महिला आणि कौटुंबिक हिंसाचार

महिला आणि कौटुंबिक हिंसाचार
Published on
Updated on

[author title="डॉ. ऋतू सारस्वत" image="http://"][/author]

गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांनी शिक्षणाची कास धरत आर्थिक सक्षमीकरणाची वाट धरली. अनेक महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया कार्यरत झाल्या. पण अशा महिलांनाही कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा मुकाबला करण्यासाठी कायद्यापेक्षा अधिक ठोस आणि कठोर तसेच सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

कौटुंबिक तणाव वाढण्याची कारणे काहीही असोत; जगभरात झालेली तमाम सर्वेक्षणे असे सांगतात की, अर्ध्याहून अधिक भांडणांचे रूपांतर हिंसाचारात होते. ही हिंसा केवळ शरीरालाच जखमा देते असे नाही तर ज्या साहसाच्या बळावर माणूस स्वतःला माणूस म्हणून स्वीकारतो आणि मानवासारखा सन्मान मिळण्याची अपेक्षा करतो, ते साहस या हिंसेमुळे माणूस हरवून बसतो. वस्तुतः ही पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित होणारी एक मनोभावना आहे. बालपणीच स्त्रीच्या मनात तिचे रोपण बेमालूमपणे केले जाते. घराच्या तथाकथित मानमर्यादेचे पालन करणे हे एकट्या स्त्रीचे कर्तव्य आहे, असे बिंबवले जाते. हे कर्तव्य बजावताना तिला कितीही त्रास झाला तरी तिने तो निमूटपणे सहन करावा असे सांगितले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे, पुरुष हे स्वभावतःच शीघ्रकोपी असतात. तो घरातील कर्ता असतो आणि त्यामुळे क्रोधातून झालेली हिंसा समर्थनीयच आहे, असे स्त्रीला सांगितले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांनी शिक्षणाची कास धरत आर्थिक सक्षमीकरणाची वाट धरली. अनेक महत्त्वाच्या पदांवर स्त्रिया कार्यरत झाल्या. पण अशा महिलांनाही कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने एका कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित प्रकरणात सुनावणी करताना एखादी महिला सशक्त पदावर असेल तर ती कौटुंबिक हिंंसाचाराला बळी पडत नाही, असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. एक महिला पोलिस अधिकारी कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडू शकत नाही, असे मत सत्र न्यायालयाने नोंदविल्यानंतर त्यावर दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने हे मत मांडले. एकूणच गृहिणी असो किंवा उच्चपदस्थ असो, महिलांना कधी ना कधी कौटुंबिक हिंंसाचाराचा सामना करावा लागलेला असतो.
आपल्याकडे किंबहुना जगभरात आर्थिकदृष्ट्या पतीवर अवलंबून असलेल्या गृहिणी कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडतात, असा साधारण समज आहे. असा तर्क मांडण्यामागे काही संशोधन अहवालातील निष्कर्ष पाहता येतील. यात म्हटले आहे की, निम्न आर्थिक स्थिती आणि असुरक्षित सामाजिक स्थितीचा सामना करणार्‍या महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागते. परंतु आजतागायत एकही संशोधन अहवाल नोकरदार महिला या कौटुंबिक हिंसाचारमुक्त आहेत, असा दावा करू शकलेले नाही.

एबिगेल बीटस्मॅन यांचे संशोधन 'वुमेन अँड मेन्स रिलेटिव्ह स्टटस् अँड इंटिमेंट पार्टनर व्हायलन्स इन इंडिया'मध्ये म्हटले आहे की, एखाद्या कुटुंबातील महिला पतीपेक्षा अधिक उत्पन्न कमवत असतील तरीही तिला कौटुंबिक हिंसेच्या स्थितीला सामोरे जावे लागते. बीटस्मन म्हणतात, पितृसत्ताक कुटुंब पद्धती आपल्या समाज रचनेत एवढी मुरलेली आणि अंगवळणी पडलेली आहे की एखादी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही याचा कुटुंबातील अन्य व्यक्तींवर काहीही परिणाम होत नाही. पितृसत्ताक विचारांच्या मानसिकतेवर थोडाही परिणाम होत नाही. फरक एवढाच की, आर्थिक रूपाने सशक्त असलेल्या महिला या काही प्रमाणात कौटुंबिक हिंसाचाराचा मुकाबला करू शकतात किंवा विरोध करू शकतात.

