रेशीम उद्योग हा कृषिआधारित आणि श्रमप्रधान उद्योग असल्यामुळे यात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. प्रत्येक टप्प्यावर मूल्यवर्धन होत असल्यामुळे हा व्यवसाय आर्थिकद़ृष्ट्या फायदेशीर आहे.
रेशमी वस्त्रांचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये आढळतो. हजारो वर्षांपासून रेशीम भारतीय संस्कृतीचा भाग असल्याचे त्यावरून दिसून येते. रेशीम उत्पादन आणि सिल्क रेशमी कापड हे एक महत्त्वाचे उत्पादन क्षेत्र असून, ते वस्त्रोद्योगात अंतर्भूत होते. मात्र, या कापडासाठी लागणारे रेशीम तयार करणे हा मात्र कृषिआधारित कुटीरोद्योग आहे. रेशीम उत्पादनात प्रामुख्याने रेशमाच्या किड्यांचे पालन आणि त्यापासून रेशमी धागा प्राप्त करण्याचा समावेश होतो. रेशीम उत्पादन हा कृषिआधारित श्रमप्रधान उद्योग आहे. रेशीम उत्पादनाच्या प्रक्रियेत अनेक घटकांचा समावेश होतो.
प्रथमतः रेशीम किडे ज्या झाडांवर पोसले जातात, त्या तुतीच्या झाडांची लागवड करावी लागते. त्यानंतर रेशीम उत्पादनासाठी आवश्यक अशा रेशीम किड्यांचे संगोपन त्या झाडांवर करावे लागते. त्यानंतर रेशमाचे धागे काढण्यासाठी रेशीम कोशींपासून धागे गुंडाळण्याची प्रक्रिया होते. त्यानंतर धागे सरळ करणे, डाय करणे, विणणे, प्रिंटिंग, डाइंग अशा सर्व प्रक्रिया या उद्योगात अंतर्भूत असतात. या सर्व प्रक्रिया लक्षात घेता रेशीम उद्योगात मोठ्या प्रमाणावर श्रमांची आवश्यकता भासते, हे लक्षात येते. कृषी आणि उद्योग दोन्ही क्षेत्रांचे एकत्रीकरण या उद्योगात आहे. रेशमाच्या उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. याबरोबरच रेशीम उद्योगात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असल्याने रेशीम उद्योगात जागतिक नकाशावर भारताचे स्थान ठळक बनले आहे.
रेशमाची किंमत अधिक असली, तरी उत्पादनाचे प्रमाण अत्यल्प असते. जगभरात एकंदर वस्त्रोत्पादनात रेशमाची हिस्सेदारी केवळ 0.2 टक्के एवढीच आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हे अत्यंत फायदेशीर उत्पादन असून, प्रत्येक टप्प्यावर मूल्यवर्धन होत जाणारे असे उत्पादन आहे. मूंगा रेशीम उत्पादनात भारताची मक्तेदारी आहे. कृषी क्षेत्रातील हे एकमेव असे नगदी उत्पादन आहे, ज्यातून तीस दिवसांच्या आत उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते. त्यामुळेच रेशीम उद्योग हे एक प्रमुख आर्थिक क्षेत्र म्हणून उदयास आले आहे.
यात दोन भाग असून, रेशीम किडे पाळण्यापासून रेशीम सूत तयार करण्यापर्यंतची प्रक्रिया तसेच त्या धाग्यांपासून रेशमी वस्त्र तयार करणे या दुसर्या प्रक्रियेचा समावेश आहे. रेशीम उद्योगाचे संवर्धन आणि विकास यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत अनेक योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून भारत सरकार वेगवेगळे प्रकल्प राबविते. रेशीम उत्पादनासाठी पायाभूत सुविधांचा विकास, नर्सरी आणि रेशीम बागांचा विकास, तसेच बागांचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने अनेक योजनांचा यात समावेश आहे.
– सत्यजित दुर्वेकर