नारळ हे बागायती पीक असल्याने पाण्याची सोय असल्यास नारळाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते.
रोपांची निवड :
* रोपे कृषी विद्यापीठ, शासकीय आणि शासकीय मान्याताप्राप्त रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत. रोपांची निवड खालीलप्रमाणे करावी.
* रोपवाटिकेत लवकर रुजलेल्या रोपांची लागवडीसाठी निवड करावी.
* नऊ ते बारा महिने वयाची रोपे लागवडीसाठी निवडावीत.
* रोपांच्या उंचीपेक्षा त्यांचा बुंधा आखूड व जाड असावा.
* नऊ ते बारा महिने वर्षे वयाच्या रोपांना 4 ते 6 पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत.
* रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत.
* सध्या अवास्तव उत्पादन देणार्या नारळाच्या जातीच्या रोपांविषयी जाहिराती येतात; परंतु अशी रोपे खरेदी करू नयेत. परप्रांतातून आणलेल्या रोपांची लागवड करणे धोकादायक आहे.
दोन नारळ झाडातील अंतर : नारळ लागवड करताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा विचारात घेणे गरजेचे आहे. तो म्हणजे दोन झाडांतील अंतर. दोन झाडांत योग्य अंतर असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. नारळ लागवडीचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे दोन झाडांतील अंतर होय. योग्य अंतर ठेवले नाही तर नारळाची जात चांगली असूनही उशिरा उत्पादन मिळणे, कमी उत्पादन मिळणे या समस्यांना तोंड द्यावे लागते. योग्य प्रमाणात उत्पादन मिळण्यासाठी झाडांची सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत 25 फूट (7.5 मी.) अंतर ठेवावे. शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची असल्यास 20 फुटांचे अंतर ठेवले तरी चालेल.
खड्डा खोदणे : पिकांच्या मुळांना वाढीसाठी अनुकूल परिस्थिती मिळावी म्हणून पेरणीपूर्वी आपण जमिनी नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करतो. तशाच पद्धतीने फळझाडे लागवड करताना खड्डा खोदणे जरुरीचे असते. खड्ड्याचा आकार हा फळझाड आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतो. खड्डा खोदल्याने त्यातील दगड बाहेर काढले जातात. त्याचप्रमाणे स्पर्धा करू शकतील, अशा झाडांची मुळे तोडली जातात. खड्ड्यातील मातीत खते चांगल्याप्रकारे मिसळणे शक्य होते. सुरुवातीच्या काळात मुळांच्या वाढीसाठी अधिक अनुकूल परिस्थिती उपलब्ध होते. त्यामुळे झाडे पुढे प्रतिकूल परिस्थितीस तोंड देऊ शकतात. खड्ड्याचा आकार जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतो.
वस्कस किंवा मुरूमयुक्त जमीन तसेच जी जमीन प्रथमच लागवडीखाली आणली जात आहे अशा जमिनीत 1 ×1 ×1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत; परंतु समुद्र किंवा नदी किनार्यावरील पुळणीची जमीन, गाळ मिश्रित, रेताड, मध्यम काळ्या आणि भारी काळ्या जमिनीत थोडा लहान आकाराचा खड्डा खोदला तरी चालू शकेल.
खड्डे खोदण्याचे काम पावसाळ्यापूर्वी एक ते दीड महिना अगोदर पूर्ण करावे. कातळावर खड्डा खोदताना मातीच्या भरावाचा विचार करावा. खड्डा भरणे रेताड, वरकस किंवा मुरमाड जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या तळात कमीत कमी 1 ते 2 घमेली चांगल्या प्रतीची माती टाकावी. तसेच खड्डा भरताना आणखी 1 ते 2 घमेली चांगल्या प्रतीची माती मिसळावी. त्यामुळे जमिनीत पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते; परंतु पावसाळ्यात अधिक काळ पाणी धरून ठेवणार्या भारी प्रतीच्या जमिनीत खड्ड्याच्या तळाला 1 ते 2 घमेली रेती (वाळू) घालावी, तसेच खड्डा भरताना 1 ते 2 घमेली रेती मातीत मिसळावी. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल.
वालुकामय जमिनीत खड्ड्याच्या तळाशी सोडणांचा थर दिल्यास उत्तम असते, त्याद्वारे जमिनीत ओल टिकून राहते, तसेच खड्डा भरताना खड्ड्यात 4 ते 5 घमेली शेणखत, 1.5 सिंगल सुपर फॉस्फेट आणि 5 ग्रॅम फॉर्लीडॉल पावडर वाळवीच्या नियंत्रणासाठी खड्ड्याच्या मातीत मिसळावी. जमीन सपाट असल्यास खड्डे पूर्ण भरून घ्यावेत. त्याचप्रमाणे ज्या जमिनीत पाणी साचते अशा ठिकाणचे खड्डे पूर्ण भरून वर थोडी भर द्यावी; परंतु जमीन उताराची असल्यास आणि पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचणार नाही अशी खात्री असल्यास खड्डे अर्ध्यापर्यंत भरावेत. उरलेली माती खड्ड्याच्या वरील बाजूवर वरंबा करण्यासाठी वापरावी. म्हणजे पावसाळ्यात बाहेरचे पाणी खड्ड्यात येणार नाही. पुढे जसजसा माड वाढत जाईल तसतशी खड्ड्यात भर घालावी.
लागवडीचा हंगाम : महाराष्ट्राचा विचार करता कोकणात ज्या जमिनीत पाणी साचून राहत नाही, अशा जमिनीत पावसाच्या सुरुवातीस लागवड करावी तर ज्या पाणथळ जमिनी आहेत, अथवा ज्या ठिकाणी पुराचा त्रास होतो, अशा ठिकाणी पावसाचा जोर ओसरल्यानंतर ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये लागवड करावी.
– डॉ. दादासाहेब खोगरे