कलिंगडच्या सुधारित जाती | पुढारी

कलिंगडच्या सुधारित जाती

शुगर बेबी : महाराष्ट्रात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. फळे मध्यम आकाराची आणि 3 ते 5 किलो वजनाची असतात. फळांचा रंग गर्द हिरवा असून गर गर्द लाल रंगाचा आणि खुसखुशीत असतो. फळांची उत्तम गोडी, उत्कृष्ट चव आणि मध्यम आकार यामुळे महाराष्ट्रात ही जात सर्वात जास्त लोकप्रिय आहे.

आसाहसी यामाटो : या जातीची फळे 7 ते 8 किलो वजनाची असतात. सालीचा रंग फिक्कट हिरवा आणि गर गुलाबी रंगाचा असतो. या जातीपासून प्रति हेक्टरी 250 ते 300 क्विंटल उत्पादन मिळते.

दुर्गापूर मिठा : ही जात कृषी संशोधन केंद्र, दुर्गापूर येथे विकसित करण्यात आली आहे. सालीचा रंग पिक्कट हिरवा असतो. फळांचेे वजन 6 ते 7 किलो असतेे. तसेच फळांची साल जाड असल्यामुळे फळे जास्त काळ टिकून राहतात.

अर्का माणिक : ही जात भारतीय फलोद्यान संशोधन संस्था, बेेंगलोर येेथे विकसित करण्यात आली आहे. फळे लांबट, पिक्कट हिरव्या रंगाची असून त्यांच्यावर गर्द हिरव्या रंगाचे पट्टे असतात. फळांचा रंग गर्द गुलाबी असून अत्यंत गोड असतो. फळांचे सरासरी वजन 6 ते 8 किलो असते. ही जात भुरी आणि केवडा या रोगांना प्रतिकारक आहे. या जातीपासून 300 ते 350 क्विंटल उत्पादन मिळते.

अर्का ज्योती : या जातीची फळे आकाराने गोल आणि 6 ते 8 किलो वजनाची असतात. फळांना रंग फिक्कट हिरवा आणि त्यावर गर्द हिरव्या रंगाचे पट्टे असतात. फळांना गर उत्कृष्ट प्रतीचा असतो. फळे जास्त काळ टिकतात. या जातीपासून हेक्टरी 500 ते 600 क्विंटल उत्पादन मिळते.

– जयदीप नार्वेकर

Back to top button