कालचाच खेळ आज पुन्हा…

कालचाच खेळ आज पुन्हा…
Published on
Updated on

गोव्यात 1967 पासून पक्षांतर या सोयरिकीच्या रोगाच्या संसर्गाची लागण झाली, ती आजअखेर कायम आहे. गेल्या पाच वर्षांत गोव्यात काँग्रेस पक्ष चारवेळा फुटला. सहा वर्षांत 29 आमदारांनी पक्षांतर केलं. एकेकाळी काँग्रेस पक्ष मगोपचे आमदार फोडत असे. आता भाजप काँग्रेसचे आमदार फोडत आहे. पक्ष बदलले, माणसं बदलली, सत्तापिपासू वृत्तीचा 'कालचाच खेळ आज पुन्हा' सुरू आहे.

गोव्यात 2017 साली गाजलेली एक घटना. विधान सभेचे निकाल जाहीर होऊ लागले आणि काँग्रेस गुलाल उधळणार, हे क्लिअर होऊ लागलेलं. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आम्ही पत्रकार मंडळी ताटकळत थांबलेलो. सकाळी दहा वाजल्यापासून. दुपारचे चार वाजून गेले. सर्व तयारी झालेली. 'मुख्यमंत्री कोण?' याची कमालीची उत्सुकता ताणलेली. तमाम जनता वाट पाहत होती. स्थानिक आणि देशभरातून आलेले बोरुबहाद्दर, दांडकेवाले. सत्ताराणीचे लग्न. जनतेनंच ठरवलेलं. अगदी बहुमतानं. खुर्चीही सजलेली होती. पण, 'मुख्यमंत्री कोण?'

यावर काही एकमत होईना. चार जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेलं. चौघेही माजी मुख्यमंत्री. मालदार-ताकदवर. आता काय करायचं? प्रसंग तर बाकाच! चारपैकी कोणाच्याच नावावर एकमत काय होईना. रात्रंदिवस खलबतं. चिंतन. मनन. बैठकांवर बैठका. रात्र-मध्यरात्र-उत्तररात्र. आयुष्याच्या उत्तरार्धाकडे झुकलेले चारही तरुण (?) नेते. प्रत्येकाची एकच डरकाळी – 'मीच होणार मुख्यमंत्री.' बैठकांमधील डायलॉग जसेच्या तसे बाहेर येऊ लागले. काँग्रेसच ती. भलतीच मीडियाफ्रेंडली. गाजलेले डॉयलॉग असे होते.

दिगंबर कामत : मी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राज्य करून दाखवलं आहे, त्यामुळं मीच होणार मुख्यमंत्री.

लुईझीन फालेरो : मी प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्या नेतृत्वाखाली 17 जागा निवडून आल्या. मीही मुख्यमंत्री होतो, त्यामुळं मीच होणार मुख्यमंत्री.

बाबू कवळेकर : सलग चार वेळा निवडून आलो. मला साधे मंत्रीही केले नाही, त्यामुळं आता मीच होणार मुख्यमंत्री.

विश्वजित राणे : माझे वडील (ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे) सर्वात ज्येष्ठ आणि सर्वाधिक अनुभवी आहेत, त्यामुळं तेच होणार मुख्यमंत्री.

रवी नाईक : मुख्यमंत्री पदाचा मला अनुभव आहे. मी बहुजन आहे, त्यामुळं मीच होणार मुख्यमंत्री.

दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ..? चूक! चार जणांच्या भांडणात भाजपचा लाभ. 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या स्टोरीची ही वनलाईन. भाजपला नाकारून जनतेने 17 आमदार काँग्रेसला दिलेलेे. एका अर्थानं जनादेशच. 40 सदस्य संख्येचं सभागृह. बहुमताचा जादुई आकडा 21. गोवा फॉरवर्ड या स्थानिक पक्षाचे तिघे, दोन अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष म्हणजेच मगोप या स्थानिक पक्षाचे तिघे. झाडून सगळे काँग्रेसला पाठिंबा द्यायला एका पायावर तयार! आता ते एका पायावर उभारणार तर कितीवेळ? आता निरोप येईल.. मग निरोप येईल… अमुक मंत्रिपद मिळेल… तमुक महामंडळ मिळेल. आशा और निराशा. अखेर 'डाव' मात्र फिसकटलाच.

जनादेशाचा आदर न करणारी काँग्रेस निघाली आत्मघातकी. आपल्या हातानं आपल्या पायावर नव्हे, डोक्यावरच मारून घेतली कुर्‍हाड. तेरा जागा मिळूनही भाजपनं सत्तेच्या लोण्याचा गोळा मटकन खाऊनही टाकला. 21 आकडा गाठण्यासाठीच्या सर्व कसरती, हिकमती परफेक्टच. सत्ताही स्थापन. हिसकावून उधळला स्वतःवर गुलाल. चतुराईनं-गतीनं. काँग्रेसची मंडळी बसली हात चोळत. 2007 मध्ये दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकार होते. त्यानंतर आजतागायत काँग्रेसवाले हातच चोळत बसलेत. आपापला. सत्तेविना इतकी वर्षे म्हणजे जल बिन मछलीच. तडफडून का मरायचं? मारा मग उड्या.

