासाठी फुले आधी खुडावी लागतात. सकाळच्या वेळी फुलांवरील दव उडून जाते तेव्हा फुले खुडावीत. एकदा खुडल्यानंतर सर्व फुलांचे देठ एकत्र करावेत आणि त्यांना रबर बँडने बांधावे. उन्हापासून फुलांना लवकर बाजूला करावे. फुलांना सुकविण्यासाठी अनेक पद्धती आहेत. उन्हात वाळवणे हा सर्वात सोपा उपाय; पण पावसाळ्यात हे शक्य होत नाही. फुलांचे गुच्छ दोरीने बांधून एखाद्या बांबूच्या सहाय्याने ते लोंबते ठेवता येतात. फुले वाळवण्यासाठी कोणत्याही रसायनाचा मात्र वापर करू नये. फुलांना चांगले वायूजीवन मात्र मिळायला हवे. अशा फुलांना बुरशी लागण्याचा मात्र धोका असतो. तसे होत ना इकडे लक्ष द्यावे. फुलांबरोबरच सुकी पाने आणि कोंबदेखील वापरतात. गेल्या 20 वर्षांपासून आपला देश अशा प्रकारच्या फुलांची निर्यात करत आहेत. सुक्या फुलांपासून अनेक प्रकारच्या वस्तू बनवता येतात. पॉटपाऊरीचाही त्यामध्ये समावेश आहे. हे सुगंधी सैल अशा सुक्या फुलांचे मिश्रण असून ते एका पॉलिथिनच्या पिशवीत ठेवतात. सामान्यत: ते कपाटात, ड्रॉव्हरमध्ये किंवा बाथरूममध्ये ठेवतात. यामध्ये 300 पेक्षा जास्त फुलांचा समावेश आहे. यामध्ये साधारणत: बॅचलर्स बटन, कोंबड्याचा तुरा, जाई, गुलाबाच्या पाकळ्या, बोगनवेलीची फुले, कडूनिंबाची पाने इत्यादींचा उपयोग केला जातो. भारतात यापासून पॉटपाऊरी बनवतात. आपल्याकडून साधारणपणे इंग्लंडमध्ये अशा पॉटपाऊरी पाठवल्या जातात.

सुक्या फुलांचा पॉटही बनवतात. यासाठी सुके देठ आणि कोंब वापरतात. याची मागणी कमी असली तरी उच्च उत्पन्न वर्गातून याचा वापर केला जातो आणि त्यापासून पैसेही चांगले मिळतात. वेगवेगळ्या पद्धतीने फुलांची लागवड करता येते. यासाठी रोपवाटिका तयार करण्याबाबत अभ्यास करावा. आपल्याकडे फुलांचे नानाप्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये पारंपरिक फुलांबरोबरच काही पाश्चिमात्य फुलझाडांचीही लागवड करता येते. काही झाडांना वर्षातील बारा महिने फुले येऊ शकतात तर काहींना विशिष्ट हंगामातच फुले येतात.

आपल्याकडे कोणत्या प्रकारचे हवामान आहे याचा विचार करून फुलझाडांची लागवड करावी. शिवाय त्यावर वापरण्यात येणार्‍या औषधांचाही विचार करावा. नाना रंगांची आणि वेगवेगळ्या फुलांची लागवड करता येते. यासाठी मार्गदर्शन करणारी तज्ज्ञ मंडळीही उपलब्ध आहेत. त्यांचा सल्ला घ्यावा आणि फुलझाडांची लागवड करावी. आजकाल बाजारात वेगवेगळ्या फुलांना मागणी आहेच; पण त्याशिवाय फुले सुकवूनही त्यापासून आपल्याला चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. यासाठी बाजारपेठेचा अभ्यास करावा. सुक्या फुलांपासून अनेक वस्तू बनवल्या जात असल्याने आपली फुललागवड वाया जाणार नाही हे लक्षात ठेवावे.

Back to top button