व्यक्‍तिचित्र : पांडियन यांची इतकी चर्चा का?

व्यक्‍तिचित्र : पांडियन यांची इतकी चर्चा का?

[author title="के. श्रीनिवासन" image="http://"][/author]

तामिळनाडूत जन्मलेले आणि ओडिशा केडरचे आयएएस अधिकारी व्ही. के. पांडियन यांच्याभोवती सध्या ओडिशाचे राजकारण फिरत आहे. गेल्या वर्षी व्ही. के पांडियन यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देत बीजू जनता दलात प्रवेश केला. सध्याच्या काळात ते पक्षाचे स्टार प्रचारक आणि रणनीतिकार आहेत. त्यांना नवीन पटनायक यांचा उत्तराधिकारी म्हणूनच पाहिले जात आहे.

निवडणुकीच्या राजकारणामुळे सध्या ओडिशातील वातावरण पूर्णतः ढवळून गेले आहे. 13 मे रोजी ओडिशात चार लोकसभा आणि 28 विधानसभेच्या जागांसाठी मतदान पार पडले. ओडिशातील हा पहिला टप्पा होता. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून या राज्यात जे काही घडतेय ते मागच्या काळात कधीही घडलेले नव्हते, असे येथील नागरिक सांगत आहेत. एका राज्याची निर्मिती भाषिक मुद्द्यावर झालेली असताना आता स्थानिक राजकारण अचानक बिगर उडिया भाषिक व्यक्तीच्या भोवती फिरताना दिसत आहे. कदाचित भविष्यात ही व्यक्ती या राज्याचा मुख्यमंत्रीदेखील होऊ शकते आणि त्यामुळे नवीन पटनायक यांच्या 24 वर्षांच्या राजवटीवर फुलस्टॉपही येऊ शकतो, अशी चर्चा आहे. अर्थात या दोन्ही शक्यता ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या राजकीय यशापयशावर अवलंबून असणार आहे. सद्य:स्थितीत ओडिशात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जात आहेत, हे देखील ध्यानात घेतले पाहिजे.

तामिळनाडूत जन्मलेले आणि ओडिशा केडरचे आयएएस अधिकारी व्ही. के. पांडियन यांच्याभोवती सध्या ओडिशाचे राजकारण फिरत आहे. गेल्या वर्षी व्ही. के. पांडियन यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देत बीजू जनता दलात प्रवेश केला. सध्याच्या काळात ते पक्षाचे स्टार प्रचारक आणि रणनीतिकार आहेत. त्यांना नवीन पटनायक यांचा उत्तराधिकारी म्हणूनच पाहिले जात आहे. नवीन पटनायक यांचा राजकीय वारसदार म्हणूनही म्हटले जात आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यापासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यापर्यंतच्या सर्व विरोधी पक्षांनी पांडियन यांना आपल्या भाषणातून लक्ष्य केले आहे.

भुवनेश्वरमध्ये बीजेडीची सत्ता आल्यास या राज्याची धुरा ही बिगर उडिया व्यक्तीच्या हाती जाईल, असे भाजप, काँग्रेसचे नेते म्हणत आहेत. प्रश्न उडिया अस्मिता धोक्यात येण्याचादेखील आहे. उडिया भाषेच्या नावावर निर्माण झालेेल्या राज्यात तमिळ भाषिक मुख्यमंत्री कसा होऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे भारतीय मूळ वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान असल्याबद्दल आनंद व्यक्त करणार्‍या मंडळींना भारतातल्या एका राज्याचा मुख्यमंत्री हा दुसर्‍या राज्याचा का असू शकत नाही, अशी विचारणा करत आहेत. राज्यघटनेत अशी काही तरतूद आहे का? नाही. मग अन्य भाषिक किंवा परराज्याचा मुद्दा का मांडला जात आहे? मुळात बीजेडीचा उद्देश नवीन पटनायक यांना पदावरून हटविण्याचा नाही. पण बीजेडीच्या 40 स्टार प्रचाराकांच्या यादीत नवीन पटनायक यांच्यानंतर पांडियन यांचेच नाव आहे. ते अन्य उमेदवारांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. एवढेच नव्हे तर नवीन पटनायक यांच्या बैठकीतही पांडियन यांच्याकडेच सर्वांचे लक्ष असते.

