‘विषारी पाण्याचा’ विळखा

‘विषारी पाण्याचा’ विळखा

देशातील 80 टक्के नागरिकांना विषारी धातूयुक्त पाणी प्यावे लागत असल्याची माहिती केंद्र सरकारच्या एका अहवालातून पुढे आली आहे. यानिमित्ताने पाणी प्रदूषणाची कारणे, पाण्यातील विविध विषारी घटकांमुळे होणारे आजार आणि पाणी निर्जंतुकीकरणासाठीच्या उपाययोजना याची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. कारण, पाण्याच्या गुणवत्तेबाबत देशात कमालीचे अज्ञान आहे.

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने राज्यसभेमध्ये अलीकडेच सादर केलेल्या एका अहवालानुसार, देशातील 80 टक्के नागरिकांना विषारी धातूयुक्त पाणी प्यावे लागते असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालात देशातील विषारी धातूयुक्त पाण्याने ग्रासलेल्या जिल्ह्यांची व प्रदेशांची समग्र माहिती देण्यात आली असून, त्यात 25 राज्यांतील 209 जिल्ह्यांमध्ये कर्करोगाला आमंत्रण देणार्‍या अर्सेनिक या धातूचे पाण्यातील प्रमाण प्रती लिटर 0.01 मिलीग्रॅमच्या वर गेले असल्याचे म्हटले आहे. याखेरीज देशात 18 राज्यांतील 152 जिल्ह्यांमधील काही भागांत युरेनियम या धातूचे पाण्यातील प्रमाण प्रती लिटर .03 मिलीग्रॅम आढळून आले आहे. वाढते जलप्रदूषण हा विषय नवा नाही; परंतु आजही आपल्याकडील बहुसंख्य जनता दूषित पाण्यामुळे होणार्‍या आजारांविषयी अनभिज्ञ असल्याचे दिसते. पाण्याची गुणवत्ता म्हणजे नेमके काय, याबाबत विस्तृत प्रबोधन करण्याची आज नितांत गरज आहे.

भारतात मुख्यत्वेकरून फ्लोराईड, नायट्रेट, आर्सेनिक, शिसे व लोह या रासायनिक पदार्थांच्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता बाधित झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने फ्लोरोसिस या रोगासाठी त्यांचा पहिला लेखसंग्रह सन 1959 साली प्रसिद्ध केला; पण आपल्याला या रोगाची माहिती होण्यास 1985 साल उजाडावे लागले. फ्लोरोसिसची माहिती सर्वप्रथम चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा तहसीलमधून आली. दातांचा फ्लोरोसिस व हाडांचा फ्लोरोसिस येथूनच समजण्यात आला. तत्पूर्वी दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यात गुरेढोरे यांच्या कळपात हा रोग तेथील शेतकर्‍यांना लक्षात आला व त्यानंतर तो मानवात दिसून आला.

केंद्रीय भूजल प्राधिकरण (1999, 2002) च्या अन्वये सद्य:स्थितीत जम्मू काश्मीर, राजस्थान, बिहार, हिमाचल प्रदेश, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि पंजाब या भारतातील 15 राज्यांतील 200 जिल्ह्यांमधील 9 कोटी लोक फ्लोरोसिसच्या समस्येने ग्रस्त आहेत आणि त्यामध्ये 60 लाख मुलांचा समावेश आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरण, जलसंसाधन मंत्रालय, भारत सरकार या संस्थेने पाण्यात आढळणार्‍या भौतिक, रासायनिक घटकांमुळे अथवा सूक्ष्म जीवाणूंमुळे होणार्‍या रोगांबाबत पत्रके तयार केलेली आहेत. त्यानुसार शरीरातील अवयवांवर होणारे दुष्परिणाम खालीलप्रमाणे आहेत.

सेलेनियम : केसांचे गळणे, दात क्षीण होणे. थॅलियम : केसांचे गळणे. मँगेनिज : मानसिक व मज्जातंतूंचे विकार. शिसे : मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासाला बाधा. पारा, सायनाईड व आर्सेनिक : मज्जातंतूंचे विकार. मिथाईल पारा : केंद्रीय मज्जातंतूंचे विकार. अ‍ॅल्युमिनियम : अल्झायमर रोग.
आर्सेनिक : नाकपुड्यांचा कर्करोग, त्वचाविकार.
निकेल : श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास. फ्लोराईड ः दातांवर डाग व खड्डे पडणे, हाडांना बाक येणे, त्वचारोग. जीवाणू/विषाणू/कृमी/किटाणू : टायफॉईड, अतिसार, कॉलरा, कावीळ, पोलियो, हागवण, खरुज, मलेरिया, फायलेरिया आदी रोग.
नायट्रेट : रक्ताभिसरणाचे रोग.

