संशोधन : मेंदूत चीप?

संशोधन : मेंदूत चीप?
हेमचंद्र फडके

अ‍ॅलन मस्क नेहमीच काही तरी जगावेगळं करण्याची इच्छा प्रकट करून सर्वांचं लक्ष वेधून घेत आले आहेत. सध्या ते मानवी मेंदूत इलेक्ट्रॉनिक चीप बसवण्याच्या भन्नाट प्रयोगामुळं जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. कोणत्याही समाजात लोकसमूहाच्या विचारशक्ती आणि वर्तणुकीच्या नियंत्रणाचे केंद्रीकरण झाले; तर त्यातून अनर्थ घडण्याची शक्यता अधिक असते. त्यातही असे केंद्रीकरण जर कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झाले; तर जगासाठी ते धोकादायक असेल.

विज्ञान-तंत्रज्ञानाचा प्रसार होेऊ लागला तसतसे त्यातून मानवी जीवन व्यवहारातील अनेक गोष्टी सुखकर, सुकर होत गेल्या. आरोग्य विज्ञान, जैव विज्ञान, दळणवळण, संपर्क सेवा, अर्थ प्रणाली, शिक्षण, कृषी व्यवस्था या सर्वांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानानं दिलेलं योगदान अनन्यसाधारण आहे आणि त्याची फळं यथावकाश सबंध मानवसृष्टीनं चाखली आहेत. त्याचवेळी या नवतंत्रज्ञानाचा गैरवापर करून आपलं इप्सित साध्य करणार्‍यांचीही फौज उभी राहताना दिसून आली. सायबर गुन्हेगार म्हणून गणलं जाणार्‍यांची कृत्ये सरळसरळ बेकायदेशीरच असतात. परंतु, त्यापलीकडे जाऊन नकळतपणे पडद्याआडून कावेबाजपणा करणार्‍या शक्तीही असतात, आहेत आणि त्यांच्यापासून खर्‍या अर्थानं जगाला अधिक धोका आहे, यावर आता एकमत झालं आहे; मग ते सोशल मीडिया, अ‍ॅप्स आणि इंटरनेट वापरातून जमा झालेला डेटा वापरून लोकसमूहांचा कौल जाणून घेणं असो किंवा त्याचा व्यावसायिक वापर करणं असो किंवा त्या डेटाचं महावेगवान संगणकांच्या साहाय्यानं पृथक्करण करून त्यातील कल जाणून घेऊन लोकसमूहांना विशिष्ट दिशेनं वळवण्यासाठी रणनीती राबवणं, यासारखे अनेक प्रकार-गैरप्रकार तंत्रज्ञानाच्या विश्वात सुरू असतात. यामागे मोठ्या आर्थिक शक्ती, राजकीय शक्ती, बहुराष्ट्रीय कंपन्या, विकसित राष्ट्रे असल्यामुळं त्यांच्याविरुद्ध कारवाई होण्याच्या शक्यता खूप कमी असतात. दुसरीकडे, तंत्रज्ञानाचा वापर टाळणं अशक्यप्राय झालेलं असल्यामुळं बहिष्काराचं अस्त्र वापरून या शक्तींना पराभूत करणंही शक्य नसतं. त्यामुळं राजरोसपणानं हे सारं काही सुरू असतं आणि समूहांची मानसिकता नियंत्रित करून आपल्याला हव्या त्या दिशेनं वळवण्यात या शक्ती यशस्वीही होत असतात. यापलीकडं जाऊन हॉलीवूड चित्रपटांमध्ये दाखवतात तसं सबंध मानवजातीवर अधिराज्य गाजवण्याची, त्यांना नियंत्रित करून आपल्या इशार्‍यांनुसार नाचायला भाग पाडण्याच्या अघोरी महत्त्वाकांक्षेलाही तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळं धुमारे फुटलेले दिसताहेत. अर्थात, जगज्जेता बनणं, अमर बनणं किंवा सर्वशक्तिमान बनणं या ध्येयानं पछाडलेल्यांची शेकडो उदाहरणं आपण पौराणिक कथांमधूनही वाचत आलो आहोत. त्यामुळं ही मानसिकता प्राचीन काळापासून मानवसमूहातील काही घटकांमध्ये असते, हे वास्तव आहे. त्यामध्ये आजवर कुणालाही यश आलेलं नाही, हाही इतिहास आहे; पण आधुनिक काळात यामध्ये फरक फक्त इतकाच झालाय की, त्याला आता तंत्रज्ञानासारख्या विश्वाला कवेत घेणार्‍या साधनाची साथ लाभली आहे. त्यामुळंच आजवर हे असाध्य राहिलेलं स्वप्न पूर्ण होईल की काय, अशी शक्यतावजा भीती आता व्यक्त होऊ लागलीय.

