भारतीय शिक्षण : संख्या वाढली, गुणवत्तेचे काय?

भारतीय शिक्षण : संख्या वाढली, गुणवत्तेचे काय?
Published on
Updated on

भारतीय शिक्षण क्षेत्रापुढे सर्वात मोठे आव्हान आहे ते गुणवत्तेचे. आपल्या शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे. देशात महाविद्यालये, विद्यापीठे आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे; पण या संख्येचे गुणात्मक वाढीत रूपांतर कऱण्याची गरज आहे.

एकविसावे शतक हे ज्ञानयुग म्हणून ओळखले जाते. ही माहितीची तिसरी लाट आहे. कृषी क्रांती आणि औद्योगिक क्रांती यांच्यापेक्षाही माहिती युगाने मानवी जीवनाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकला आहे. या वर्तमान संदर्भात बदलती शिक्षण पद्धती आणि शिक्षणापुढील आव्हाने यांचा विचार करणे अगत्याचे ठरते. गुरुकुलापासून ते ई-गुरुकुलापर्यंत शिक्षणाचा प्रवास झाला आहे. शिक्षण मोठ्या झपाट्याने आणि गतीने बदलत आहे. ज्ञान हीच सत्ता आहे, संपत्ती आहे, धनसत्ता, बलसत्ता यापेक्षा ज्ञानसत्तेला महत्त्व प्राप्त झाले आहे असे मत बिल गेट यांनी त्यांच्या 'द रोड अहेड' या ग्रंथात व्यक्‍त केले आहे.

या पार्श्‍वभूमीवर या ज्ञानयुगात भारतातील बदलती शिक्षणपद्धती आणि भारतीय शिक्षकांचा विचार करणे समयोचित ठरेल. एका बाजूला शिक्षणाचे भारतीयीकरण करण्याची गरज आहे. दुसर्‍या बाजूला शिक्षण वर्तमानकाळाशी सुसंगत होईल आणि शिक्षकांची भूमिका प्रगत आणि अद्ययावत असेल यावरही भर दिला पाहिजे.

ई लर्निंग किंवा ऑनलाईन लर्निंग ही नव्या शिक्षणाची वैशिष्ट्य आहेत. पीटर ड्रकर यांनी त्यांच्या 'फ्युचर चेंज इन मॅनेजमेंट' या ग्रंथात असे म्हटले आहे की, एकविसाव्या शतकाच्या शेवटी जगात विद्यापीठे असणार नाहीत. प्रत्येक जण संगणकाच्या पडद्यावर शिकेल. शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची नोंदणी संगणकाच्या पडद्यावर होईल. अभ्यासक्रमही संगणकाच्या पडद्यावर शिकवले जातील, निकालही शिक्षणाच्या पडद्यावर लावले जातील. माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या हाती निकाल येतील.

या पार्श्‍वभूमीवर आपल्या लक्षात येते की भारतीय शिक्षणसुद्धा या वेगाने हळूहळू बदलत आहे. ऑनलाईन दूरशिक्षण देणारी 32 विद्यापीठे आहेत. त्यातील एका विद्यापीठात 80 हजार विद्यार्थी शिकत असतात. जगातील शिक्षणपद्धती कुठल्या दिशेने चालली आहे हे आपणास कळते. जगाच्या कुठल्याही देशात नोकरी, सेवा, शिक्षण यासाठी मुलाखती आता ऑनलाईन देता येतात आणि विद्यार्थ्यांची निवड होऊ शकते.

या पार्श्‍वभूमीवर शिक्षणाचे महत्त्व आणि त्यातील बदल लक्षात घेतले पाहिजे. ई लर्निंगची व्याख्या करताना असे म्हटले जाते लर्निंग इलेक्ट्रॉनिकली, लर्निंग इफेक्टिव्हली, लर्निंग इझिली म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सहजपणे आणि प्रभावीपणे शिकवणे, शिकणे. ई लर्निंगची वैशिष्ट्य सांगताना असे म्हटले जाते की ज्ञानकेंद्री समाजात माहिती तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे. आजच्या समाजाचे वर्णन नॉलेज इंटेन्सिट सोसायटी असे केले जाते.

