

उन्हाळ्यात कोंबड्यांच्या आहाराबाबत आणि व्यवस्थापनातबाबत पुरेशी काळजी न घेतल्यास खालील दुष्परिणाम दिसतात. कोंबड्यांच्या अंडी देण्याच्या आणि अंडी उबविण्याच्या क्षमतेत कमीपणा येतो. तसेच काही वेळा कोंबड्यांच्या अंड्यांचा आकार लहान होतो. अंड्यांच्या कवचाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची होते. व्यवसायावर थेट परिणाम करणारी ही लक्षणे दिवसण्याअगोदर कोंबड्या उष्णतेचा त्रास जाणवत असल्यास काही लक्षणे दाखवितात. त्याच वेळी उपाययोजना केल्यास पुढे होणारे आर्थिक नुकसान टाळता येते.
कोंबड्यांना उष्णतेचा त्रास जाणवल्यास त्या शांतपणे उभ्या राहतात. त्यांच्याकडे मंदपणा आणि सुस्तपणा दिसून येतो. त्या जास्त पाणी पितात आणि खाद्य कमी प्रमाणात खातात. काही कोंबड्या पाण्याच्या भांड्याजवळ मान वाकवून उभ्या राहतात, तर काही कोंबड्या भिंतीचा आडोसा घेऊन शांतपणे उभ्या राहतात. शरीरातील वाढलेल्या उष्णतेला कमी करण्यासाठी आणि थंडपणा आणण्यासाठी कोंबड्या त्यांचे पंख शरीरापासून दूर पसरवितात. उष्णतेचा त्रास आणखी वाढल्यास कोंबड्या तोडांची सतत उघडझाप करतात आणि धापा टाकतात.
– मिलिंद सोलापूरकर