नियोजन : त्रिसूत्री शेती विकासाची | पुढारी

नियोजन : त्रिसूत्री शेती विकासाची

आपल्या शेतात जास्तीत जास्त उत्पादन यावे, असे प्रत्येक शेतकर्‍याला वाटणे स्वाभाविक आहे. ते येईल, पण त्यासाठी शेतीचे नियोजन, अंदाजपत्रक आणि अर्थसंकल्प या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागतो.

शेती व्यवसायात आहे त्या उपलब्ध साधन सामुग्रीचा योग्य वापर करून जास्त उत्पन्न मिळवणे हे प्रत्येक शेतकर्‍याचे ध्येय असते. यासाठी नियोजन, अंदाजपत्रक आणि अर्थसंकल्प या तीन त्रिसूत्रांचा अभ्यास आणि अवलंब महत्त्वाचा आहे. शेतीचे नियोजन म्हणजे भविष्यात शेतकर्‍याला त्याच्या शेतात काय काम करायचे, कोणते पीक घ्यायचे याचा अभ्यास. शेतीचे नियोजन करत असताना शेतीचा विकास कसा साधता येईल, याचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. नियोजन करत असताना स्थानिक परिस्थितीचा अभ्यास आणि एकूण शेतीची सध्याची स्थिती या गोष्टी समजून घेतल्या तर नियोजन करणे सोपे जाते. नियोजनकाळात किती पैसा उपलब्ध होऊ शकतो, हे पाहूनच नियोजनातील कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे.

शेतीच्या विकासासाठी अनेक प्रकारची साधनसामुग्री लागते. परंतु ती मर्यादित असल्यामुळे एकाच वेळी सर्व कार्यक्रम हाती घेेणे शक्य होत नाही. यासाठी कामाचा अग्रक्रम ठरवून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. शेती विकासासाठी नियोजन करत असताना शेतीला पूरक आणि शेतीवर आधारीत उद्योगधंदे यांचा विकास देखील झाला तरच नियोजनातील कार्यक्षमता वाढते. नियोजनाअंतर्गत कार्यक्रमांचे मूल्यमापन केले पाहिजे. अशा मूल्यमापनाद्वारे अंमलात आणलेल्या नियोजनाच्या त्रुटी लक्षात घेऊन त्या भरून काढण्यासाठी अधिक परिणामकारक असे नियोजन आखता येते. नियोजनात सर्वात महत्त्वाचे आहे ते कोणते पीक घ्यायचे, कधी घ्यायचे हे ठरवणे. त्याचप्रमाणे आवश्यक साधन सामुग्रीचा ताळमेळ बसणे, उत्पादित केलेल्या उत्पादनासाठी मिळणारी किंमत, एकूण उत्पन्न, त्याला होणारा खर्च, त्यापासून मिळणारा नफा, मिळालेला नफा हा ठरवल्याप्रमाणे योग्य आहे की नाही या गोष्टीचे नियोजन करणे. नियोजन करताना निसर्गामुळे होणारा धोका आणि अनिश्चितता, बाजाराची मागणी, पुरवठा, लोकांची आवड-निवड, कालावधी या सर्व गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

नियोजनाचा संबंध हा अंदाजपत्रकाशी असतो. अंदाजपत्रक म्हणजे शेतीच्या उद्दिष्टांचे प्रकटीकरण होय. अंदाजपत्रक हे उपक्रमाच्या भविष्यकालीन गरंजाबद्दल क्रमबद्ध आधारावर केलेले असते. अंदाजपत्रक हे ठराविक
मुदतीसाठी तयार करण्यात येते. निर्धारीत केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने जी धोरणे ठरलेली असतात, त्या विशिष्ट कालावधीसाठी आगाऊ तयार केलेले वित्तीय आणि संख्यात्मक विवरण म्हणजे अंदाजपत्रक होय.

शेतीतील उत्पादनाचे निर्णय घेण्यासाठी शेतकर्‍याला पहिल्यांदा आपल्या उत्पादनाचा तपशिलवार हिशेब मांडावा लागतो. या तपशिलवार हिशेबालाच अर्थसंकल्प असे म्हणतात. हा तयार करत असताना उत्पादनाच्या खर्चाच्या आणि उत्पन्नाच्या सर्व बाबींची माहिती असणे गरजेचे आहे. कोणत्या साधनांची किती प्रमाणात गरज लागणार आहे, ती कोठे उपलब्ध होतील, त्यासाठी किती खर्च येईल, बाजाराची स्थिती, मागणी, पुरवठा, ग्राहकवर्ग, संभाव्य धोका, अनिश्चितता, स्थानिक बाजारपेठा, उत्पादनातील स्पर्धा या सर्व गोष्टींचा अभ्यास केला गेला पाहिजे. शेतीचे व्यापारीकरण होत असल्यामुळे शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. ज्या शेतकर्‍यांना असे बदल करायचे असतात त्यांनी अंदाज बांधणे आवश्यक असते आणि यासाठी अर्थसंकल्पाची आवश्यकता असते. अथर्र्संकल्पाचे दोन भाग पडतात.

एक अल्पकालीन आणि दुसरा दिर्घकालीन अर्थसंकल्प. अल्पकालीन अर्थसंकल्प हा छोट्या कालावधीसाठी आणि मर्यादित असतो. यामध्ये उत्पादनातील स्थिर घटकांमध्ये कोणताही बदल होत नाही. यामध्ये काही भागातच बदल केले जातात. अल्पकालीन अर्थसंकल्पाची व्याख्या लक्षात येण्यासाठी एक उदाहरण घेता येईल. एका शेतकर्‍याच्या शेतात सोेयाबीन, गहू आणि सूर्यफूल ही पिके आहेत. परंतु त्याला सोयाबीनच्या एका नवीन जातीची चाचणी घ्यायची आहे. अशा वेळी तो फक्त त्या पिकापुरताच अर्थसंकल्प तयार करील आणि बाकी पिकात काहीही बदल करणार नाही.

दीर्घकालीनमध्ये शेती व्यसायातील सर्व कार्यक्रमांचा विचार केला जातो. यामध्ये शेतीच्या उत्पादनात एकूणच बदल करण्यासारख्या गोेष्टींचा समावेश होतो. शेतकर्‍याला त्याची संपूर्ण पिके बदलायची असतील आणि त्याजागी फळबाग तयार करायची असेल तर त्याला संपूर्ण अर्थसंकल्पात बदल घडवावा लागतो. फळबागेसाठी नवीन अवजारे उपयोगी नाहीत असे कापणी यंत्र विकून टाकावे लागते. अशा प्रकारे सर्व बदलांचे पैशात सविस्तर विवरण आणि फायद्या तोट्याचे अंदाज बांधणे हे दीर्घमुदतीच्या अर्थसंकल्पात महत्त्वाचे आहे. हा तयार करण्यासाठी शासन कृषी विद्यापीठे, कृषितज्ज्ञ, कृषी संशोधक यांची मदत शेतकर्‍याने घेणे गरजेचे आहे. कारण अशा प्रकारचे अर्थसंकल्प तयार करणे अवघड आणि किचकट आहे.
– सत्यजित दुर्वेकर

Back to top button