रब्बी पिकानंतर घ्या उन्हाळी मूग पीक, पेरणी कशी करावी?

रब्बी पिकानंतर घ्या उन्हाळी मूग पीक, पेरणी कशी करावी?

उन्हाळी हंगामातही मुगाची शेती केली जाते. खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात या पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. परिणामी अधिक उत्पन्‍न मिळण्यास मदत होते. फेबु्रवारीमध्ये ऊस तोडणी झालेल्या क्षेत्रात तसेच रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई. इ. रब्बी पिकानंतर उन्हाळी मूग घेता येतो.

उन्हाळी हंगामात मुगाची पेरणी करताना 15 ते 20 किलो प्रतिहेक्टरी बियाणे वापरावे. दोन ओळींमध्ये 30 से.मी. आणि दोन रोपांमध्ये 10 से.मी. अंतर ठेवून पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक आणि जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करून घ्यावी. मुगामध्ये अनेक वाण उपलब्ध आहेत. यातील वैभव हा वाण खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामासाठी उपयुक्‍त आहे. तसेच वैभव, बी. एस. 4 बी. पी एस. आर. 145 हे दोन वाण भुरी रोगप्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणारे आहेत.

कंपोस्ट खत किंवा चांगले कुजलेले शेणखत 5 टन प्रतिहेक्टरप्रमाणे कुळवणीच्या वेळी शेतात पसरून द्यावे. पेरणी करताना 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद प्रतिहेक्टरी द्यावे. पिकास पालाश 30 किलो प्रतिहेक्टर द्यावे. पिकास पालाश 30 किलो प्रतिहेक्टर दिल्यास पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. पीक पेरणीपासून पहिले 30 ते 45 दिवस तण विरहित ठेवावे, त्यामुळे अपेक्षित उत्पादन गाठता येते. उन्हाळी मुगाचा कालावधी ऐन उन्हाळ्यात येत असल्यामुळे ओलिताच्या साधारपणे 5 ते 6 पाळ्या द्याव्यात. पीक पेरणीच्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणपणे दर 8 ते 10 दिवसांने पाण्याची पातळी द्यावी. फुले येताना आणि शेंगा भरताना या पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.

मूग पिकावर प्रामुख्याने भुरी पिवळा विषाणू या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगच पाण्यात मिसळणारे गंधक 1250 ग्रॅम किंवा 250 ग्रॅम कार्बेडँझीम अधिक 36 टक्के प्रवाही मोनोक्रोटोफॉस 550 मिली 500 लिटर पाण्यातून प्रतिहेक्टरी फवारावे. आवश्यकता वाटल्यास 8-10 दिवसांनी आणखी एक फवारणी करावी. मुगाच्या शेंगा 75 टक्के वाळल्यावर पहिली तोडणी करावी आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात आणि खळ्यावर चांगल्या वाळल्यानंतर मळणी करावी. मूग धान्य 5-6 दिवस चांगले कडक उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे.
– प्रसाद पाटील

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news