साहित्य : भारतीय मनाचा फ्रेंच लेखक

साहित्य : भारतीय मनाचा फ्रेंच लेखक
Published on
Updated on

नीलेश बने

मी फ्रान्समध्ये जन्मलो; पण मी मेल्यानंतर माझ्या कबरीवर माझा जन्म, मृत्यू लिहिल्यानंतर, मी कोलकात्याचा 'सिटीझन ऑफ ऑनर' आहे हे मात्र नक्की लिहा, असं सांगणारा फ्रेंच लेखक डॉमनिक लॅपिएर यांचं नुकतंच निधन झालं. भारताची स्वातंत्र्यकथा, कोलकात्यातल्या रिक्षावाल्याचं आयुष्य आणि भोपाळ गॅस दुर्घटनेची वेदना शब्दात मांडणारा हा लेखक मनानं सच्चा भारतीय होता.

मी एकदा कोलकात्याच्या झोपडपट्टीतून चाललो होतो. तिथं लोकं वाद्यं वाजवत होती, बेधुंद नाचत होती. मी विचारलं, कोणत्या देवाचा उत्सव आहे. ते म्हणाले, आम्ही देवाचा नाही, वसंताच्या आगमनाचा उत्सव साजरा करतोय. ज्या झोपडपट्टीत एकही झाड नव्हतं, पान नव्हतं, फूल नव्हतं तिथं वसंताच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी हिंमत लागते, दुर्दम्य आशा लागते. आमच्या पश्चिमेकडे सगळं असूनही आम्ही दुःखी आहोत; कारण आमच्याकडे जे आहे त्याची आम्हाला किंमत नाही. भारत हा असा देश आहे की, जिथं आयुष्यात काहीही नसलं, तरी इथले लोक आनंदानं राहू शकतात. मला ही माझ्या जगण्याची प्रेरणा वाटते, म्हणूनच मी भारताच्या प्रेमात आहे. हे शब्द आहेत कोट्यवधी पुस्तकांच्या प्रती विकल्या गेलेल्या जगातल्या एका बेस्टसेलर लेखकाचे, डॉमनिक लॅपिएर यांचे.

'फ्रीडम ऑफ मिडनाईट', 'सिटी ऑफ जॉय', 'ओ जेरूसलेम', 'इज पॅरिस बर्निंग' अशा गाजलेल्या पुस्तकांचे लेखक म्हणून डॉमनिक लॅपिएर यांची ओळख आहे; पण एक लेखक यापेक्षाही, आपल्या रॉयल्टीमधून भारतात प्रचंड मोठं समाजकार्य उभं करणारा एक संवेदनशील समाजसेवक म्हणून त्यांच्याबद्दल अधिक आत्मीयता आहे. लेखकानं केवळ आपल्या हस्तिदंती मनोर्‍यात बसू नये, त्यानं लोकांमध्ये उतरावं, त्यांच्याकडून ज्ञान घ्यावं आणि त्याबदल्यात त्यांची सेवा करावी, असं ते मनापासून मानत असत. त्यांच्यातल्या या संवेदनशील लेखकाचा गौरव करण्यासाठीच 2008 मध्ये त्यांना 'पद्मभूषण' हा भारतातला मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
डॉमनिक यांचा जन्म 30 जुलै 1931 ला फ्रान्समध्ये झाला. त्यांचे वडील हे फ्रान्सचे कौन्सूल जनरल होते. त्यामुळे त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षीच अमेरिका पाहिली. त्याआधीपासूनच त्यांना गाड्यांचं आणि ड्रायव्हिंगचं वेड होतं. जुनी भंगारातली गाडी घेऊन तिनं प्रचंड प्रवास केला. अनेक देश पालथे घातले. या सगळ्यात त्यांना तिथली माणसं दिसली, तिथला समाज दिसला. या सगळ्यामुळे त्यांच्यातला लेखक जन्माला आला. शिकागो ट्रिब्युनमध्ये त्यांनी कथा लिहिल्या. अशाच भटकंतीच्या अनुभवावर त्यांनी 1949 मध्ये पहिलं पुस्तक लिहिलं.

