Pomegranate farming : मुकाबला डाळिंबावरील रोगाचा | पुढारी

Pomegranate farming : मुकाबला डाळिंबावरील रोगाचा

डाळिंब झाडाच्या मर रोगास कारणीभूत महत्त्वाचा घटक म्हणजे खोडाला लहान छिद्रे पाडणारा भुंगेरा ही कीड होय. यालाच खोड भुंगा किंवा शॉट हॉल बॉरर असेही म्हणतात. या भुंग्याची मादी खोडात शिरून खोड पोखरते. कोणत्याही दिशेने पोखरते आणि त्यातून भुस्सा बाहेर फेकते. पोखरण्यामुळे आत लहान टाचणी किंवा सुईच्या आकाराचे बोगदे तयार होतात. या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास अगदी वरच्या फांद्यांच्या शेंड्याकडील भागातील ही कीड छिद्रे पाडताना दिसून येते.

झाडावरील छिद्रे आणि बोगद्यामुळे झाडातील अन्‍नरस निर्माण होण्याचे आणि विविध भागांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य बिघडते. पाने निस्तेज होऊन गळू लागतात. फुले आणि फळे कमी प्रमाणात येतात. तसेच कमकुवत झालेल्या फांद्या वार्‍यामुळे मोडतात. प्रादुर्भाव आठ आणि दहा वर्षे वयाच्या बागेमध्ये झाडावर मोठ्या प्रमाणात नुकसान करताना दिसून येतो. अलीकडे कमी वयाच्या बागेमध्येही या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. उपायोजना : बागेत झाडांची दाटी होणार नाही याची काळजी घ्यावी. बाग स्वच्छ ठेवावी. बागेभोवती अथवा जवळपास शक्यतो एरंडी लागवड करून नये.

फ्लोरो पायरी फास (20 टक्के) प्रवाही किंवा कार्बारील (50 टक्के) 40 गॅ्रम दहा लिटर पाण्यात मिसळून खोडावर/फांद्यांवर फवारावे.
चार किलो गेरू दहा लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालून दुसर्‍या दिवशी काठीने द्रावण चांगले ढवळावे. त्यात क्लोरोपायरीफॉस (20 टक्के) प्रवाही 50 मिली 25 ग्रॅम कोपर ऑक्झिक्लोराईड टाकून काठीने मिसळावे. अशी तयार झालेली पेस्ट वर्षातून एकदा जून-जुलै महिन्यात खोडावर तीन-चार फुटांपर्यंत ब्रशच्या साहाय्याने लावावी. कमी प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर डाळिंबाच्या खोड कीड नियंत्रणासाठी छिद्रामध्ये इंजेक्शनद्वारे डायक्लोरव्हॉस 10 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे आणि हे द्रावण छिद्रामध्ये सोडावे आणि हे छिद्र चिखलाने बंद करावे. नेहमीच्या कीटकनाशक फवारणीचे वेळी अधूनमधून खोडावर आणि फांद्यांवर अशी संपूर्ण झाडांवर फवारणी करावी.

– सत्यजित दुर्वेकर

Back to top button