हळद संशोधन केंद्रामुळे वाढणार उत्पादकता | पुढारी

हळद संशोधन केंद्रामुळे वाढणार उत्पादकता

हिंगोली जिल्ह्यात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. हळदीची मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून हिंगोलीची ओळख आहे. हळद संशोधनासाठी येथे केंद्र व्हावे यासाठी खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली होती. 16 फेबु्रवारी 2022 रोजी तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे अभ्यास समितीने मसुदा सादर केला होता. या आधारे राज्य शासनाने या केंद्राच्या मंजुरीसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली होती. त्यानंतर प्रशासनाकडून या हळद संशोधन केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली. वसमत येथील बीजगुणन केंद्राच्या जागेत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र होणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे.

असे होणार संशोधन

हळद संशोधन केंद्रात हळदीचे नवीन संकरित वाण विकसित करणे, खते आणि पाण्याचे नियोजन कर्क्युमिन (हळदीतील रंगद्रव्य) तपासणी केंद्र यासह इतर संशोधन होणार आहे. या केंद्रात शेतीमध्ये उत्पादित झालेला माल किमान दोन वर्षे टिकविता येईल. यासाठी विकिरण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राच्या अ‍ॅग्रो बायोटेक विभागामार्फत 25 कोटींची प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. खत आणि पाण्याचे योग्य नियोजन, हळदीसाठी लागणारी कृषी अवजारे, यांत्रिकीकरण, बॉयलर व पॉलिशर साहित्यासाठी सबसिडी, कर्क्युमिन तपासणी केंद्र, हळद निर्यात केंद्र, हळद लागवड काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्य, साखळी बळकटीकरण, माती, पाणी तपासणी केंद्र आदी विषयांवर हे संशोधन केंद्र काम करणार आहे.

या संशोधन केंद्रामुळे मराठवाड्यातील हळद उत्पादक शेतकर्‍यांना नवनवीन संशोधन उपयुक्त ठरणार आहे. जेणेकरून हळदीच्या उत्पन्नाबरोबरच हळदीवरील प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल. विशेष म्हणजे शेतकर्‍यांना निरोगी बेणे मिळणार असून बंगळूरच्या भाभा अणुसंशोधन केंद्रामार्फत टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारून त्यावर काम होणार आहे. पिकांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी रेडिएशन सेंटर कोल्ड स्टोअरेजचा समावेश राहणार आहे.

4 लाख क्विंटलची खरेदी-विक्री

राज्यात सांगलीनंतर हिंगोलीची बाजारपेठ हळदीसाठी प्रसिद्ध आहे. हळदीचे लागवड क्षेत्र 50 हजार हेक्टर आहे आणि हिंगोली, वसमत आणि जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. मराठवाड्यासह विदर्भातून येथे हळद विक्रीसाठी येते. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वर्षाकाठी 2 लाख क्विंटल, वसमतमध्ये 2 लाख क्विंटल तर उर्वरित बाजारपेठेत 50 हजार क्विंटल हळदीची खरेदी-विक्री होते. यातून कोट्यवधींची उलाढाल होते. वसमत येथे हळद संशोधन केंद्राच्या निर्मितीनंतर उत्पादनात वाढ होण्याबरोबरच इतर प्रक्रिया उद्योगांना चालना मिळणार असून, हिंगोलीची ओळख हळद हब म्हणून होणार आहे.

राज्य शासनाकडे स्वतः पाठपुरावा करून हळद संशोधन केंद्र मंजूर करून घेतले आहे. शेतकर्‍यांसाठी हा क्रांतिकारी निर्णय आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी विशेष लक्ष घातल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.

– गजानन लोंढे, हिंगोली

Back to top button