त्यानंतर त्यांना अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी फुलब—ाईट स्कॉलरशिप मिळाली. वयाच्या एकविसाव्या वर्षी ते प्रेमात पडले आणि लग्नाच्या बेडीतही अडकले. त्यानंतर त्यांनी हनिमूनसाठी केलेली भटकंतीही प्रचंड गाजली. खिशात मोजके डॉलर घेऊन बाहेर पडलेल्या या जोडप्यानं बरेच उद्योग केले. त्यांचा हनिमून विविध देशांमध्ये जवळपास वर्षभर चालला. त्यांनी जपान, हाँगकाँग, थायलंड, भारत, पाकिस्तान, इराण, तुर्की आणि लेबनॉनमध्ये भटकंती केली. जेव्हा ते फ्रान्सला परतले तेव्हा त्यांचं दुसरं पुस्तक लिहिलं, 'हनिमून अराऊंड द अर्थ.'

एकीकडे लेखक म्हणून नावारूपाला येत असतानाच त्यांना आता माणसांची वेदना दिसू लागली होती. याच दरम्यान त्यांची भेट अमेरिकन पत्रकार लॅरी कॉलिन्स यांच्याशी झाली. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी फ्रान्समधल्या वेगवेगळ्या लोकांशी बोलून या दोघांनी एक पुस्तक लिहिलं. त्याचं नाव होतं, 'इज पॅरिस बर्निंग.' अत्यंत प्रभावी मांडणी असलेलं हे पुस्तक प्रचंड गाजलं. पत्रकारिता आणि लेखनकौशल्य यांचा अद्भुत मिलाफ असलेल्या या पुस्तकाच्या तीस भाषांमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत.

संपूर्ण जग फिरलेल्या या भटक्या लेखकाचं पहिलं प्रेम हे भारत होतं. त्यांनी ते वारंवार बोलूनही दाखवलं होतं. कोलकाता आणि भोपाळमध्ये ते दीर्घकाळ राहिले. कोलकाता हे तर त्यांचं दुसरं घरच होतं. इंग्रजांची पहिली राजधानी असलेल्या या शहरानं इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राचे विविध संदर्भ पाहिले. पूर्व किनारपट्टीवर उतरलेल्या इस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांनी भारतात आणलेल्या भांडवलवादाला उत्तर देण्यासाठी या शहरानं जो डावा समाजवाद मांडला, त्याच्या खाणाखुणा या शहरात जागोजागी दिसतात. त्या टिपण्यासाठी डॉमनिक तिथल्या घरांमध्ये राहिले, गल्ल्या-गल्ल्यांमध्ये फिरले. एवढंच काय, तर त्यांनी बंगाली भाषा शिकून घेतली.
एका मुलाखतीत ते म्हणतात की, भारतात जे काही घडतं ते कोणत्याही कथालेखकाच्या मनातही कधी येणार नाही. त्यामुळे गोष्ट लिहायची असेल, तर भारतासारखी दुसरी जागा नाही. भारताच्या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये हजारो कथा आहेत. कोलकात्यामधला रिक्षावाला मला त्याचं प्रतीक वाटला. आयुष्याचं गाडं ओढण्यासाठी तो रिक्षा ओढतोय; पण त्याच्या आसपास खूप काही घडतंय. एवढा त्रास, एवढी अगतिकता, एवढ्या अडचणी असूनही त्याच्या डोळ्यात करुणा आहे, आनंद आहे, समाधान आहे. मला हे खूप सकारात्मक वाटतं. 'सिटी ऑफ जॉय'मध्ये मी हेच टिपण्याचा प्रयत्न केलाय.

