कथा जॉर्जिया राणीची

कथा जॉर्जिया राणीची

सेंट क्वीन केटवेन ही जॉर्जियाच्या संघर्षाची आणि बलिदानाची प्रतीक बनली होती. तब्बर चारशे वर्षांनंतर गोव्याच्या भूमीतील तिचे अवशेष जॉर्जियाकडे सोपविण्यात आले. कोण होती ही सेंट केटवेन? आणि तिचे अवशेष गोव्यात कसे आले?

सन 1989 पासून जॉर्जियन शिष्टमंडळे भारतात येत होती. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि जॉर्जियन संशोधक यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्यातील सेंट ऑगस्टिन चर्चच्या परिसरात शोधमोहिमा सुरू होत्या. जॉर्जियन लोकांना कसेही करून त्यांच्या एका महाराणीचे अवशेष असलेल्या थडग्याची जागा शोधायची होती. सगळ्या जॉर्जियाचे लक्ष या शोधाकडे लागलेले होते. कारण त्यांच्या अस्मितेचा एक मानबिंदू गोव्याच्या भूमीत दडलेला होता. पोर्तुगीज चर्चच्या धार्मिक दस्तऐवजांखेरीज शोधकर्त्यांकडे माहितीचा अन्य कोणताही स्रोत नव्हता. दस्तऐवजांमधील माहिती संदिग्ध असल्याने शोधकार्य अधिक अडचणीचे ठरले होते. अखेर सर्व अडचणींवर मात करत 2005 मध्ये भारतीय पोर्तुगीज आर्किटेक्ट सिध लोसा मेंडिरत्ता आणि भारतीय पुरातत्त्व विभागाच्या गोवा मंडलाचे तत्कालीन अधीक्षक व पुरातत्त्व संशोधक निजामुद्दीन ताहेर यांच्या प्रयत्नांना यश आले. सेंट ऑगस्टिन चॅपेलच्या एका खिडकीखाली त्यांना जॉर्जियन महाराणीचा तळवा आणि खांदा यांचे अवशेष असलेले थडगे सापडले.

जॉर्जियाची महाराणी गोव्यात येऊन चिरनिद्रा घेते, हे अचंबित करणारे रहस्य शोधण्यासाठी जॉर्जियाच्या मध्ययुगीन इतिहासाच्या दालनात प्रवेश करावा लागतो. कॉकेशस पर्वतरांगांच्या दक्षिण भागात वसलेला एक अत्यंत दुर्गम डोंगराळ देश. कॉकेशसच्या उत्तर व पूर्वेकडील पर्वतरांगा जॉर्जियाला रशियापासून अलग करतात. पश्चिमेला काळा समुद्र, दक्षिणेला तुर्की व आर्मेनिया आणि दक्षिण-पूर्वेस अझरबैजान. जॉर्जियाच्या सीमा निश्चित करतात.

पूर्व युरोप आणि पश्चिम आशिया यांच्या सीमारेषेवरील हा देश दुर्गम-डोंगराळ असला तरी त्याच्या भौगोलिक स्थानामुळे प्राचीन काळापासून लष्करी व राजकीय महत्त्व असलेला आहे. 'वाईन' निर्मिती ही जॉर्जियाची खासीयत आहे. जगातील सर्वात जुन्या वाईन उत्पादक देशांमध्ये त्याचा समावेश होतो. जॉर्जियाची वाईन उत्पादन परंपरा त्याच्या राष्ट्रीय अस्मितेचा एक मानबिंदू आहे. त्यामुळेच युनेस्कोने जॉर्जियन वाईनमेकिंग परंपरेचा समावेश अमूर्त जागतिक सांस्कृतिक वारशात केला आहे. रशियाचा हुकूमशहा जोसेफ स्टालिन जॉर्जियनच होता.

