सिंचनातून खते कशी द्यावीत आणि त्याचे फायदे काय? | पुढारी

सिंचनातून खते कशी द्यावीत आणि त्याचे फायदे काय?

उपलब्ध पाण्याच्या नियोजनाची गरज लक्षात घेता ठिबक, तुषार आणि सूक्ष्म फवारा सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतकर्‍यांनी सुरू केला. खतांच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन आता खतांच्या कार्यक्षम वापराची गरज निर्माण झाली आहे. ही गरज सिंचनातून खते म्हणजेच फर्टिगेशन या तंत्रामुळे पूर्ण होऊ शकणारी आहे.

ज्यावद्वारे ठिबक सिंचनातून उभ्या पिकांना खते पुरविली जातात, त्यालाच फर्टिगेशन किंवा सिंचनातून खते असे म्हणतात. सिंचनातून वापरात येणारी खते सहज विरघळणारी असतात, अशा खतांचे प्रमुख दोन प्रकार असतात.

1) द्रवरूप खते : अशा खतांमध्ये मुख्य पोषक द्रव्यांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्येही आढळतात. अशी खते पिकांच्या वेगवेगळ्या अवस्था लक्षात घेऊन तयार केली जातात.

2) घनरूप खते : घनरूप असणारी ही खते पाण्यात पूर्णपणे विरघळणारी असतात. अशा खतांमध्ये दोन किंवा अधिक मुख्य आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये समाविष्ट केलेली असतात.

आधुनिक सिंचनातून खते वारण्याचे तंत्र आपल्या शेतकर्‍यांना नवे आहे. अगदी मोजकेच शेतकरी या पद्धतीचा अवलंब करत असतानाही आढळतात. सिंचनातून द्यावयाची द्रवरूप खते भारतात फारच कमी प्रमाणात तयार केली जातात. बहुतेक करून अशी खते परदेशातून आता केली जातात. परंतु अलीकडे सिंचनातून द्यावयाची घनरूप खते आपल्या देशात वापरण्यास सुरुवात झाली आहे.

1) पिकांची वाढीची अवस्था आणि त्यांच्या गरजेनुसार द्रवरूप खतांचा वापर केला असता उत्पादनात ठोस स्वरूपाची वाढ होते.

2) ठिबक सिंचनाद्वारे खते दिल्याने पिकांना पाणी आणि पोषण द्रव्यांचा पुरवठा मुळांजवळ होतो. त्यामुळे पाण्याचा आणि पोषण द्रव्यांचा र्‍हास होत नाही.

3) द्रवरूप खते रूपाने मुख्य पोषणद्रव्यांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा केला जातो.

4) द्रवरूप खते सिंचनातून दिली असता तीव्र द्रावण सौम्य होते, त्यामुळे पिकांच्या मुळांवर त्याचा अनिष्ट परिणाम होत नाही.

5) द्रवरूप खते नियमित आणि कमी प्रमाणात वापरल्यामुळे जमिनीत अन्नद्रव्यांचा साठा कमी असतो आणि नियंत्रित असतो. त्यामुळे अती पावसाने निचर्‍याद्वारे किंवा जमिनीवरून जास्तीचे पाणी वाहून गेल्याने पोषकत्व जात नाही आणि खतांची एकूण 25 ते 30 टक्क्यापर्यंत बचत होते.

6) कीटकनाशके आणि तणताशके द्रवरूप खतात मिसळून दिल्यने मजूर, यंत्रसामग्री आणि एकूणच अशी आर्थिक बचत होते.

7) हलक्या वालुकामय किंवा मुरमाड जमिनीत पिकांचे उत्पादन घेण्यासाठी खास व्यवस्थापनाची गरज असते, अशा स्थितीत सिंचनातून खते दिल्याने पीक उत्पादनात वाढ करता येते.

8) द्रवरूप खते देण्याच्या विशिष्ट पद्धतीने जमिनीचा पृष्ठभाग कठीण होत नाही.

– सतीश जाधव

Back to top button