उसावर तांबेरा, मर, केवडा, हुमणी रोगांचा प्रादुर्भाव झालाय तर 'हे' करा उपाय | पुढारी

उसावर तांबेरा, मर, केवडा, हुमणी रोगांचा प्रादुर्भाव झालाय तर 'हे' करा उपाय

उसाचे उत्पादन वाढण्यासाठी या पिकावर पडणार्‍या रोगाचे आणि किडीचे नियंत्रण वेळीच करणे गरजेचे असते. लोकरी मावा, तांबेरा, कांडीकीड, मर, खोडकीड यासारखे रोग आणि कीड उसावर आढळून येतात. त्याकरिता वेगवेगळे उपाय करणे आवश्यक असते. उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक, तुषार सिंचनाबरोबरच रेन गन यासारखा पर्यायही शेतकर्‍यांना उपयुक्‍त ठरतो. सिंचनाच्या या पद्धतीमुळे उसाचे एकरी उत्पादन वाढते, असा अनुभव आहे.

ऊस हे पीक नगदी पीक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हे पीक घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल गेल्या काही वर्षांत चांगलाच वाढला आहे. साखर कारखान्यांकडून चांगला दर मिळत असल्याने उसाच्या लागडीखालील क्षेत्र गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. उसाची लावण केल्यानंतर पीक वाढेपर्यंत त्याला पाणी देण्याखेरीज जास्त कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळेही हे पीक शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. अलीकडच्या काळात उसावरही वेगवेगळे रोग आणि कीड पडत असल्याचे आढळून येऊ लागले आहे.

रोग आणि किडीमुळे उसाचे एकरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते. त्यामुळे उसावरील रोग आणि किडीचा वेळीच बंदोबस्त करणे योग्य ठरते. उसावर चाबूक काणी, तांबेरा, मर, केवडा, हुमणी आदी रोगांचा प्रादुर्भाव होतो. या रोग व किडीमुळे तसेच जमिनीची प्रतवारी घसरल्यामुळे महाराष्ट्रातील उसाचे एकरी उत्पादन सातत्याने घसरू लागले आहे. एकीकडे उत्पादन घटत असताना दुसरीकडे उसावरचा उत्पादन खर्च मात्र वाढू लागला आहे. त्यामुळे ऊस शेती पूर्वीसारखी फायदेशीर राहिली नाही, असे शेतकरी बोलू लागला आहे.

उसाची शेती फायदेशीर ठरायची असेल, तर उसाचे एकरी उत्पादन वाढविणे हा एकमात्र पर्याय आहे. उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करण्याबरोबरच जमिनीची प्रतवारी वाढविण्यापर्यंतच्या अनेक मार्गांचा अवलंब करता येऊ शकतो. उसाला भरमसाठ पाणी दिल्याखेरीज पर्याय नाही, असा गैरसमज शेतकर्‍यांमध्ये आढळून येतो. उसाला दिलेल्या पाण्याचा जमिनीतून निचरा झाला नाही, तर त्याचा परिणाम जमिनीत क्षार निर्माण होण्यात होतो.

पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या भागात शेतकर्‍यांनी ठिबक सिंचनाद्वारे उसाला पाणी दिले आहे. या पद्धतीद्वारे उसाचे उत्पादन लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. उसाच्या उत्पादनवाढीसाठी या पिकावर पडणार्‍या रोगांना आणि किडीला वेळीच नियंत्रणात ठेवणे आवश्यक ठरते. गेल्या काही वर्षांत लोकरी मावा नावाची कीड उसावर पडत असल्याचे दिसून येत आहे. पावसाचे प्रमाण अधिक असेल, तर उसावर लोकरी मावा कीड पडण्यास पोषक वातावरण निर्माण होते.

ही कीड उसाच्या पानाच्या खालच्या बाजूला असते. मधल्या शिरेजवळ पांढर्‍या लोकरीसारखे मेणतंतूधारी पंखी व बिनपंखी मावा पिलांसह आढळून येतो. या किडीमुळे उसाचे पान पूर्णपणे पांढरे होते. या किडीची सुरुवात बांधाजवळ असलेल्या उसामध्ये होते. नंतर ती हळूहळू संपूर्ण क्षेत्रात पसरते. ही कीड आढळून आल्यास व त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास उसाचे उत्पादन घटते. त्याकरिता उसाची लावण पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने करावी, असा सल्‍ला तज्ज्ञ मंडळी देतात. उसाची वाढ चांगली झाल्यावर भांगे पाडून अथवा ऊस सरीत रेलून घेण्याचा सल्‍लाही तज्ज्ञांनी दिला आहे. असे केल्याने फवारणी व्यवस्थित करता येते.

पिकातील तण वेळीच काढणे आणि शेत स्वच्छ ठेवणे, प्रादुर्भाव झालेली पाने काढून नष्ट करणे, यासारख्या मार्गांनी लोकरी माव्यावर नियंत्रण ठेवता येते. जमिनीतील ज्या भागात उसावर लोकरी मावाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्या क्षेत्रातील उसाची वाळलेली पाने काढून एकत्रितरीत्या नष्ट केली पाहिजेत. उसाच्या आजुबाजूला मका, चवळी यासारखी पिके घेण्यानेही या किडीवर नियंत्रण ठेवता येते.

भरणीनंतर नत्रयुक्‍त खतांचा वापर बंद करावा. उसावरील किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात 15 ते 20 टक्के एवढी घट होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. उत्पादनातील घटीबरोबरच उसातील साखर उतार्‍यातही घट होते. याखेरीज उसावर खोडकिडीचाही प्रादुर्भाव आढळून येतो. ऊस लावणीपासून मोठ्या बांधणीपर्यंत हा प्रादुर्भाव होतो. ही अळी उसात शिरून उगवणार्‍या कोंबाला 7 ते 8 दिवसांत खाऊन टाकते.