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती…

15 सप्टेंबरला होता आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन. त्याच्या पूर्वसंध्येला, देवाला साक्षी ठेवून पक्षांतराचा सोहळा विधिवत करण्यात आला. भाजपात गेलेल्या आठ आमदारांनी माध्यमांच्या पर्यायानं जनतेच्या मुखकमलावर जी कारणं फेकली, ती लाजबावच आहेत. लोककल्याणासाठी, विकासासाठी मी पक्षांतर केले. आतापर्यंत किती कल्याण, विकास केला? एक बरेच म्हणायचं की, चाळीसपैकी बाराच जणांना मंत्री होता येते. खरे तर चाळीस जणांना मंत्री करण्याची तरतूद असायला हवी होती. काय झालं असतं गोव्याचं?

हिरोविना पिक्चर

काँग्रेसच्या पिक्चरला हिरोच नाही. नेतृत्वहीन पक्ष. कोणच कोणाचे ऐकत नाहीत. सगळेच नेते. महान नेते. ज्येष्ठ नेते. पक्षाच्या कार्यक्रमालाही सगळे नेते एका मंचावर येणार नाहीत. अहंकार मोठा. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आदींना अभिवादन करण्यासाठीही वेळ नसतो. पक्षाची समाजमाध्यमातील गतीही कासवाची. जो तो राजा. दिल की खुशी, मन का राजा. दिगंबर कामत समाजमाध्यमात भलतेच सक्रिय. याचं अभिनंदन, त्याला श्रद्धांजली, यांचा निषेध, त्याचं स्वागत. गाडी सुसाटच. ते मूळचे भाजपचे. काँग्रेसमध्ये होते 17 वर्षे. तेव्हाही त्यांचा एक पाय काँग्रेस, तर एक भाजपात. आता दोन्हीही पाय भाजपात. आता तीन आमदारांची बाकी राहिली. गोवा काँग्रेसच्या हवेलीत.

मला देवानेच सांगितले…

मी देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी देवाचा कौल घेतला. देवाला सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर देवाने मला, 'तुला हवा तो निर्णय घे, मी तुझ्या पाठीशी असल्याचे सांगितले…' माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले. 2022 च्या निवडणुकीत मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा येथे जाऊन आम्ही काँग्रेस सोडणार नाही, अशी शपथ काँग्रेसच्या तमाम 36 उमेदवारांनी जाहीरपणे घेतलेली. त्यामुळं पक्षांतरानंतर दिगंबरांनी डायरेक्ट देवालाच मोबाईल केलेला असावा. ज्याचा त्याचा देव. सत्ता हाच देव.

उलट देव माझ्यावर खूश होईल

शपथ घेतल्याचे मी मान्य करतो; पण लक्षात घ्या, माझ्यावर देव कोपणार नाही. गरिबांची सेवा करण्यासाठी, लोकांची कामे करण्यासाठी म्हणजेच चांगले काम करण्यासाठी मी पक्षांतर केले आहे, त्यामुळे देव माझ्यावर खूशच होईल. पक्षांतर केलेल्या एका आमदाराचे देवाला दिलेले प्रमाणपत्र.

शब्दांचा कोरडा पाऊस

लोकशाहीची हत्या. जनादेशाचा अपमान. मतदारांचा अपमान. जेथे गूळ तेथे मुंगळे. सत्तेसाठी विचारांचा, तत्त्वांचा खून. विचारशून्यता. जनतेची घोर फसवणूक. काँग्रेस छोडो-भारत जोडो… यांसारख्या शब्दांचा मुसळधार पाऊस. जशी आपली लायकी तसे आपले राज्यकर्ते.

राजकारण आहे करिअर

गोव्यात मतदार संघ 40. सरासरी मतदारसंख्या 25 हजार. एका उमेदवाराचा निवडणूक खर्च किमान आठ-दहा कोटी. प्रमुख तीन उमेदवारांचे झाले 24 ते 30 कोटी. बाकीचे उमेदवार आणि गणिती आकडेमोड तुम्ही करा. एका निवडणुकीत हजारांवर कोटींचा खुर्दा. काँग्रेसेतर एका राष्ट्रीय नेत्याचे गोव्यात भाषण सुरू होते. तो म्हणाला, राजकारण करिअर आहे. सत्ता मिळाली नाही, तर आमदारांनी पाच वर्षे काय करायचे? का जाणार नाहीत आमदार पक्ष सोडून?

सुरेश गुदले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news