विज्ञानाच्या भाषेत पाण्याची गुणवत्ता ही भौतिक, रासायनिक आणि जैविक या तीन प्रकारांत मोडते. रंग, गंध, चव आणि तापमान हे घटक भौतिक गुणवत्ता दर्शवतात. थंड व गोड पाणी प्यायल्याने समाधान मिळते; परंतु खारट पाणी, दर्पयुक्त पाणी चित्त विचलित करते. रंगहीन पाणी शुद्धतेचे व प्रसन्नतेचे द्योतक आहे. रासायनिक गुणवत्ता धन आणि ऋणभार आधारित अणू-रेणू अथवा रासायनिक पदार्थांमुळे स्थापित होत असते. जैविक गुणवत्ता पाण्यातील विषाणू व इतर जीवजंतूंसाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूच्या मात्रेशी संबंधित असते. उपरोक्त तीनही गुणवत्ता प्रकारात भौतिक, रासायनिक व जैविक घटकांचे अपेक्षित योग्य प्रमाण व जास्तीत जास्त मर्यादा यांचे परिणाम वेगवेगळ्या संशोधन संस्थांनी घालून दिलेले आहे.

सर्वेक्षणातून असे लक्षात येते की, पिण्याच्या पाण्यातून जास्तीत जास्त मात्रेतील आर्सेनिक शरीरात जाते आणि त्यापासून जुनाट त्वचारोग होतात. आर्सेनिक हा अत्यंत विषारी पदार्थ असून, तो पार्‍याहून चौपट हानिकारक आहे. काही परिस्थितीत ते जीवनघातक झाल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. भूजलामध्ये याचे प्रमाण 10 पीपीबीपेक्षा अधिक झाल्यास, अशा पाण्याच्या नियमित सेवनाने कर्करोगासारख्या दुर्धर व्याधी जडण्याची शक्यता असते. जलशक्ती मंत्रालयाच्या अहवालातूनही ही बाब ठळकपणाने पुढे आली आहे. 2007 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, जगातील 70 देशांतील 93.7 कोटी लोक आर्सेनिकोसिसमुळे बाधित झालेले आहेत. भारतातील एकट्या पश्चिम बंगालमध्ये ही संख्या 5 कोटींहून अधिक आहे. या आजारात मूत्रपिंड, यकृत, प्रोस्टेट ग्रंथी बाधित होणे; त्वचा रंगहीन होणे, तीव्र पोटदुखी, उलटी, जुलाब, लकवा यांचा सामना करावा लागू शकतो.

पावसाचे पाणी जमिनीवर वाहू लागले की, काही प्रमाणात पाणी जमिनीत मुरते. जमिनीवरून वाहत जाणारे पाणी गुणवत्ताबाधित करणार्‍या वस्तूंच्या संपर्कात आले की, ते प्रदूषित होते. पाणी जमिनीत मुरताना भूस्तरावरील विविध क्षार त्यामध्ये विरघळतात अथवा न विरघळणारे घटक पाण्यात मिसळतात.

भूपृष्ठावरील पाण्याच्या प्रदूषणाची कारणे –

नदी, ओढे, नाले, तलाव यांमध्ये घरगुती सांडपाणी मिसळणे.
कारखान्यातून सोडले जाणारे सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता शुद्ध पाण्याच्या स्रोतात मिसळणे.
पिकांसाठी फवारलेली कीटकनाशके अथवा जमिनीतून उत्पादकता वाढवण्यासाठी घातलेली खते पाझर स्रोतापर्यंत पोहोचणे. ग्रामीण भागातील पाणी प्रदूषित होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे.

याखेरीज नदी, नाले, ओढे किंवा तलाव यांमध्ये कपडे, जनावरे अथवा वाहने धुणे हेही एक पाणी प्रदूषणाचे कारण आहे. जलस्रोतांमध्ये मानवाची अथवा पशुंची मृत शरीरे टाकल्यामुळेही देशातील गंगा, गोदावरी, शरयू, यमुना यांसारख्या अनेक नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. खाणींमधील जमा झालेले पाणी उपसून खाणींच्याच परिसरात सोडले जाते. तसेच रस्ते बांधताना किंवा डांबरीकरण करताना आजूबाजूचे जलस्रोत प्रदूषित होऊ शकतात.

