वाढत्या तापमानात फळबागा जगवताना काय काळजी घ्यावी? | पुढारी

वाढत्या तापमानात फळबागा जगवताना काय काळजी घ्यावी?

उन्हाच्या झळा आता आणखीन तीव्र होत जाणार आहेत. गतवर्षीचा अनुभव पाहता तापमानात यंदाही चांगलीच वाढ होणार याचा अनुभव आता येऊ लागला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात इतर पिकांबरोबरच फळझाडांची काळजी घेणे आवश्यक ठरते. विशेषतः ज्या भागात मागील काही वर्षांत पाऊस अत्यंत लहरी व कमी झाला आहे, तेथील फळझाडांना उन्हाळ्याच्या दिवसात धोका संभवतो. प्रसंगी ही झाडे दगावूही शकतात. अशा वेळी या दिवसात या झाडांची काय काळजी घ्यावी, याची माहिती घेणं आवश्यक ठरतं.

आपल्याकडे गतवर्षी पाऊस दीर्घकाळ पडला असला, तरी त्याच्या लहरीपणामुळे फायद्याहून नुकसानच अधिक झाल्याचे दिसून आले. त्यातही काही भागात पावसाने दडी मारल्यामुळे त्या भागात आताच उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले आहेत. ही परिस्थिती आता नवी राहिली नाही. त्यामुळे ज्या प्रदेशात कडक उन्हाळा व पाणीटंचाई नेहमी वा वारंवार भासते, तेथे कमी पाण्यावर टिकाव धरणारी काटक फळझाडे बोर, सीताफळ, डाळिंब, आवळा ही फळझाडे निवडावीत व त्यांची लागवड करावी. गरम झळांपासून बागेचा बचाव व्हावा म्हणून बागेच्या सभोवार नीलगिरी, मलबेरी, शेवरी, शिकेकाई, सुबाभूळ, प्रोसोफीस, नीम, चिंच, शेवगा, पांगारा या वाराप्रतिबंध झाडांची रांग वा पट्टा लावणे फायद्याचे ठरते. पन्हेरीतील रोपे व कलमांना तसेच शेतात लावलेल्या कलमांना वाचविण्यासाठी एप्रिल महिना निवडावा. या महिन्यात पहिला ते दुसरा आठवडा या काळात वाफ्यासभोवती बोरू पेरावा. त्यामुळे जूनपर्यंत पन्हेरीत कलमावर अर्धसावली येऊन संरक्षण होईल. नाजूक व संवेदनशील रोपे, कलमे यांच्या पॉलिथीन बॅग व कुंडा ग्रीन हाऊसमध्ये किंवा झाडाखाली नेऊन ठेवाव्यात. नवीन लावलेल्या कलमावर इरले किंवा खोपटे उत्तर-दक्षिण उभारावे. हे इरले तुर्‍हाट्या, पर्‍हाट्या, शेवरी, बांबू कमच्या यापैकी कशाचेही करता येईल किंवा रोपाभोवती बाभळी, बोरी व पर्‍हाटीचे कटघर करावे. त्यामुळे रोपांना सावली मिळून उन्हाच्या झळांपासून रक्षण होईल. शिवाय, गुरांपासून होणारे नुकसानही टाळता येईल.

मोठ्या बागेतील मोकळ्या जागेत पालापाचोळा, तणस इ.चे आवरण घालावे. आवरणाचा थर तीन ते चार इंच असावा. उन्हाळ्याच्या सुरुवातीस खोडाला सफेदी लावावी. सफेदीसाठी जस्त सल्फेट 2 किलो, विरजलेला चुना 20 किलो, पाणी 500 लिटर असे द्रावण करून झाडाच्या खोडावर 1 ते दीड इंच मीटर लावावे किंवा बोर्डोपेस्ट तयार करून ते लावावे. त्यामुळे सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात परावर्तित होईल.केळी व पपईसाठी झाडाच्या खोडावर सोपट, पाने, गवताच्या पेंड्या बांधाव्यात. झाडांना उपलब्ध पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करावा. त्यामुळे पाण्याची काटकसर होऊन जास्त झाडांचे ओलीत तेवढ्याच पाण्यात जाईल. याशिवाय मोठ्या झाडांना काटकसरीने पाणी देण्याची पद्धत अवलंबावी. यासाठी मातीचा वरंबा कर्णाच्या दिशेने टाकावा व अर्ध्या भागात एकदा व अर्ध्यात दुसर्‍या वेळी पाणी द्यावे. असे केल्याने 50 टक्के पाण्याची बचत होते. वरील सर्व पद्धतीत पाण्याच्या दांडात व झाडाच्या वाफ्यात 3 ते 4 जाडीचे गवत/पाचोळ्याचे/गव्हांडा वा धानतुसाचे आवरण घालणे उपयुक्‍त ठरते. साधारणपणे केळीच्या बागेला जास्त पाणी लागते; मात्र अवर्षण व पाणी टंचाईच्या काळात केळीच्या आळ्यात दोन ते चार पालापाचोळा/गवताचे आवरण घाला, तसेच केळीच्या पानावर 6 ते 8 टक्के तीव्रतेचे केओलीन या पावडरचे द्रावण फवारले, तर पाण्याच्या काही पाळ्या कमी लागतात. एक हेक्टर केळीबागेला सुमारे सहा किलो केओलीन लागते. ही फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.

केळीच्या झाडांना ठिबक सिंचनाद्वारे ओलीत केल्यास 44 एकर इंच पाणी लागते, तर वाफे पद्धतीत 108 एकर इंच पाणी लागते. जोड ओळी पद्धतीने ठिबक सिंचनाने खर्च, वेळ आणि पाणी यांची बचत होते. नवीन लावलेल्या एक ते तीन वर्षे वयाच्या कलमांना गाडगे पद्धतीने पाणी द्यावे. 5 ते 10 लिटरचे मातीचे गाडगे घेऊन, त्याच्या बुडाशी बारीक छिद्र पाडून, त्यात चिंधी बांधावी व बाहेर काढावी. असे माठ भरून ते झाडाच्या बुडाशी 3 लहान दगडांवर ठेवावेत किंवा 6 ते 8 इंच खोल मातीत गाडावे. यात दर 4 ते 6 दिवसांनी पाणी भरावे. म्हणजे कडक उन्हाळ्यात आंबा, चिकू, संत्रा कलमे वाचू शकतील. आंब्याच्या, संत्र्याच्या कलमांच्या जोडावर शेवाळ ओले करून बांधावे. ते दर तिसर्‍या दिवशी ओले करावे. त्यामुळे कलम वाळण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. फवारा सिंचन पद्धतीत पाण्याचा वापर काटकसरीने होतो; मात्र भांडवली खर्च जास्त येतो. म्हणून सहकारी तत्त्वावर किंवा भाडेपद्धतीने ही सामग्री वापरणे सोईचे होईल. ठिबक पद्धत ही एक आधुनिक व अतिशय काटकसरीने पाणी वापरण्याची पद्धत आहे. यात थेंब थेंब पाणी देण्याची सोय असते. उन्हाळ्याच्या दिवसात फळझाडांसाठी याचा वापर केल्यास उपलब्ध पाण्याचा योग्य वापर होईलच; शिवाय कमी पाण्यात मोठी जमीन ओलिताखाली आणता येईल. – अनिल विद्याधर

Back to top button