हा सर्व ऊहापोह करण्याचं कारण म्हणजे मानवी मेंदूमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप बसवून त्याच्यावर नियंत्रण आणण्याच्या एका प्रयोगाला लवकरच अमेरिकन सरकार मान्यता देण्याच्या तयारीत आहे. जगप्रसिद्ध अब्जाधीश, टेस्ला कार अ‍ॅलन मस्क या भन्नाट संकल्पनेचा उद्गाता ठरले आहेत. त्यांच्या न्यूरालिंक ब्रेन या कंपनीतर्फे माणसाच्या मेंदूमध्ये इलेक्ट्रॉनिक चीप बसवण्याचा प्रयोग येत्या सहा महिन्यांमध्ये सुरू केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, अमेरिकन सरकारही त्यांच्या सैनिकांच्या मेंदूमध्ये ही चीप बसवून त्यांच्यावर नियंत्रण राखण्याची आणि त्यांचे शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी संशोधन करत आहे. 'रिपेअर' नामक हा प्रकल्प अमेरिकेच्या डिफेन्स अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीने (डीएआरपीए) सुरू केला आहे. वास्तविक, अमेरिकन सैनिक हे जगातील सर्वात बलशाली आणि निष्णात मानले जातात. परंतु, अफगाणिस्तान आणि इराणमध्ये युद्ध केल्यानंतर जेव्हा हे सैनिक मायदेशी परतले तेव्हा त्यातील अनेकांना नैराश्यानं ग्रासल्याचं दिसून आलं. यातील काहींनी आत्महत्याही केली. युद्धग्रस्त वातावरणात आणि शांततेच्या काळात मानवी मेंदू वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करतो. त्यामुळं इलेक्ट्रॉनिक चीप बसवून त्यांच्या भावनांवर नियंत्रण मिळवता येईल का, याद़ृष्टीनं 'रिपेअर'च्या माध्यमातून संशोधन करण्यात येत आहे. व्हर्जिनियामध्ये अत्यंत गोपनीयरीत्या सुरू असलेल्या या संशोधन प्रकल्पामध्ये 200 हून अधिक संशोधक आणि दोन हजारांहून अधिक कर्मचारी सक्रिय असल्याची माहिती पुढं आली आहे. अ‍ॅलन मस्क यांच्या प्रकल्पाचा विचार करता, 2016 मध्ये त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील बे एरियामध्ये न्यूरालिंक स्टार्टअपची सुरुवात केली. 2020 मध्ये डुकरांच्या मेंदूमध्ये 23 मिलिमीटरची चीप बसवण्यात आली आणि वायरलेस तंत्रज्ञानानं ती संगणकाशी जोडण्यात आली. यामध्ये 1,024 इलेक्ट्रोड होते. 2021 मध्ये 23 माकडांच्या मेंदूमध्ये ही चीप बसवण्यात आली. गंमत म्हणजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने चालणारी ही मायक्रोचीप बसवल्यानंतर माकडे चक्क व्हिडीओ गेम खेळताना दिसली. पुढे जाऊन माकडांनी संगणकीय कीबोर्डवर टायपिंगही केलं. 2022 मध्ये 'एफडीए'ने मानवी परीक्षणासाठी न्यूरालिंकला परवानगी दिली. यामध्ये 16 हजार इलेेक्ट्रोडस् बसवण्यात येणार असून, पुढील सहा महिन्यांत याची चाचणी सुरू होऊन परिणाम समोर आलेले असतील. अ‍ॅलन मस्क यांनी या प्रयोगाच्या मुळाशी विविध दुर्धर आजारांनी ग्रस्त असणार्‍या माणसांना दिलासा देण्याचा हेतू असल्याचं सांगितलं आहे. या चीपच्या माध्यमातून मानवी मेंदू थेट संगणकाशी जोडला जाऊ शकतो. मेंदूतील हालचालींची नोंद करता येऊ शकतात, यामुळे मानवी मेंदूशी निगडित आजारांवर उपचार करता येऊ शकतात. स्पायनल कॉर्डच्या दुखापती, डिमेंशिया, अल्झायमर या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या चीपची मदत होऊ शकते. याखेरीज अंधत्व आलेल्या व्यक्तींना जग पाहण्याची संधी या चीपमुळे मिळू शकते. छोट्या नाण्याच्या आकाराची ही कॉम्प्युटर चीप बसवलेल्या सजीवाच्या हालचाली तसेच त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवले जाते आणि त्यांच्या सर्व हालचालींचे बारकाईने निरीक्षण करून नोंद ठेवली जाते. मानवी मेंदूत चीप बसवण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास पक्षाघातामुळे थांबलेल्या हालचाली पूर्ववत करणे शक्य होऊ शकेल. तसेच कोणत्याही कारणाने मेंदूला झालेली जखम बरी करणे शक्य होईल. इतकेच नव्हे, तर निरोगी मेंदूची कार्यक्षमताही वाढवता येऊ शकेल, असा या कंपनीचा दावा आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला जर लकव्याचा त्रास होत असेल; तर अशी व्यक्ती आपल्या मेंदूचा वापर करून हातापेक्षा जास्त वेगाने स्मार्टफोन वापरू शकेल, असे मस्क यांचे म्हणणे आहे. कारण, ज्या व्यक्तीच्या मेंदूत ही चीप टाकली जाईल, तो काहीही न बोलता चीपद्वारे उपकरणांना आदेश दिले जातील. सध्या याद्वारे यूजर्स स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरसारखे बेसिक डिव्हाईस नियंत्रित केले जाताहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अ‍ॅलन मस्क यांनी आपण स्वतः अशी चीप बसवून (इम्प्लांट) घेणार असल्याचं सांगितलं आहे.

