Pesticides : धुरीजन्य कीटकनाशकांचा वापर | पुढारी

Pesticides : धुरीजन्य कीटकनाशकांचा वापर

शेतीव्यवसायात पिकांच्या लागवडीच्या वेळी जशी काळजी घ्यावी लागते, तितकीच किंबहुना त्याहून अधिक काळजी पीक तयार होत आल्यानंतर, तयार झाल्यानंतर घ्यावी लागते. विशेषतः, पिकांचे अळी, तुडतुडे, कीटक यांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे असते. यांपासून धान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

भुंगेरे, पतंग अशा विविध प्रकारच्या किडी धान्य पोखरतात आणि त्यातील पौष्टिक घटक खातात. कीडग्रस्त बियाणे जमिनीत पेरले असता उगवत नाही आणि कीडग्रस्त धान्य खाण्यासाठी अयोग्य ठरते. म्हणून धान्याची साठवणूक काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. धान्यास कीड लागू नये म्हणून साठवणुकीत करावयाच्या अनेक उपाययोजना आहेत, त्यापैकी धुरीजन्य औषधे वापरून करावयाचे उपाय स्पष्ट केले आहेत.

अ‍ॅल्युमिनियम फॉस्फाईड या धुरीजन्य कीटकनाशकाच्या 3 ग्रॅम वजनाच्या 3 गोळ्या प्रतिटन कोठारातील धान्यास अथवा 150 ग्रॅम पावडर प्रति 100 घनमीटर जागेसाठी अथवा 10 ग्रॅम पाऊच प्रतिटन धान्यासाठी 5 ते 7 दिवस संपर्कात ठेवल्यास किडींचा नाश होतो. ज्या धान्याचे किंवा बियाण्याचे किंवा कोठारीतील जागेचे धुरीकरण करावयाचे आहे ते हवा बंद असावे. तसेच धुरीकरणानंतर प्लास्टिक कागद अथवा ताडपत्री हळूवार काढावी आणि असे धान्य किंवा बियाण्याचा वापर 48 तासांनी करावा. सदरहू गोळ्या सेल्फास किंवा क्विकफॉस या नावाने बाजारात उपलब्ध आहेत.

याशिवाय 3:1 व्ही/व्ही या धुरीजन्य कीटकनाशकाचा वापर धान्य साठवणूक कोठारात 300 ते 400 ग्रॅम प्रति घनमीटर जागेसाठी अथवा 150 ग्र्रॅम प्रति घनमीटर जागेसाठी कोठाराचे धुरीकरण करण्यासाठी करावा. धुरीकरणानंतर प्लास्टिक कागद अथवा ताडपत्री हळूवार काढावी आणि असे धान्य/बियाण्याचा वापर 24 तासांनी करावा. बियाण्यास 48 आणि 72 तासांपर्यंत धुरीकरण करावे. तसेच रिकाम्या कोठारासाठी धुरीकरण 7 दिवसांपर्यंत करावे. काही शेतकरी इ.डी.बी. अ‍ॅप्पुल्स या धुरीनाशकाचा वापर करतात. मात्र, कायद्याने त्याचा वापर करणे अयोग्य असून त्याचा वापर करू नये. धुरीजन्य कीटकनाशकाचा वापर शासनमान्य अधिकृत परवानाधारक धुरीकरण यंत्रणेमार्फतच करावा; अन्यथा आपल्या आणि आपल्यासोबत असणार्‍यांच्या जीवितास धोका उद्भवू शकतो.
– विलास कदम

हेही वाचलत का ?

Back to top button