कांदा साठवणूक करताय? | पुढारी

कांदा साठवणूक करताय?

कांद्याच्या योग्य साठवणीसाठी त्याच्या योग्य जातीच्या निवडीपासून ते कांद्याच्या काढणीपर्यंत करावे लागते. कांदा साठवण ही खालील घटकांचा एकत्रित परिणाम आहे.

पाणी नियोजन

कांदा काढणीपर्यंत पाणी दिले गेले, तर कांद्याच्या माना व्यवस्थित पडत नाहीत. जमिनीत अतिरिक्‍त ओलावा राहिल्यामुळे नवीन मुळे फुटतात आणि अशा कांद्यांना काढणीनंतर कोंब येतात. हे टाळण्यासाठी जमिनीचा प्रकार बघून काढणी अगोदर 15-20 दिवस पाणी देणे बंद करावे.

कांद्याचा आकार/प्रतवारी

कांदा काढणीनंतर प्रतवारी करणे खूप महत्त्वाचे असते. खराब कांदे साठवणीच्या काळात इतर कांद्याचेही नुकसान करतात. याचबरोबर चिंगळी, जोड कांदा आणि डेंगळे कांदे निवडून बाजूला करावेत. प्रतवारी करताना विशेष मोठे कांदे (6.से.मी. व्यास किंवा वरचे) मध्यम (4 ते 6 से. मी. व्यासाचे आणि लहान ते 4 से.मी. व्यास) अशाप्रकारे करावे. मोठ्या कांद्यामध्ये कोंब येण्याचे प्रमाण जास्त असते, तर तयार न झालेल्या लहान कांद्यांमध्ये जास्त प्रमाणात वजनात घट होते. त्यामुळे शक्यतो मध्यम आकाराचे कांदेच साठवणीसाठी वापरावे.

– श्रीकांत देवळे

Back to top button