इतके सारे फायदे असताना; मग या प्रकल्पाला विरोध असण्याचं कारण काय, असा प्रश्न पडू शकतो. परंतु, वरील सर्व तथाकथित फायदे हे शक्यतांच्या खेळावर असून, ती नाण्याची एक बाजू आहे; मग दुसरी बाजू काय आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अशाप्रकारची चीप बसवणं हे कोणा सामान्य डॉक्टरांचं काम नाही. मेंदूला छेद दिल्यानंतर त्यातून रक्तस्राव होऊ लागल्यास तो थांबवणं महाकठीण असतं. 2021 मध्ये जेव्हा माकडांवर हा प्रयोग करण्यात आला तेव्हा 23 पैकी 15 माकडांचा ब—ेन हॅमरेजने मृत्यू झाला होता. त्यामुळं आरोग्यशास्त्राच्या द़ृष्टीनं हे एक मोठं आव्हान असेल, यात शंकाच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, ब्लूटूथच्या साहाय्याने ही चीप संगणकाशी जोडली जाणार असल्यामुळं हॅकिंगचा धोका यामध्ये कमालीचा असेल. यापलीकडचा सर्वात मोठा धोका म्हणजे, सुरुवातीला म्हटल्यानुसार मानवी समूहावर नियंत्रण!

विचार करा, जर अशाप्रकारची चीप बसवणारे लाखो लोक समाजात वावरू लागले, तर कोणीही एक व्यक्ती अथवा शक्ती त्यांच्या मेंदूला आपल्या मर्जीप्रमाणं आदेश-सूचना देऊन हवं तसं वागण्यास भाग पाडू शकते. कारण, शरीराच्या हालचाली नियंत्रित करणार्‍या मेंदूच्या भागाचे कार्य ही चीप करते. मेंदूच्या या भागाला सेरिबेलम म्हणतात. सेरिबेलम हे कोणतीही क्रिया घडल्यानंतर तत्काळ मोटर न्यूरॉनला त्यावर प्रतिक्रियासंदर्भातील सूचना देतात. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीच्या पायात काटा टोचला तर एका क्षणाहूनही अत्यंत कमी वेळात मेंदूला संदेश जातो आणि सेरिबेलम मोटर न्यूरॉनला पाय तेथून दूर करण्याचे आदेश देतात. हे आदेश जर एखाद्या संगणकावरून दिले जाऊ लागले; तर त्यातून कोणतीही क्रिया पार पाडून घेतली जाऊ शकते. कोणत्याही समाजात लोकसमूहाच्या विचारशक्ती आणि वर्तणुकीच्या नियंत्रणाचे केंद्रीकरण झाले; तर त्यातून अनर्थ घडण्याची शक्यता अधिक आहे. त्यातही असे केंद्रीकरण जर कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून झाले; तर जगासाठी ते धोकादायक असेल. महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांनीही कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत असाच धोक्याचा इशारा दिला होता. त्यामुळंच आज जगभरात या तंत्रज्ञानाचा वापर करताना आस्ते कदम रणनीती अवलंबली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news