असा हा जॉर्जिया प्राचीन काळापासून राजकीय व धार्मिक महत्त्वाकांक्षांचा बळी देखील ठरला आहे. ख्रिश्चन व इस्लाम संघर्षात जॉर्जिया त्याच्या भौगोलिक महत्त्वामुळे कायमच भरडला गेला. इसवी सनाच्या चौथ्या शतकात जॉर्जियाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यामुळे कोलचिस, इबेरिया यांसारख्या छोट्या-छोट्या राजसत्तांमध्ये विखुरलेल्या जॉर्जियाचे धार्मिक व राजकीय एकीकरण होण्यास प्रारंभ झाला. इसवी सनाच्या बाराव्या शतकाच्या अखेरीस व तेराव्या शतकाच्या प्रारंभ काळात किंग डेव्हिड द बिल्डर आणि महाराणी तामार द ग्रेट यांच्या कर्तबगारीमुळे 'युनायटेड किंगडम ऑफ जॉर्जिया'ची निर्मिती झाली. यामुळे अखंड जॉर्जिया एका छत्राखाली आला. महाराणी तामार द ग्रेटला किंग ऑफ किंग्ज असे म्हटले जाते. कारण ती जॉर्जियाची पहिली स्त्री सत्ताधारी होती. ती महाराणी म्हणून स्वतंत्र व सर्वाधिकारी होती हे तिचे वेगळेपण विशेषतः नमूद करण्यासारखे आहे. युनायटेड किंगडम ऑफ जॉर्जियाची निर्मिती मात्र त्याच्या आजूबाजूच्या कोणाच्याच पचनी पडली नाही. त्यामध्ये इस्लामिक राजसत्ता तर होत्याच; परंतु ख्रिश्चन राजसत्ता देखील होत्या.

सतराव्या शतकात राजा डेव्हिड आणि महाराणी तामार यांच्या वंशातच संतत्वापर्यंत पोहोचलेल्या एका महाराणीचा जन्म झाला. ती म्हणजे सेंट क्वीन केटवेन. 1560 साली केटवेनचा जन्म झाला. जॉर्जियाच्या बगरोदीच्या मुखरानी राजघराण्याचा राजकुमार शोटान यांची ती कन्या होती. केटवेनचा विवाह काखेटी राज्याचा राजकुमार डेव्हिड प्रथम सोबत 1601 ला झाला. अवघ्या एक वर्षात केटवेनच्या वाट्याला वैधव्य आले. तिने स्वतःला धार्मिक व सामाजिक कार्यात गुंतवून घेतले. त्यावेळी तिचे सासरे अलेक्झांडर द्वितीय राजसत्तेवर होते; परंतु डेव्हिडच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ कॉन्स्टँटाईन प्रथम याने इराणच्या सफावीद राजसत्तेच्या मदतीने आपल्या पित्याविरुद्ध बंड केले.

अखेर 1605 मध्ये आपल्या पित्याला ठार करून राजमुकुट धारण करण्यात तो यशस्वी झाला. हे सर्व पाहून व्यथित झालेल्या केटवेनने कॉन्स्टँटाईनला धडा शिकवण्याचे ठरवले. तिने काखेतियन वंशाच्या पाठीराख्यांच्या सहकार्याने एक फौज उभी करून कॉन्स्टँटाईनचा पराभव केला. युद्धात तो मारला गेला. इराणच्या सफावीद राजसत्तेचा अधिकारी व इतिहासकार फाजली खुझानी याच्या नोंदीनुसार महाराणी केटवेनने कॉन्स्टँटाईनचा मृतदेह अर्डेबिल येथे सन्मानपूर्वक दफन केला. तसेच त्याचे समर्थक सैन्य आणि त्याच्या मदतीला आलेले इराणी सफावीद राजसत्तेचे सैनिक यांच्यावर दया दाखवली. जखमी शत्रू सैनिकांवर उपचार करवले. तसेच जे स्वदेशी सैनिक कॉन्स्टँटाईनच्या बाजूने लढले, त्यांना इच्छेनुसार आपल्या पदरी नोकरीस ठेवले. एवढेच नव्हे तर ज्या व्यापार्‍यांंनी कॉन्स्टँटाईनला अर्थसाह्य केले होते, त्यांना देखील नुकसान भरपाई दिली. शत्रूंचा इतिहासकार महाराणी केटवेनविषयी असे गौरवोद्गार काढतो.

