उन्हाळ्यातील ऊस पिकाचे व्यवस्थापन | पुढारी

उन्हाळ्यातील ऊस पिकाचे व्यवस्थापन

ऊस हे मुळातच 12 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचे आणि दीर्घ मुदतीचे पीक आहे. त्याची पाण्याची गरज जास्त असल्याने पाणी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यावे लागते. उसाला लागणार्‍या पाण्याची गरज प्रामुख्याने जमिनीचा प्रकार, वर्षभरात पडलेला पाऊस, तापमान, मशागत पद्धती, पाणी वापर कार्यक्षमता या बाबींवर अवलंबून असते.

उसाची वाढ आणि जमिनीतील ओलावा यांचे फार घनिष्ठ संबंध आहेत. उसाची लागवड भारी जमिनीत केल्यास पाण्याचा ताण हे पीक सहन करू शकते. उसाच्या चार महत्त्वाच्या संवेदनशील अवस्था असून प्रामुख्याने उगवणीचा कालावधी, फुटवे फुटण्याची अवस्था, मुख्य वाढीचा काळ आणि ऊस पक्व होण्याचा कालावधी. या अवस्थांमध्ये पाणी नियोजन करणे गरजेचे आहे. फुटवे फुटणे आणि मुख्य वाढीचा काळ मार्च ते मे या प्रदीर्घ उन्हाळयात महिन्यांमध्ये पाण्याचा ताण पडतो. पयार्याने 4 ते 5 कांडी

आखूड पडतात आणि पावसाळा

सुरू झाल्यानंतर पुन्हा लांब कांडी पडतात म्हणून या महिन्यात उसाच्या मुळाच्या सान्निध्यात पुरेशी ओल ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जमिनीच्या प्रकारानुसार ज्यांचेकडे पुरेसे पाणी आहे, त्यांनी उन्हाळी हंगामात तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे पाण्याचे नियोजन करावे. संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडला व नंतरच्या अवस्थेत भरपूर पाणी दिले तरी नुकसान भरून येत नाही.

सरीआड सरी पाणी

आडसाली व पूर्वहंगामी उसामध्ये पाण्याचा ताण पडल्यास एकाआड एक सरीतून पाणी द्यावे. उसाची खालील पक्व पाने काढून त्याचे सरीमध्ये आच्छादन करावे. पट्टा पद्धतीने लागवड केली असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. पीक तणविरहित ठेवावे. ज्या सरीला पहिल्या रोटेशनला पाणी दिले आहे, त्यानंतरच्या सरीला दुसर्‍या रोटेशनला पाणी देणे. यामुळे 40 टक्के पाण्याची बचत होऊ शकते.

उसाची ठिबक सिंचन

ठिबक सिंचन पद्धतीमध्ये उसाची लागवड रुंद सरी पद्धतीने 5 ते 6 फूट आंतरावर करावी. लागवड पद्धतीत बदल करून मर्यादित पाण्यावर उसाचे पीक घेता येईल. पाण्यामध्ये 50 टक्यापर्यंत म्हणजेच हेक्टरी 125 लाख लिटर एवढी पाण्याची बचत होते. रोपांची लागण करताना दोन रोपांत भारी जमिनीत 2 फूट अंतर ठेवावे. पिकाची एकसारखी वाढ होते. दोन डोळ्यांची टिपरी वापरताना त्यामध्ये अर्धा फूट अंतर ठेवून लागण करावी. दोन ओळीच्या मध्यावर ठिबक सिंचन नळी ठेवावी. ड्रिपरच्या प्रवाहानुसार दोन ड्रिपरमध्ये 40 ते 60 सेंमी. अंतर ठेवावे. कमी प्रवाह असलेले ड्रिपर वापरून दिवसाआड पाणी देणे.या पद्धतीमध्ये 45 दिवसांचा ऊस झाल्यानंतर लागवडीच्या उसात पाचटाचा वापर केल्यास 75 टक्के पाण्याची बचत करणे शक्य आहे. जमीन सतत वाफसा अवस्थेत राहिल्याने उसाची वाढ जोमाने होते. फुटव्यांची संख्या वाढून एकरी 45 हजारपर्यंत उसाची संख्या मिळते. त्याचबरोबर उसाची आणि कांड्याची लांबी, गोलाई, सरासरी वजन आणि पर्यायाने साखर उत्पादन वाढते. ठिबक सिंचन पद्धत ही व्यवस्थित आणि तांत्रिकद़ृष्ट्या योग्य पद्धतीने वापरली तरच आपणाला फायदे मिळू शकतात. त्याकरिता ठिबक सिंचन पद्धतीचा आराखडा आणि आरेखन शास्त्रीयद़ृष्ट्या व्यवस्थित असणे आवश्यक आहे.

