यशोगाथा : बार्शीच्या सीताफळाचा सातासमुद्रापार डंका

यशोगाथा : बार्शीच्या सीताफळाचा सातासमुद्रापार डंका
Published on
Updated on

– गणेश गोडसे, बार्शी

यशोगाथा : बार्शीच्या सीताफळाचा : डंका बार्शी येथील सीताफळ संशोधक डॉ. नवनाथ कसपटे यांनी मोठ्या प्रमाणात आणि मधुर सीताफळांच्या विविध 42 जाती विकसित केल्या असून, त्याद्वारे सीताफळ उत्पादनात क्रांती घडवून आणली आहे. नवनवीन प्रयोगामुळे त्यांच्या संशोधनाचा डंका आणि दर्जेदार सीताफळे सातासमुद्रापार पोहोचली आहेत.

त्यांच्या विकसीत सीताफळ बागेला भेट देण्यासाठी देशभरातील शेतकरी आवर्जून बार्शीत येत आहेत. त्यांनी सीताफळ महासंघाचीही स्थापना केली. आज ते अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष आहेत.

यशोगाथा : बार्शीच्या सीताफळाचा

बार्शी (जि. सोलापूर) तालुक्यातील गोरमाळे यासारख्या छोट्या खेड्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात डॉ. नवनाथ यांचा जन्म. शिक्षणानंतर त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत वेगळे काहीतरी करण्यासाठी संशोधन सुरू केले.

त्यात बुद्धिकौशल्याच्या आधारे सीताफळासारख्या दुर्लक्षित फळावर लक्ष केंद्रित केले. संशोधन करून त्यांनी 'एनएमके' या वाणाचा शोध लावला.

त्यातून प्रेरणा घेत त्यांनी पुढे अनेक वर्ष संशोधन करीत सीताफळांच्या एकूण 42 वाणांचा शोध लावला आहे. संशोधित वाणापैकी एनएमके या वाणाचे पेटंट त्यांना मिळाले आहे.

त्यातून 'सीताफळ पंडित' अशी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. त्यांनी तयार केलेल्या सीताफळास सातासमुद्रापार मागणी वाढलेली आहे.

साहजिकच सीताफळाच्या संशोधनाचा आपल्याबरोबरच सर्वच शेतकर्‍यांना फायदा व्हावा यादृष्टीने त्यांनी मार्गदर्शनही सुरू केले आहे.

फक्त दहा-बारा देशांतच उत्पादन

डॉ. कसपटे म्हणाले, सीताफळाचा जागतिक पातळीवर विचार केला असता जेमतेम फक्त दहा ते बारा देशांमध्येच सीताफळ या फळाचे उत्पादन घेतले जाते.

गेल्यावर्षी 'एन.एम.के. वन गोल्डन' वाणाची युरोपीयन देश लंडनमध्ये सहाशे रुपये किलो दराने विक्री झाली होती.

शेतकर्‍यांना खर्च वजा जाता 150 रुपये प्रती किलोला नफा मिळाला होता. त्यामुळे आगामी काळात जागतिक बाजारपेठेमध्ये सीताफळ उत्पादनास मोठी संधी असल्याचे दिसून येत आहे.

सद्य:स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, जेवढी सीताफळाची आवक आहे तेवढी आवक सध्या अनेक बाजारपेठांना पुरेशी होत नसल्याचे दिसून येते.

भारतातील महत्त्वाच्या शहरांच्या तुलनेत विचार करता दिल्ली बाजारपेठ मोठी आहे.

तिथे सीताफळाची आवक कमी होत असल्यामुळे ग्राहकांना सीताफळाच्या गोडीपासून दूर राहावे लागत आहे.

भारताच्या अनेक मोठ्या शहरांतील व्यापारी सीताफळ हंगामात महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडून सीताफळ खरेदी करतात. ते भारताच्या उत्तरेकडे नेऊन त्याची विक्री करून अधिक नफा कमवतात.

सीताफळाची मागणी वाढून त्यापासून विविध पदार्थ

बहुगुणी फळ असलेल्या सीताफळाची मागणी वाढून त्यापासून विविध पदार्थ बनवले जात आहेत. आईस्क्रिम, ज्यूस, शेक आदी महागडे पदार्थ तयार केले जातात.

त्याआधारे सीताफळाच्या उपपदार्थांची एक वर्षभर टिकवण क्षमता राहते.

असे पदार्थ तयार करण्यासाठी कच्चा माल मोठ्या प्रमाणात मिळाला तर पदार्थांची मागणी वाढून नागरिकांच्या दररोजच्या आहारामध्ये याचा समावेश होऊ शकणार आहे.

इतर पिकांप्रमाणेच सीताफळातदेखील अळी

इतर पिकांप्रमाणेच सीताफळातदेखील अळी निर्माण होऊ शकते. मात्र सीताफळाच्या वाढीदरम्यान योग्यरित्या औषध फवारणी केल्यास अळी निर्माण होणार नाही.

अळीला अटकाव करण्यासाठी औषधाचे वेळापत्रक व मार्गदर्शन योग्य असणे गरजेचे आहे. सीताफळाचे योग्य नियोजन आवश्यक आहे.

डॉ. कसपटे म्हणाले, सहा महिने पाणी न दिल्याने जमिनी चांगल्या राहतात. पाण्याची बचत होते. कमी पाण्यामध्ये सीताफळ लागवड चांगली होते.

देशात सीताफळाची मागणी भरपूर

देशात सीताफळाची मागणी भरपूर असून परदेशातही अलीकडे मागणी वाढताना दिसत आहे. शेतकर्‍यांनी सीताफळ लागवडीचे योग्य नियोजन करून उत्पादन घेतले तर भरपूर नफा मिळवू शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news