कांडी किडीमुळे उसाच्या कांड्या आखूड व बारीक होतात. खोड किडीची अळी उसाच्या खोडात शिरून काेंंब खाऊन टाकते. महाराष्ट्रात या किडीचा प्रादुर्भाव आडसाली ते सुरू लागवडीपर्यंत आढळून येतो. सुरू लावण उशिरा झाली असेल, तर या किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो असेही दिसून आले आहे. ही कीड नियंत्रणात आणण्याकरिता उसाची लावण अरुंद ओळीत करावी, असा सल्‍ला या क्षेत्रातील जाणकार देतात.

उसाला कमी पाणी दिल्याने तापमानात वाढ झाल्याने, तसेच हवेतील आर्द्रता कमी झाल्याने या किडीचे प्रमाण वाढते. किडीमुळे ऊस उशिरा तयार होतो. उसामध्ये मका, ज्वारी, गहू ही आंतरपिके घेऊ नयेत. त्याऐवजी कांदा, लसूण, कोथिंबीर, पालक ही आंतरपिके घ्यावीत. खोडकीड लागलेला ऊस उपटून अळीसह नष्ट करावा लागतो. पालाशयुक्‍त खते नियमित वापरल्यास या किडीवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. ऊस लागवडीपूर्वी 10 किलो फोरेट अथवा 2.5 लिटर क्लोरपायरीफॉस 1 हजार लिटर पाण्यातून जमिनीला गेले पाहिजे. उसात हेक्टरी 25 या प्रमाणात कामगंध साफळे जमिनीवर लावावेत.

कांडी किडीमुळे उसाच्या कांडीला अनेक छिद्रे पडतात. या किडीचा प्रादुर्भाव मे ते सप्टेंबर या महिन्यात आढळून येतो. आडसाली लावणीत या प्रादुर्भावाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. ऑक्टोबरध्ये पाऊस पडल्यास ही कीड जोमाने वाढते, असे दिसून आले आहे. उसाची कांडी तयार झाल्यापासून तोडणीपर्यंत या किडीचे अस्तित्व दिसून येते. या किडीमुळे उसाची वाढ खुंटते. उत्पादनात 30 ते 35 टक्के एवढी घट येते. साखर उतारा 3 टक्क्यांनी कमी होतो, असे दिसले आहे. ही कीड टाळण्यासाठी कीडविरहित बियाण्याची लागवड करणे आवश्यक असते. किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर उसाची खालची पाने काढून टाकावीत. नत्राचे प्रमाण अधिक असलेली खते देणे टाळावे.

किडीचा प्रादुर्भाव अधिक झाला असे आढळून आल्यास त्या जमिनीत भात, भाजीपाला, तेलबिया यासारखी पीके घेतली पाहिजेत. लागवडीनंतर चार महिन्यांनी 15 दिवसांच्या अंतराने 5 ते 6 ट्रायकोकार्ड प्रतिहेक्टर या प्रमाणात तोडण्यापूर्वी एक महिन्यापर्यंत वापरावीत.
उसाच्या एकरी उत्पादन वाढीचा विचार करताना जमिनीचा पोत वाढवण्यालाही महत्त्व दिले पाहिजे. सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीची प्रतवारी वाढवता येते. लागवडीनंतरही उसाला सेंद्रिय खताचा पुरवठा केल्यास त्याचा उत्पादनावर चांगला परिणाम झालेला दिसून येतो. उसाला प्रमाणापेक्षा अधिक पाणी दिले, तर आर्द्रता वाढते. त्यामुळे किडीचा प्रादुर्भावही वाढतो. म्हणून या पिकाला गरजेनुसारच पाणी द्यावे.

ठिबक, तुषार व रेणगण यासारख्या आधुनिक तंत्राचा वापर करूनही उसाला व्यवस्थित पाणीपुरवठा करता येतो. उसाचे उत्पादन चांगले येण्याकरिता नांगरट कोणत्या पद्धतीने केली जाते, यालाही मोठे महत्त्व आहे. हिवाळी नांगरटीनंतर रोटाव्हेटरने ढेकळे फोडणे, सबसॉयलर मारणे, कुळवण करणे या मार्गांद्वारे जमिनीची मशागत केली, तर उसावर किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. मशागतीनंतर सकाळ अथवा दुपारनंतरच नांगरट करावी. असे केल्याने जमिनीच्या पृष्ठभागावर आलेली कीड पक्ष्यांकडून खाल्‍ली जाते. लागवडीपूर्वी प्रति एकर आठ किलो या प्रमाणात दाणेदार फोरेट या कीटकनाशकाचा वापर करणे आवश्यक ठरते.

उत्पादनवाढीसाठी फुले 265 आणि को-86032 ही दोन वाणे वापरण्याचा सल्‍ला तज्ज्ञांकडून दिला जातो. या दोन्ही वाणांमध्ये अन्य वाणांपेक्षा अधिक उत्पादन क्षमता आहे. तसेच ही वाणे किडींना बळी पडण्याचे प्रमाणही कमी आहे. 15 फेब्रुवारीनंतर लागवड केल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्याचबरोबर जून-जुलैनंतर लावण केल्यास कीड वाढते. त्यामुळे लावणीची योग्य वेळ साधणे अत्यंत आवश्यक आहे.

– नवनाथ वारे

Back to top button