कडधान्यातून टिकवा सुपिकता | पुढारी

कडधान्यातून टिकवा सुपिकता

जमिनीची सुपिकता कमी झाली, तर त्याचा परिणाम शेती उत्पादनांवर होतो. ती टिकवून ठेवण्यासाठी पिकात फेरबदल करणे आवश्यक आहे. सुपिकता टिकवण्यासाठी कडधान्यांची लागवड हा एक उत्तम पर्याय ठरतो.

कडधान्यांच्या लागवडीसाठी इतर पिकांच्या तुलनेत नत्रयुक्त खतांवरील खर्च बराच कमी येतो. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी जमिनीची सुपिकता वाढवून उत्पादन वृद्धीसाठी कडधान्य लागवडीचा मार्ग अवलंबण्यास काहीच हरकत नाही.

सध्या जमिनीची सुपिकता कमी झाली आहे. तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाणही फार कमी झाले आहे. शेणखतासारख्या निविष्ठा कमी होत असल्यामुळे त्यांचा वापर खूपच कमी होत चालला आहे. अशा स्थितीत जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी कडधान्यांची लागवड आणि त्यांची आंतरपीक म्हणून लागवड फायदेशीर दिसून आली आहे.

जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी पिकात फेरबदल करणे फार महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कडधान्यांच्या उत्पादनात आणि उत्पादकतेत घट झाल्यामुळे कडधान्यांच्या लागवडीस निश्चितच चांगला वाव आहे. त्यात संयुक्त राष्ट्र अर्थात युनोने 2023 हे वर्ष भरडधान्यांचे वर्ष म्हणून ठरवले आहे. सध्या जमिनीची सुपिकता कमी झालेली आहे. अशा परिस्थितीत कडधान्यांची लागवड आणि त्याची आंतरपीक म्हणून लागवड करण्याची गरज आहे.

कडधान्य पिकांच्या लागवडीमध्ये इतर पिकांच्या तुलनेत नत्रयुक्त खतांवरील खर्च बराच कमी करता येतो. ही कडधान्ये पिके हवेतील नत्राचे स्थिरीकरण करून आपली नत्राची गरज भागवतात. जमिनीत उपलब्ध नत्राचे प्रमाण वाढवायला मदत होते. कडधान्य पिके त्यांच्या एकूण नत्राच्या आवश्यकतेच्या जवळजवळ 70 ते 80 टक्के जैविक स्थिरीकरणाच्या प्रक्रियेतून उपलब्ध करतात. त्यामुळे बाहेरून वापरल्या जाणार्‍या निविष्ठांच्या खर्चात बचत करता येते. जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता चांगली ठेवण्यासाठी योग्य व्यवस्थापन ठेवणे गरजेचे आहे. योग्य मशागतीच्या पद्धतीचे अवलंबन करून जमिनीचे प्राकृतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म सुधारता येऊन तिचे आरोग्य चांगले राखता येते.

तृणधान्य पिकांचे अवशेष आणि एकूण उत्पादनाच्या बाबतीत भिन्न असते. कडधान्य पिकांसाठी लागणारी कीटकनाशके, खते इत्यादींची गरज ही या पिकांपेक्षा वेगळी आहेत. जमिनीतील पालापाचोळा कुजण्याची प्रक्रिया कर्ब नत्राच्या प्रमाणावर अवलंबून असते. कडधान्याचा पीक पद्धतीमध्ये समावेश असल्यास उत्तम पद्धतीने पालापाचोळ्यातील कर्बाचे जमिनीतील सेंद्रिय कर्बात रूपांतर होते. जमिनीत सतत एक प्रकारचे पीक पद्धतीत कडधान्यांचा अंतर्भाव केल्यामुळे पिकांची फेरपालट होऊन निरनिराळ्या पिकांची मुळे कमी-अधिक खोलीमधील अन्नद्रव्यांचे शोषण करतात. त्यामुळे अन्नद्रव्यांचा र्‍हास कमी होतो. या पिकांच्या पालापाचोळ्याचा फायदा जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी होतो.

द्विदल कडधान्य पिकांचे अवशेष पीक काढणीनंतर जमिनीत गाडले तरी भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थांची भर पडते. त्यामुळे सूक्ष्म जीवाणूंच्या संख्येत वाढ होऊन जमिनीतील मूळच्याच असलेल्या अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवता येते. इतर पिकांच्या तुलनेत कडधान्य पीक जमिनीमध्ये स्थिर असलेल्या स्फुरदांची उपलब्धता वाढवतात. उपलब्ध असलेल्या स्फुरदाचे कार्यक्षमरीत्या शोषण करतात. जमिनीमध्ये कॅल्शियम फॉस्फेट हा अविद्राव्य स्वरूपात असलेला स्फुरद कडधान्य पिकांची मुळे त्यांच्या आम्लता वाढवण्याच्या गुणधर्मामुळे विद्राव्य स्वरूपात रूपांतरित करतात. त्यामुळे बर्‍याचदा असे आढळून येते की, कडधान्य पिके स्फुरदयुक्त खतास प्रतिसाद देत नाहीत.

कडधान्य पिकांची दाट झुपकेदार वाढ होत असल्यामुळे त्यांचा आच्छादन पीक म्हणून वापर होऊन जमिनीची संरचना सुधारून हवा खेळती राहण्यास मदत होते. जमिनीची आकार घनता कमी होऊन जमीन भुसभुशीत होते आणि तिच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होते. जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारल्यामुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून खतांवरील खर्च कमी करता येतो.

कडधान्य पिके जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा साठा वाढवतात. कडधान्य पिके जमिनीचा र्‍हास होण्यापासून तिचे संरक्षण करतात. कडधान्य पिकांच्या चांगल्या बाजारभावासोबतच या बाबींचा जमीन आरोग्याच्या द़ृष्टीने लाभ होऊ शकतो. पिकांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीनुसार निवाष्ठांचा वापर करणे गरजेचे असते. माती परीक्षणानुसार खतांचा वापर केल्याने खतांवरील खर्चात बचत करता येऊन पिकांना अन्नद्रव्यांची जमिनीत कमतरता असल्यास तिचे निदान वेळीच करणे गरजेचे असते. शेतावरील उपलब्ध काडीकचरा, पीक अवशेष इत्यादींचा वापर केल्यास जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

– शैलेश धारकर 

Back to top button