त्या ज्ञानकेंद्री समाजामध्ये प्रगत माहिती तंत्रज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संगणकीकरण, कॉम्प्युटरायझेशन आणि सायबर स्पेसचा उपयोग करून शिक्षणाचा प्रसार केला जात आहे. संकेतस्थळावरून परस्परांच्या कल्पनांचे आदान-प्रदान होत आहे. गुगलच्या फाईल्स उघडल्यानंतर आपल्याला विशिष्ट माहिती पाहिजे असेल तर रीच सर्व्हे साईटवरून एखाद्या विषयाची सखोल माहिती मिळवता येते.

जगाच्या दोन टोकावरच्या माणसांना समस्येचे निराकरण काही क्षणात करता येते. त्यामुळे ई लर्निंगचे वैशिष्ट्य सांगताना असे म्हटले की ई लर्निंग हे आंतरक्रियात्मक आणि विचारपूर्वक विकसित करण्यात आले आहे. आपल्यासमोरील समस्यांना, प्रभावीपणे उत्तर देण्यासाठी आणि शिकणार्‍या विद्यार्थ्याला शंका निरसन करण्यासाठी या सुविधेचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो.

ई लर्निंगच्या सर्व सुविधांचा उपयोग करून शिक्षकांनासुद्धा अद्ययावत आणि प्रगत द‍ृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. हावर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या ताज्या अंकात काही महत्त्वपूर्ण लेख आले आहेत. तसेच हावर्ड एज्युकेशन रिव्ह्यू यातही शिक्षणाबद्दल काही महत्त्वाचे रिव्ह्यू आले आहेत. हावर्ड शिक्षणपत्रिकेत असे म्हटले आहे की लॅपटॉपचा वापर करून वर्गात शिकवणे हे आनंददायी आहे.

तेव्हा आपल्या लॅपटॉपचा, पॉवरपॉईंटचा उपयोग करून आपला वर्ग आनंददायी करणे आणि आपल्या विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देणे ही शिक्षकांची भूमिका असणार आहे. त्यामुळे शिक्षकाची भूमिका झपाट्याने बदलली आहे. पूर्वीच्या काळी शिक्षक हा पंतोजी होता तो पुस्तके वाचून मुलांना ज्ञान देत होता आता पुस्तके वाचून ज्ञान देण्याचे दिवस संपले आहेत. स्वतः शिक्षकाला ज्ञान समजून घेता आले पाहिजे आणि आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे असलेल्या विद्यार्थ्याला त्यात सहभागी करून घेता आले पाहिजे.

विद्यार्थ्याला ज्ञानप्रक्रियेत सहभागी करून घेत असताना शिक्षकाने तो आता पढतपंडित राहिलेला नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. तो चीफ एक्झिक्युटिव्ह झाला आहे. शिक्षकाची बदलती भूमिका सांगताना असे म्हटले आहे की तो विद्यवान तर आहेच, पण त्याच्याकडे सारग्रही ज्ञान आहे. तो एक उत्तम दर्जाचा व्यवस्थापक, नायक आहे. शिक्षकाने चुंबकाप्रमाणे विद्यार्थ्यांना आकर्षित करून घेणारा आहे.

शिक्षक हा आता साधा शिक्षक राहिलेला नाही. एखाद्या कंपनीतील उद्योगाचा प्रमुख किंवा कलेक्टर याची भूमिका आणि शिक्षकाची भूमिका यात भविष्यात कोणतेही अंतर राहणार नाही. अध्यापन, अध्ययन, संशोधन आणि कार्यविस्तार चांगल्या प्रकारे करण्यासाठी शिक्षकांना योग्य आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राजीव गांधी यांनी 1987 मध्ये भारतात हावर्ड विद्यापीठाच्या धर्तीवर पन्‍नास अ‍ॅकॅडमिक स्टाफ कॉलेजेस म्हणजेच मनुष्यविकासाची केंद्रे स्थापन केली. त्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाऊ लागले. दरवर्षी चाळीस ते पन्‍नास अभ्यासक्रम करून ते या केंद्रातून शिकवले जातात. शिक्षकांना त्यांच्या कार्यकाळात तीन ते चार वेळा प्रशिक्षण दिले जाते. युनेस्कोने सुद्धा भारताने सुरू केलेल्या या शिक्षक प्रशिक्षणाच्या उपक्रमाचे कौतुक केले असून त्याचे स्वागत केले आहे.