भूगर्भातील पाणी प्रदूषित होण्याची कारणे –

महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या क्षेत्रामध्ये सांडपाण्याची व्यवस्था कोलमडली तर हे पाणी जमिनीत झिरपू लागते आणि भूजल बाधित होते. कारखान्यांमधून द्रव स्वरूपातील घाण झिरपून भूजलाचे प्रदूषण होते. अशी अनेक कारणे आहेत.

स्वच्छ दिसणार्‍या पाण्यात न दिसणारे रोगजनक जंतू असू शकतात. जीव, जंतू आणि विषाणूंमुळे पाणी दूषित होऊ शकते आणि हेच दूषित पाणी प्यायल्याने वेगवेगळ्या प्रकारचे रोग उद्भवू शकतात. म्हणून पाणी हे शुद्ध असणे आवश्यक आहे. यासाठी पाण्याचे नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे अत्यावश्यक आहे. शहरात घरोघरी विविध कंपन्यांचे गाळणयंत्र (फिल्टर्स) बसवलेले आढळतात किंवा शुद्धीकरण सयंत्रांतून शुद्ध झालेले पाणी नळ योजनेद्वारे घरात उपलब्ध होते. ग्रामीण भागात गाळणयंत्र बसवून शुद्ध पाणी मिळणे थोडे दुरापास्त आहे. क्लोरिनीकरण करणे हा निर्जंतुकीकरण करण्यासाठीचा सोपा उपाय आहे.

ब्लिचिंग पावरडच्या स्वरूपात क्लोरिनीकरण करण्याने जीव, जंतू व विषाणू नष्ट होतात आणि शुद्ध पाणी सहजप्राप्त होते. चुन्यामध्ये यंत्राद्वारे क्लोरीन वायू मिसळून ब्लिचिंग पावडर तयार होते. त्याला टी.सी.एल. पावडर या नावानेही संबोधले जाते. ताज्या ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरीनचे प्रमाण 33 टक्क्यांपेक्षा जास्त असावे. पाच ग्रॅम ब्लिचिंग पावडरचे द्रावण 1000 लिटर पाण्याचे निर्जंतुकीकरण योग्य प्रकारे पूर्ण करू शकते. क्लोरीन निघून गेलेली ब्लिचिंग पावडर निर्जंतुकीकरणासाठी वापरल्यास अपेक्षित शुद्धीकरण होत नाही.

यासाठी ब्लिचिंग पावडर कोरड्या जागी, बंद डब्यात वा पिशवीत ठेवणे गरजेचे आहे. नीट काळजी घेतली नाही, तर कालांतराने त्यातील क्लोरीन वायू हवेत जातो आणि पावडरची निर्जंतुकीकरणाची शक्ती कमजोर होते. पाण्यातील शिल्लक क्लोरीन प्रदूषणापासून संरक्षण करतो. म्हणजेच पाण्यात क्लोरीन शिल्लक असेल, तर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण झाली असे मानता येईल. आथोटोलिडीन चाचणी किंवा ओटी टेस्टद्वारे पाण्यात क्लोरीन किती शिल्लक आहे, हे मोजता येते. ओटी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास, विहिरीचे पाणी अथवा हातपंपांचे पाणी शुद्धीकरणास अशा ब्लिचिंग पावडरचा अपेक्षित फायदा होतो.

नालगोंडा तंत्र नावाची विकसित पद्धत पिण्याच्या पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण कमी करते. असे पाणी पिण्यास युक्त असून, या तंत्राद्वारे पाणी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत अगदी नगण्य खर्च येतो. चुन्याची निवळी आणि तुरटी यांचे योग्य प्रमाणातील मिश्रण पाण्यात घालून ठेवल्याने, त्यात रासायनिक प्रक्रिया होऊन पाणी पिण्यायोग्य होते. फ्लोरोसिसबाधित गावांमध्ये खैर, पिंपळ, निंब, बोनचार, फ्लोरेक्स किंवा सिंथेटिक ट्रायकॅल्शियम फॉस्फेटसारखे रासायनिक पदार्थ वापरून पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. पावसाळ्यात भूपृष्ठावरील आणि भूजलसाठे प्रदूषित होण्याची शक्यता जास्त असते. याच प्रदूषित पाण्यातून साथीच्या रोगांची लागण होते म्हणून अशा दिवसांत निर्जंतुकीकरणासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घरामध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा झाल्यानंतरही त्याची योग्य प्रकारे साठवण आणि हाताळणी करणे गरजेचे आहे. त्यात कसूर झाल्यास पाण्याची गुणवत्ता बाधित होते. म्हणूनच पाणी साठवणुकीची भांडी दररोज स्वच्छ करावीत. ती झाकलेली असावीत.

डॉ. योगेश मुरकुटे
जलतज्ज्ञ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news