जगभरातील विविध समाजात महिलांना त्यांच्या भूमिकेच्या अनुरूप सामावून घेतले जाते. एकीकडे आधुनिकरणाचा दावा केला जात असला तरी यशस्वी वैवाहिक जीवनाचा भार हा सर्व महिलांवरच टाकला जातो आणि वैवाहिक आयुष्यात होणार्‍या चढउतारात महिला खंबीर आणि संयमाची भूमिका घेत विवाह संस्थेला बळकटी देण्याचे काम करतात, असे म्हटले जाते. यातील 'धैर्य'च्या संकल्पनेत मौखिक आणि मानसशास्त्रीय गैरवर्तनाला सहजपणे सामावून घेण्याचा समावेश आहे. ही संकल्पना नोकरदार महिलांना लागू होते, हे उघड आहे.

पुरुषांच्या आक्रमक व्यवहाराचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण केल्यास पुरुष आपली भावनात्मक असुरिक्षतता आणि तणावाची भरपाई करण्यासाठी अधिक आक्रमकपणे वर्तन करत असतो. आगपाखड, पुरुषी अहंकार, नियंत्रण मिळवण्याची प्रवृत्ती आणि असुरक्षितता या कारणांंमुळे पुरुष हा जोडीदारावर अन्याय करण्यासाठी प्रवृत्त होतो. अशा स्थितीत जगभरातील महिला कौटुंबिक हिंसाचार निमूटपणे का सहन करत आहेत, असा प्रश्न आहे. पण यामागे सामाजिक आणि कौटुंबिक प्रतिष्ठा धोक्यात येण्याची भीती असते. कोणताही अन्याय हा काही काळापुरता मर्यादित राहील, असा विचार करूनच महिला अत्याचार सहन करत असतात. परंतु जसजशी ती अपमान सहन करत जाते, तसतसा भविष्यात जोडीदाराचा स्वभाव बदलत जातो. मौखिक आणि मानसशास्त्रीय अत्याचार सहन करताना तिचा मेंदू अधिकच खंबीर होत जातो आणि त्यामुळे त्या त्यावेळी तिच्याशी होणार्‍या गैरवर्तनाचे गांभीर्य ओळखणे कठीण होते.

अल्बर्ट बंडुरा यांच्या 'सोशल लर्निंग थेअरी' ही कुटुंबातील हिंसाचार हा पुढील अनेक पिढीपर्यंत सुरू राहण्याच्या मुद्दा मांडते. यानुसार मुलांना लहानपणापासून हिंसक वातावरणाचा अनुभव येत असेल आणि त्याची नक्कल करण्याच्या प्रक्रियेत तो आपोआपच हिंसक वर्तन आत्मसात करतो. कौटुंबिक हिंसाचार हा राष्ट्राच्या विकासावर परिणाम करतो. तसेच समाजाच्या आर्थिक, मानसशास्त्रीय आणि भावनात्मक आधार देताना अडथळे आणतो. संशोधनानुसार महिलांविरुद्ध हिंसाचारामुळे होणारी हानी ही जीडीपीच्या एकूण दोन टक्के राहू शकते.

कौटुंबिक हिंसाचारामुळे संरक्षण अधिनियमाबाबत उमटणार्‍या प्रतिक्रिया विभिन्न आहेत. एकीकडे महानगरात राहणार्‍या उच्चभ्रू वर्गात त्याचा दुरुपयोग होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे तर दुसरा वर्ग पितृसत्ताकच्या कठोर बंधनात अडकलेल्या ग्रामीण भागातील महिलांसाठी हा कायदा निरपयोगी असल्याचे मानले जात आहे. म्हणून कौटुंबिक हिंसाचाराचा मुकाबला करण्यासाठी कायद्यापेक्षा अधिक ठोस आणि कठोर तसेच सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. कौटुंबिक हिंसाचार पीडित लोकांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आयुष्यभर शारीरिक आणि मानसिक अत्याचार सहन केल्याने कुटुंबातील वातावरण सुखदायी होणार नाही आणि भावी पिढीचेही भवितव्यही उज्ज्वल होणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news