पिकांसाठी रासायनिक खतांचा कसा करावा? जाणून घ्या अधिक | पुढारी

पिकांसाठी रासायनिक खतांचा कसा करावा? जाणून घ्या अधिक

* जमिनीतील घातलेल्या नत्रयुक्त रासायनिक खतातील नत्र उडून अथवा झरून, वाहून जाऊ नये, यासाठी नत्रयुक्त खताची मात्रा एकाचवेळी न देता वेगवेगळ्या वेळी द्यावी. म्हणजे पिकाला गरज भासेल तेव्हा ते जमिनीतून नत्र घेऊ शकेल. नायट्रेट नायट्रोजन वाहून जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पाण्याच्या पाळ्यांवर नियंत्रण ठेवावे.

* नत्रयुक्त खताची पेरणीपूर्वी किंवा स्थलांतरापूर्वी केल्या जाणार्‍या जमिनीच्या अंतिम मशागतीच्या वेळी निम्मी मात्रा देऊन हे खत जमिनीत चांगले मिसळावे. उरलेली निम्मी मात्रा वर खते म्हणून 1 किंवा 3 हप्त्यांत सारखी विभागून द्यावी.

* खत ओलसर असल्यास कोरडी माती किंवा रेती मिसळून वापरावे.

* खत ओळीमधून अथवा रोपाभोवती द्यावे; मात्र रोपाची त्याचा प्रत्यक्ष संबंध येऊ देऊ नये.

* पालाशयुक्त आणि स्फुरदयुक्त खते शक्यतो पेरून द्यावी म्हणजे ती पिकांच्या मुळांना खालच्या थरात उपलब्ध होऊन त्याचा उपयोग होईल. स्फूरदयुक्त रासायनिक खते पेरणीपूर्वी किंवा स्थलांतरापूर्वी जमिनीत घालून चांगली मिसळावी. वर खते म्हणून या खताचा वापर करू नये.

* जिरायत पिकांसाठी खते अगोदर म्हणजे जमिनीत ओलावा असेल त्या वेळेस द्यावीत.

* बागायती पिकांना खते वेळेवर किंवा थोडी अगोदर द्यावीत.

* पिकांची वाढ ज्यावेळी जोरदार असेल, त्या वेळेस पिकास भरपूर अन्न घटकांची आवश्यकता असते. म्हणून अशावेळी खत देणे फायदेशीर आहे.

* साधारपणे नत्र भरपूर प्रमाणात द्यावयाचे असेल, तर ते दोन हप्त्यांत द्यावे. एकदा पिकांच्या उगवणीच्या वेळेस (पेरणीच्या वेळी किंवा पेरणीपूर्वी) आणि नंतर साधारणत: 1 महिन्याने द्यावे.

* स्फुरद आणि पालाश मात्रा पेरणीच्या वेळेस एकदाच द्यावे.

Back to top button