सेंद्रिय खतांचा वापर

सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीतील अंतर्गत तापमान संतुलित राहते. सेंद्रिय खतामुळे जमिनीची जलधारणक्षमता, जडणघडण आणि हवेचे प्रमाण वाढते. त्याच बरोबर सेंद्रिय कर्बाचा पुरवठा सुरळीत होतो. सेंद्रिय पदार्थांमध्ये प्रामुख्याने हिरवळीचे खत, हंगामानुसार हेक्टरी 20 ते 30 टन शेणखत, 5 टन कंपोस्ट खत आणि 5 टन गांडूळ खत यांचा वापर करावा. यामुळे उसाचे पीक पाण्याचा ताण सहन करू शकते.

आंतरमशागत व यंत्राचा वापर

ज्याठिकाणी पाचटाचा वापर केला नाही त्याठिकाणी पाण्याचा ताण पडल्यानंतर भेगा पडल्याचे आढळून येते. त्यामुळे जमिनीतील ओल बाष्पीभवनाने झपाट्याने कमी होते. जमिनीला भेगा पडू नये म्हणून छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आंतरमशागतीची (कुळवणी) कामे करावीत. मातीच्या थरामुळे आच्छादन तयार होते, त्यामुळे भेगा पडण्याचे प्रमाण लांबणीवर पडते.

बाष्परोधक आणि उपयुक्त अन्नद्रव्यांची फवारणी

ऊस पीक वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश हे प्रमुख अन्नद्रव्य तसेच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व गंधक हे दुय्यम अन्नद्रव्य आणि लोह, जस्त, मंगल, बोरोन, तांबे व मोलिब्डेनम हे सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. तसेच या वरोबर सिलिकॅान या अन्नद्रव्याचीसुद्धा गरज भासत असते. ऊस पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी 6 ते 8 टक्के केवोलिन (1 लिटर पाण्यासाठी 60 ते 80 ग्रॅम) या बाष्परोधकाची फवारणी करावी. ज्या उसाची बांधणी झालेली नाही, अशा उसास बांधणीच्या वेळेस शिफारशीपेक्षा 25% जास्त पालाश खताची मात्रा द्यावी. पालाश खतामुळे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता या पिकामध्ये राहते. पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास दर 3 आठवड्यांनी 2% म्युरेट ऑफ पोटॅश (20 ग्रॅम प्रती लिटर) व 2% युरिया (20 ग्रॅम प्रती लिटर) यांचे मिश्रण करून फवारणी करावी. पीक तणविरहित ठेवावे. ज्या ठिकाणी पटटा पद्धतीने लागण केलेली आहे, अशा ठिकाणी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. सिलिकॉन हे ऊस पिकाला फायदेशीर अन्नद्रव्य असून पाण्याचा ताण असलेल्या क्षेत्रात बाष्पोर्त्सजनाचा वेग सिलिकॉनच्या वापरामुळे 10 टक्क्याने कमी होतो. उसामध्ये जिब्रेलिक अ‍ॅसिड, सिक्स बेन्झिल अमायनोप्युरिन या संजीविकेचा वापर, 19:19:19 खताची मात्रा, चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य व सिलिकॉन (मोनोसिलिसायलिक अ‍ॅसिड) या अन्नद्रव्यांबरोबर उसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार 45 दिवसांपासून ते 125 दिवसांपर्यंत केला, तर ऊस उत्पादनात 15-20 टक्केपर्यंत वाढ झालेली दिसून येते व उत्पादनात भर पडते.

उसाच्या सभोवती उंच व जलद वाढणार्‍या पिकांची लागवड

ऊस शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी वारा प्रतिबंधक व उन्हाच्या झळा रोखण्यासाठी शेवरीसारखी पिके लावावीत. वरील उपाययोजनांची अंमलबजावणी केल्यास अवर्षणामुळे ऊस उत्पादनात येणारी घट कमी करता येईल.
(समाप्त)

– डॉ. भरत रासकर, ऊस विशेषज्ञ

Back to top button