टेक इन्फो : घातक सेल्फी

टेक इन्फो : घातक सेल्फी
Published on
Updated on

आजचं युग पूर्णपणे डिजिटल झालं आहे. एकविसाव्या शतकात संगणक व मोबाईल क्रांतीने जीवनपद्धतीचे सर्व संदर्भ बदलेले आहेत. प्रत्येक वस्तू, उपकरण हे 'स्मार्ट' असणं ही आज चैन नसून गरज होत चालली आहे. सध्या नव्या पिढीच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे आणि या फोनवर चांगले फोटो काढणे सोपे असल्याने स्मार्ट तरुणांना पदोपदी फोटो काढण्याचे वेड जडलेले आहे. स्मार्टफोनमध्ये असलेल्या सेल्फीच्या सोयीमुळे स्वतःचाच फोटो काढणे सोयीचे झाले आहे. हा अतिरेक काहींच्या बाबतीत व्यसनाकडे झुकू लागला आहे. संगणक व इतर उपकरणे आपले जीवन सुसह्य करण्यासाठी निर्माण केली आहेत. पण दुर्दैवाने अनेकजण त्याच्या अधीन झाले आहेत. सेल्फीचे भूत आजकाल प्रत्येकाच्याच डोक्यावर स्वार झाले आहे. स्मार्टफोन मिळताच जो तो सेल्फी काढत फिरत आहे. सेल्फीचा अतिरेक हा मूर्खपणा नक्कीच आहे. इतकेच नव्हे, तर हा मानसिक आजारपण असू शकतो.

अनेक तरुण (मुले/मुली) अगदी कपडे बदलले की, त्या बदलाची सेल्फी काढतात. क्षणोक्षणी सेल्फी काढण्याचे प्रकार नित्य आढळत आहेत. त्यांच्या हातात फोन आहे आणि सेल्फी त्यांची त्यांना काढायची आहे, त्यामुळे त्यांना ती काढण्यास कोणी अटकाव करू शकत नाही. परंतु त्यासाठीसुद्धा काही तारतम्य पाळले पाहिजे की नाही? आपला जीव धोक्यात घालून सेल्फी काढण्यात काय अर्थ आहे?
सध्या लहान मुले, अबालवृद्ध आणि समस्त युवावर्गामध्ये पर्यटनस्थळी गेल्यावर आपापल्या मोबाईलद्वारे (सेल्फी) काढण्याची क्रेझ रूढ झाली आहे.

फाजील आत्मविश्वास, अतिउत्साह, स्टंटगिरी करत अनेकजण अत्यंत धोकादायक ठिकाणी जाऊन मोबाईद्वारे सेल्फी काढतात. गड, किल्ले, उंच डोंगर, सुळके, खोल दर्‍या, धबधबे, कडेकपारी, गुहा, वेगवान जलप्रवाह, खोल जलाशये अशा विविध ठिकाणी पर्यटनाला गेल्यावर तेथील परिसरातील धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याची क्रेझ केवळ युवकांमध्येच नव्हे, तर सर्वांमध्ये वाढल्याचे दिसून येते. धोकादायक ठिकाणाच्या सेल्फीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका मुलाने सापाबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला, तर हत्तीबरोबर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात एक तरुण हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला. सेल्फी म्हणजे असे काय आहे की, ज्याच्यासाठी आपल्या प्राणाचीही पर्वा करू नये? ती प्राणाच्या पलीकडे आहे का? दुर्दैवाने आपला देश या प्रकारच्या सेल्फींमुळे होणार्‍या मृत्यूमध्ये आघाडीवर आहे.

कमी वयात हातात येणारा पैसा. त्याच्या विनियोगाकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. या विकृतींना लगाम कोण घालणार? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना स्मार्टफोन द्यायच्या आधी तो कसा वापरावा, याचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. शाळा, महाविद्यालये इथेही संगणक/ स्मार्टफोनचे दुष्परिणाम यावर प्रबोधन होणे बंधनकारक व्हावे. नागरिकशास्त्र या विषयात याचा समावेश व्हायची हीच वेळ आहे.

कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते. मोबाईल तंत्रज्ञानाचेपण असेच आहे. जर गरज असेल तरच ते वापरा. वेळ जात नसेल तर मैदानी खेळ, कला, बाह्य क्रिया, योगा, फिरणे, संगीत असे अनेक पर्याय आहेत. मोबाईल न वापरायची सवयपण झाली पाहिजे. माझा एक मित्र रविवारी मोबाईल/नेट अजिबात वापरत नाही. स्वत:वर बंधन व शिस्त याबाबतीतही आवश्यक आहे. जर माफक प्रमाणात हवे तेव्हाच जर आपण हे तंत्रज्ञान वापरले, तर त्याचे अनेक फायदेही आहेत.

क्षणोक्षणी सेल्फी काढण्याचे प्रकार नित्य आढळत आहेत. सेल्फी म्हणजे असे काय आहे की, ज्याच्यासाठी आपल्या प्राणाचीही पर्वा करू नये? दुर्दैवाने आपला देश या प्रकारच्या सेल्फींमुळे होणार्‍या मृत्यूमध्ये आघाडीवर आहे.

डॉ. दीपक शिकारपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news