यावरून तिची महानता लक्षात येऊ शकते. केटवेनच्या काळात इराणच्या सफावीद राजघराण्याची सत्ता जॉर्जियावर होती. महाराणी केटवेनने इराणचा शहा अब्बास प्रथम याच्याशी तह केला आणि आपला मुलगा तैमुराझ प्रथम याला काखेटीच्या राजगादीवर बसवले. अज्ञानपालक म्हणून ती स्वतः राज्यकारभार पाहू लागली. इराणने काखेटीवर हल्ला करू नये, यासाठी आपला मुलगा राजा तैमुराझ याची शांतिदूत म्हणून 1614 मध्ये केटवेन इराणच्या राजदरबारात गेली. इराणचा शहा अब्बास प्रथम याच्या अटीनुसार तिनेे स्वतः इराणमध्ये राजकीय बंधक म्हणून राहणे मान्य केले. सुमारे एक दशक ती इराणमधील शीराज शहरात बंधक म्हणून राहत होती.

दरम्यान, तिचा मुलगा राजा तैमुराझ याने इराण राजसत्तेविरुद्ध उठाव केला. याचा राग आल्याने शहा अब्बास प्रथमने केटवेनचा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिला इस्लाम कबूल करण्यास सांगितले. ख्रिश्चन धर्मावर अढळ श्रद्धा असलेल्या केटवेनने यास नकार दिल्यावर अत्यंत क्रूरपणे शीराज शहारातील भर चौकात तिला ठार मारण्यात आले. 13 सप्टेंबर 1624 ला वयाच्या 64 व्या वर्षी महाराणी केटवेनने अमानवी यातना भोगत अखेरचा श्वास घेतला. तेथे जमलेल्या गर्दीत उभा असलेला एक पोर्तुगीज चर्चचा धर्मगुरू हे सर्व पाहात होता. त्याने केटवेनच्या शरीराचे अवशेष मिळवले. त्यातील काही त्याने काखेटीमधील अर्डेबिल चर्चच्या दफनभूमीत दफन केले. काही अवशेष घेऊन तो नंतर गोव्याला पोहोचला. हा पोर्तुगीज धर्मगुरू म्हणजेच सेंट ऑगस्टिन. त्याच्या नावाने असलेल्या गोव्यातील ऐतिहासिक चर्चमध्ये जॉर्जियन लोक आपल्या महाराणी केटवेनचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न सुमारे 25 वर्षे करत होते.

जॉर्जियाच्या चर्चने महाराणी केटवेनला संत उपाधी बहाल केली. काही अंशी क्वीन केटवेनला जॉर्जियाची संत मीराबाईच म्हणावे लागते. तिचा मुलगा राजा तैमुराझला देखील एक बंदी म्हणून इराणच्या शहाच्या कैदेत उर्वरित जीवन कंठावे लागले. तो एक प्रतिभावंत कवी व साहित्यिक होता. 1625 साली त्याने 'द बुक' आणि 'पॅशन ऑफ क्वीन केटवेन' या काव्यात आपल्या मातेचे बलिदान शब्दबद्ध केले आहे.

जर्मन लेखक ड्रियास ग्रिफियस यांनी 1657 मध्ये 'कॅथरीना व्हॉन जॉर्जियन' ही अभिजात शोकांतिका केटवेनच्या जीवनसंघर्षावर रचली. केटवेनच्या जीवनवृत्तांवरून 1861 मध्ये स्कॉटिश कवी विल्यम फोर्सिथ यांनी एक काव्य रचले. ते अत्यंत लोकप्रिय ठरले. 2005 मध्ये सेंट ऑगस्टिन चर्चमध्ये सापडलेल्या अवशेषांच्या जनुकीय विश्लेषणात हे सिद्ध झाले की, हे अवशेष सेंट क्वीन केटवेन यांचेच आहेत. 2017 मध्ये हे अवशेष सहा महिन्यांसाठी जॉर्जियात दर्शनासाठी नेण्यात आले. तेथील विविध चर्चमध्ये हे अवशेष नेण्यात आले. त्यानंतर 30 सप्टेंबर 2018 ला त्यांना परत भारतात आणले गेले. गेल्या आठवड्यात म्हणजे 9 जुलै 2021 ला सेंट क्वीन केटवेन कायमची आपल्या भूमीत परतली. जॉर्जियाची राजधानी तिब्लिसी येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सेंट क्वीन केटवेनचे अवशेष कायमचे जॉर्जियाला सोपवले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news