अशा प्रकारचे शैक्षणिक प्रशिक्षणाचे कार्यक्रम आवश्यक आहे. शिक्षक भाषा विषयाचा असो किंवा सामाजिक विषयाचा असो किंवा विज्ञान-तंत्रज्ञानाचा असो संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. त्यामुळे संगणकाचे ज्ञान असेल तर जगातील कोणत्याही विद्यापीठात जाऊन शिक्षक पहिल्या क्रमांकाचा दर्जा प्राप्त करू शकतो. अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थी तार्‍यांसारखे चमकतात कारण ते विलक्षण बुद्धिमान असतात.

गेल्या पाच हजार वर्षांपासूनची ज्ञान परंपरा यामागे आहे. ही ज्ञान परंपरा अधिक प्रभावी करण्याचे काम प्रगत माहिती तंत्रज्ञानातून होणार आहे. नालंदा आणि तक्षशीला ही विद्यापीठे त्या काळी सर्वोच्च आणि सर्वोत्कृष्ट विद्यापीठे होती. 12 व्या शतकात नालंदा विद्यापीठात जगातील विद्यार्थी शिकण्यास येत असत आणि भारतालासुद्धा त्यातून साधनसंपत्ती, नावलौकिक याचा लाभ होत असे.

भारत सरकारच्या मानवसंसाधन कार्यालयाने नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुसुत्रपणे आणि प्रभावीपणे सुरू केली आहे. या नव्या धोरणानुसार शिक्षणाचे प्रगत माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षणाला अधिक प्रगत रूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यापीठे, संशोधन संस्था आणि महाविद्यालये यांना जागतिक पसंती श्रेणीनुसार अभ्यासक्रमाची निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे.

भारतीय शिक्षणापुढे सर्वात मोठे आव्हान असेल, तर गुणवत्तेचे. आपल्या शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे. जागतिक बँकेच्या 2005 पासूनच्या अहवालात दरवर्षी हा मुद्दा सातत्याने मांडण्यात आला आहे. भारताचा विकास कमी का आहे, तो दुहेरी आकड्यात का पोहोचत नाही, याचे उत्तर देताना या अहवालात असे म्हटले आहे, भारतातील दुबळे उच्च शिक्षण या मंदविकास गतीचे कारण आहे. आपल्याला शिक्षणाचा दर्जा वाढवावा लागेल आणि जागतिक पातळीवरील आपले शिक्षण अधिक दर्जेदार व प्रगत बनवावे लागेल. हे प्रभावी आव्हान आहे. थोडक्यात सांगायचे, तर भारतीय शिक्षणापुढे तीन गोष्टींचे आव्हान आहे, संख्या, समानता आणि गुणवत्ता!

भारतात महाविद्यालये, विद्यापीठे यांची संख्या वाढत आहे. शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे; पण या संख्येचे गुणात्मक वाढीत रूपांतर करण्याची गरज आहे. चीनसारख्या देशात 1200 विद्यापीठे आहेत आणि आपल्याकडे त्याच्या निम्मीच विद्यापीठे आहेत. आपणास चीनपेक्षा एक पाऊल पुढे टाकत 1600 विद्यापीठे निर्माण करावी लागणार आहेत.

प्रत्येक जिल्ह्यात एक स्वायत्त विद्यापीठ असावे लागेल आणि त्याचा दर्जा समसमान असावा लागेल. तिसरे महत्त्वाचे आव्हान गुणवत्तेचे आहे. प्रवेश घेतलेल्या संस्थेमध्ये किती चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले जाते, तेथील शिक्षकांची पात्रता, ते किती गुणवान आहेत यावरच शिक्षणाचा नावलौकिक अवलंबून असतो. शिक्षकांच्या नावाने ओळखली जाणारी विद्यापीठे जगात श्रेष्ठ ठरली आहेत. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड, हावर्ड किंवा इंग्लंडमधील ऑक्सफर्ड, केम्ब्रिजसारखी विद्यापीठे शिक्षकांमुळे ओळखली जातात.

तिथले नामांकित शिक्षक हे त्या विद्यापीठाचे प्रतीक असतात. जगामध्ये दरवर्षी शंभर विद्यापीठांची यादी प्रकाशित केली जाते. त्यात दुर्दैवाने भारतातील एकही विद्यापीठ नाही. नजीकच्या भविष्यकाळात आपणास भारतातील दहा विद्यापीठे, तरी जगातील शंभर विद्यापीठांच्या यादीत आली पाहिजेत, असा प्रयत्न केला पाहिजे. बदलत्या शिक्षण पद्धतीचे आव्हान पेलण्यासाठी शिक्षक बलवान झाले, बलशाली झाले, तरच चित्र बदलू शकेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news