त्यांचं 'सिटी ऑफ जॉय' हे कोलकात्यावर लिहिलेलं पुस्तकही प्रचंड लोकप्रिय ठरलं. त्याचीही विविध भाषांमध्ये भाषांतरं झाली; पण त्यांच्यावर तेव्हाही आरोप झाला की, ते भारतातली गरिबी विकून जगाला दाखवताहेत; पण या आरोपाला उत्तर देताना डॉमनिक म्हणतात की, मी बिलकुल गरिबीचं उदात्तीकरण केलेलं नाही. मला उलट ते सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं वाटलं. तो द़ृष्टिकोन आम्हा पाश्चात्त्यांसाठी नवा आहे. हे जगण्याला बळ देणारं आहे. आता यातही कोणाला काही वाटतं असेल, तर ते मला टाळता येणार नाही; पण मी यातून खूप काही शिकलो आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या घटनांवर आधारित त्यांनी लिहिलेलं 'फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट' हे त्यांचं चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही अर्थानं गाजलेलं पुस्तक. हे पुस्तक भारतात आणीबाणी लागली, त्याच वर्षी म्हणजे 1975 मध्ये प्रसिद्ध झालं. या पुस्तकाबद्दल त्यांना एकीकडे प्रचंड कौतुक आणि दुसरीकडे टीका, असं दोन्ही अनुभवायला मिळालं. तरीही हे पुस्तक आजही देशाचा स्वातंत्र्याचा घटनाक्रम सांगणारं महत्त्वाचं पुस्तक म्हणून ओळखलं जातं. त्याचं मराठीसह अनेक भाषांमध्ये झालेली भाषांतरंही तुफान विकली गेली आहेत.

स्वातंत्र्याच्या शेवटच्या टप्प्यावर जे घडलं, त्याची गांधीजींच्या हत्येपर्यंतची कहाणी हे पुस्तक सांगतं. इतिहास हा असा रोमहर्षक, चित्तथरारक आणि रंजक असू शकतो, हे यातून उलगडत जातं. खरं तर डॉमनिक हे काही इतिहास लेखक नव्हते. त्यांचा तसा दावाही नव्हता. ते इतिहासाचे संदर्भ जोडून कथा सांगणारे कथालेखक होते; पण सनावळी आणि संदर्भांच्या तावडीतून वाचकांना सोडवत नेमकं काय घडलं, याचा अनुभव देण्याची ताकद त्यांच्या कथाकथनात नक्कीच आहे. त्यामुळेच त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आजही महत्त्वाचं मानलं जातं.

महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल या नेत्यांच्या राजकारणाबद्दल किंवा सावरकरांवर केलेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या विधानांमुळे त्यावेळीही ते प्रचंड वादात सापडले होते. 21 फेब—ुवारी 1976 च्या 'माणूस'च्या अंकातही या पुस्तकावर टीका करणारा लेख प्रसिद्ध झाला होता. असे कितीही वाद झाले, तरी या पुस्तकाचा खप काही कमी झाला नाही. पुढे वाद शमले आणि पुस्तक मात्र लोकांपर्यंत विविध भाषांमधूनही पोहोचलं. भारतीय स्वातंत्र्याचा लढा कसा अंतिम ध्येयापर्यंत पोहोचला; या स्वातंत्र्याचा मुहूर्त कसा ठरला, त्यासाठी काय हालचाली झाल्या, काय उलथापालथी झाल्या, फाळणीच्या वेळी नक्की काय झालं, याची पत्रकारितेच्या द़ृष्टीने केलेली मांडणी विलक्षण वाचनीय ठरली.

