

कडधान्यांमध्ये हुलगा किंवा कुळीथाचाही समावेश होतो. कमी कालावधीत हे पीक हाताशी येते; पण त्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. यामध्ये विविध जाती उपलब्ध असल्याने शेतकर्यांसमोर विविध पर्याय असतात. या धान्याची लागवड करून शेतकर्याला चांगला फायदा होऊ शकतो.
आपल्या आहारात कडधान्यांचे अतिशय महत्त्व आहे. वेगवेगळ्या कडधान्यांचा वापर आपण आहारात करतो. कुळीथ किंवा हुलगा हे असेच एक कडधान्य आहे. माणसांप्रमाणेच जनावरांच्या आहारातही याचा समावेश केला जातो. पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागात विशेषतः नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सांगली आणि जळगाव या जिल्ह्यातील डोंगर उताराच्या आणि माळरानांच्या हलक्या जमिनीवर खरीप हंगामात हे पीक घेतले जाते. तसेच कोकण आणि विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाळी भातानंतर भात खाचरात शिल्लक असलेल्या ओलाव्यावर रब्बी हंगामात हे पीक घेतले जाते.
पावसाळ्याच्या दिवसांत याची पेरणी करता येते. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे एक चाचणी घेण्यात आली. जूनच्या तिसर्या आठवड्यात धूळपेरणी केल्यास हेक्टरी सरासरी 6 क्विंटल उत्पादन मिळते, असे यातून दिसून आले. भरपूर पाऊस पडल्यानंतर जुलैच्या दुसर्या पंधरवड्यात पेरणी केल्यास 5 क्विंटल आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पेरलेल्या पिकापासून 4 क्विंटल उत्पादन मिळते. खरिपात दोन फणांतील 30 सें.मी. अंतर असलेल्या दुचाडी पाभरीने पेरणी करावी. रब्बी हंगामात ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये विशेषतः मशागत न करता भात कापणीनंतर लागलीच नांगरामागे पेरणी करावी. म्हणजे जमिनीतील ओलाव्याचा पिकाच्या उगवणीसाठी आणि वाढीसाठी उपयोग होईल. खरिपात हेक्टरी 15 किलो तर रब्बी हंगामात नांगराच्या तासामध्ये पेरणीसाठी हेक्टरी 30 किलो बियाणे पेरावे.
हे पीक मुख्यतः हलक्या जमिनीत घेत असल्याने त्यास पेरणीच्या वेळी हेक्टरी 10 ते 15 किलो नत्र आणि 20 ते 30 किलो स्फुरद दिल्याने उत्पादन वाढण्यास मदत होते. पीक 30 दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी केल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. धूळ पेरणी केलेली असल्यास कोळपणी आणि खुरपणी आवश्यक आहे.
कृषी संशोधन केंद्र, सोलापूर येथून सीना आणि माण हे दोन वाण पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आले आहेत. सीना या वाणाचे पीक 120 ते 125 दिवसांत तयार होत असून त्याच्या दाण्यांचा रंग भुरकट पांढरा आहे. त्यापासून हेक्टरी 750 ते 800 किलो उत्पादन मिळते. माण हा लाल दाण्याचा वाण 100 ते 105 दिवसांत तयार होत असून त्यापासून हेक्टरी 350 ते 700 किलो उत्पन्न मिळते. रब्बी हंगामात कोकणात पेरण्यासाठी दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातर्फे दापोली-1 हे वाण प्रसारित करण्यात आले असून त्यापासून हेक्टरी 7 ते 8 क्विंटल उत्पादन मिळते. हा वाण निवड पद्धतीने विकसित केला असून 1984 मध्ये प्रसारित करण्यात आला. हे वाण 45 ते 75 से.मी. उंच वाढते. तसेच 50 ते 55 दिवसांत ती फुलांवर येऊन 90 ते 100 दिवसांत कापणीस येते. ही जात विषाणूजन्य हळव्या रोगास प्रतिकारक्षम आहे. या जातीचे उत्पादन हेक्टरी 7 ते 8 क्विंटल येते. सीना आणि दापोली-1 हे वाण केवडा या विषाणुजन्य रोगास बर्याच अंशी प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे. कुलथी एच.पी.के. 6 (दीपाली) हा वाण मराठवाडा कृषी विद्यापीठाने शिफारस केला आहे. या वाणाची निवड हिमाचल प्रदेशामधील स्थानिक वाणांमधून केलेली आहे. या वाणाचे पीक 84 दिवसांत तयार होते. हा वाण सर्वसाधारणपणे पानावरील ठिपक्याच्या रोगास प्रतिकारक असून तो पिवळा मोझॅक या विषाणू रोगास प्रतिकारक आहे. त्यापासून हेक्टरी 7 ते 8 क्विंटल उत्पादन मिळेल.
या पिकावर फुलकिडे, पाने खाणारी अळी व पीक फुलोर्यात असताना शेंगा पोखरणारी अळी या किडींचा उपद्रव होतो. त्यासाठी हेक्टरी 10 टक्के बी.एच.सी. भुकटी 15 किलो अधिक कार्बारील भुकटी 5 किलो एकत्र मिसळून किंवा 1.5 टक्के क्विनॉलफॉस भुकटी हेक्टरी 20 किलो या प्रमाणात फवारावी. केवडा किंवा मोेझॅक हा रोग अतिसूक्ष्म विषाणूंपासून होतो. रोगग्रस्त पानांवर वेगवेगळ्या आकारांचे पिवळे चट्टे पडतात. पानांचा आकार लहान होऊन पाने पूर्णपणे पिवळी पडतात व गळून जातात. पांढरी माशी या कीटकाद्वारे रोगाचा फैलाव होतो. केवडाग्रस्त झाडे शेतात विखुरेलेली दिसतात व सहज नजरेत भरतात. अन्नग्रहणाच्या प्रक्रियेत बाधा आल्यामुळे फुलोरा, शेंगा तसेच पर्यायाने उत्पादनावर विपरित परिणाम होतो. या रोगापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी रोग प्रतिकारक्षम वाणांची लागवड करणे फायदेशीर ठरते. रोपे लहान असताना अचानक कोमेजून जातात व मरतात. रोपांची मुळे कुजत नाहीत. पेरणीनंतर 3 ते 4 आठवड्यानंतर मर रोग दिसू लागतो. रोगाच्या नियंत्रणासाठी पिकांची
फेरपालट करावी. पीक काढणीस तयार झाल्यावर ते जमिनीपासून उपटून अगर जमिनीलगत विळ्याने कापून, खळ्यावर आणून उन्हात चांगले वाळवावे व नंतर काठीने झोडपून अगर बैलांच्या सहाय्याने तुडवून मळणी करावी. त्यातील भुसा वेगळा करावा. धान्यास एक-दोन चांगली उन्हे देऊन नंतर साठवण करावी.
– विलास कदम