'फाईव्ह पास्ट मिडनाईट इन भोपाळ' हे त्यांचं भोपाळ दुर्घटनेवरचं पुस्तक. त्याबद्दल ते सांगतात की, कोलकात्यात भेटलेल्या एका माणसानं मला भोपाळ गॅस दुर्घटनेची गोष्ट सांगितली. 45 वर्षे भारत फिरल्यानंतर मी भोपाळमध्ये गेलो. तिथं जे काही मी पाहिलं ते पाहून मला काही सुचेनासं झालं. 2 डिसेंबर 1984 ला झालेल्या युनियन कार्बाईड कंपनीच्या कारखान्यातल्या स्फोटानं तिथल्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. हजारो लोक मृत्युमुखी पडले, शेकडो अपंग झाले. डॉमनिक म्हणतात, हे सारं पाहिल्यावर मी आणि माझा सहकारी जाव्हिएर मोरो आम्ही प्रचंड फिरलो. तिथल्या लोकांसोबत राहिलो. त्यांच्यासोबत जेवलो. त्या आजारी लोकांमध्ये वावरताना अनेकदा माझ्या अंगावर झुरळं वावरताना मी अनुभवलंय. ते सारं भयानक होतं; पण जे काही घडलं होतं, त्याची चिकित्सा मानवतेच्या द़ृष्टीने व्हायला हवी. तरीही राजकारण घडलं, कोर्टकचेर्‍या घडल्या, सामाजिक बंध उसवले. आम्ही अक्षरशः शेकडो लोकांशी बोललो. आम्ही प्रचंड साहित्य जमवलं. मी नोंदी काढण्यासाठी जवळपास तीनशे-साडेतीनशे पेन वापरले आहेत. या एका घटनेवर मी जवळपास तीन पुस्तकं लिहू शकलो असतो.

नफ्याच्या गणितात अडकलेल्या बाजारू व्यवस्थेला गरिबांचं भान नसतं. ते विकासाच्या रंजक परिकथा दाखवतात; पण वास्तवात एक चूक किती महागात पडू शकते याचं युनियन कार्बाईड हे ज्वलंत उदाहरण आहे. असं सांगताना डॉमनिक आपल्याला स्पष्टपणे धोक्याचा इशारा देतात. ते म्हणतात की, भोपाळ जगात कुठेही घडू शकतं याचं भान आपल्यातल्या प्रत्येकानं ठेवायला हवं. माणसं स्वतःच्या ज्ञानाबद्दल एवढी अहंकारी असतात की, स्वतःचं ज्ञान तपासून पाहणं त्यांना कमीपणाचं वाटतं. मला हा माणूसकीपुढचा सर्वात मोठा धोका वाटतो.

डॉमनिक कधीही हस्तिदंती मनोर्‍यातल्या लेखकांसारखे राहिले नाहीत. ते स्वतः कायमच लोकांमध्ये राहिले. त्यांनी आपल्या रॉयल्टीमधला मोठा भाग भारतातल्या समाजासाठी खर्च केला. क्षयरोग आणि कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी त्यांनी फार मोठा निधी दिला. सुंदरबनातल्या बेटांवर रुग्णालयं उभारण्यात आली. भोपाळच्या पुस्तकातून मिळालेली रॉयल्टी त्यांनी भोपाळ दुर्घटनेतल्या पीडितांच्या सेवेसाठी दिली. त्यांनी दिलेल्या निधीमधून आजही 'सिटी ऑफ जॉय फाऊंडेशन' चालवण्यात येतं. एकदा ते भल्यापहाटे साडेपाच वाजता कोलकात्यात मदर तेरेसा यांना भेटायला गेले. तिथं त्यांनी आपल्याकडे असलेले 50 हजार डॉलर काढून मदरना दिले आणि त्यांना म्हणाले की, 'मदर, मला माहिती आहे की, तुमच्या सेवेपुढे हा समुद्राच्या पाण्याचा थेंबही नाही.' त्यावर मदर म्हणल्या की, 'माझ्या मुला, थेंबाथेंबानंच समुद्र तयार होतो..!' डॉमनिक यांनी ही आठवण आपल्या एका मुलाखतीत सर्वांना सांगितली आहे. मदर तेरेसा आणि त्यांच्यातलं हे नातं पुढे असंच कायम राहिलं.

याच मुलाखतीत डॉमनिक म्हणतात की, मला उमगलेलं एक गूज सांगतो. जग सातत्यानं बदलत असतं, लेखकाने बदलाच्या नोंदी ठेवाव्यात; पण त्या बदलामधल्या चांगुलपणासाठी साधनही व्हावं. लेखकांना कायमच हेमिंग्वे व्हायचं असतं; पण त्याने कधी तरी मदर तेरेसाही व्हावं. म्हणूनच माझी रॉयल्टी मी फक्त माझी कधीच मानली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news