पांडियन हे मुख्यमंत्री कार्यालयात 2011 मध्ये नवीन पटनायक यांचे स्वीय सहायक म्हणून रुजू झाले होते. तेथे आपल्या असामान्य कार्यशैलीमुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची बॅकरुम बॉय या रूपातून निवड झाली. बीजेडीसाठी 2014 ते 2019 या निवडणुकीच्या रणनीतीसाठी त्यांना नेमण्यात आले. त्याचवेळी भाजप आणि काँग्रेसचे स्थानिक नेते हे सचिव रूपातून कार्य करणार्‍या पांडियन यांना गरजेपेक्षा जादा अधिकार दिल्याबद्दल आरडाओरडा करत होते. 50 वर्षीय पांडियन हे गेल्या ऑक्टोबरपर्यंत मुख्यमंत्र्यांचे सचिव होते आणि त्यांनी जेव्हा व्हीआरएस घेत बीजेडीचे सदस्यत्व घेतले, तेव्हाच त्यांच्यावर परप्रांतीय असल्याचा शिक्का मारला जाऊ लागला. परंतु पांडियन यांनी त्याची तमा बाळगली नाही. ते म्हणतात, मी जन्माने भारतीय आहे आणि श्वास ओडिशात. माझ्या मुलांची मातृभाषा उडिया आहे आणि ओडिशा माझी कर्मभूमी आहे. नवीन पटनायक यांच्या वारसदाराच्या मुद्द्यावर ते म्हणतात, माझी निष्ठा, ओडिशाच्या जनतेप्रती असणारी समर्पित भावना आणि मेहनत यांसारख्या मूल्यांचे आपण उत्तराधिकारी आहोत. राजकीय उत्तराधिकारी कोण याचे उत्तर जनता देईल, असे नवीन पटनायक नेहमीच म्हणतात.

सन 2000 च्या आयएएस बॅचचे अधिकारी पांडियन यांचे प्रारंभी पंजाब केडरमध्ये होते. परंतु प्रशिक्षणानंतर काही महिन्यांतच केडर बदलत त्यांना ओडिशा केडर देण्यात आला. कारण त्यांनी 2000 बॅचच्या ओडिशा केडरच्या अन्य आयएएस अधिकारी सुजाता (आता सुजाता आर. कार्तिकेयन) यांच्याशी विवाह केला. सुजाता यांचे गाव ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील आहे. त्यामुळेच आताच्या निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांची बदली राज्याच्या वित्त विभागात करण्यात आली. हे पद बिगर निवडणूक प्रक्रियेचे आहे. यात जनतेशी कोणताही संपर्क येत नाही.

नवीन पटनायक हे जनतेला ढगळा कुर्ता, पायजमा आणि साधी चप्पल या वेशभूषेत दिसतात. आपल्या गुरूप्रमाणेच पांडियनदेखील सार्वजनिक ठिकाणी त्ंयांच्यासारखीच प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी तेही संपूर्णपणे पांढर्‍या पेहरावात सर्वत्र जातात. मार्च महिन्यात भाजप आणि बीजेडी यांच्यात निवडणूक आघाडीबाबत चर्चा सुरू होती, तेव्हा बीजेडीकडून पांडियनच यांनीच अनेकदा दिल्लीवार्‍या केल्या. ओडिशाच्या राजकारणात पांडियन यांचे वाढते वर्चस्व केंद्रीय मंत्री आणि ओडिशातील भाजपचा चेहरा असणार्‍या धर्मेंद्र प्रधान यांनाही विचलित करणारे ठरले आहे.

त्यामुळेच त्यांनी हा मुद्दा एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा नसून नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखाली प्रस्थापित असलेली प्रक्रिया मोडकळीस येण्याचा आहे, असे म्हणत पांडियन यांच्या करिष्म्यावर टीका करण्यास सुुरुवात केली आहे. त्यांच्या मते, लोकशाही मूल्यांना बाजूला ठेवले आहे आणि ओडिशाच्या अस्मितेला तिलांजली दिली जात आहे. नवीन पटनायक आणि बीजेडीला जनतेने दिलेला कौल बाजूला ठेवत बिगर ओडिशा व्यक्तीच्या हाती सत्ता केंद्रित केली जात असून तो मतदारांचा अपमान आहे. म्हणूनच ओडिशा अस्मितेच्या मुद्द्यावर भाजपला ओडिशात आपले पहिले सरकार स्थापन होईल, अशी आशा वाटते, असे ते म्हणतात. तसेच 2019 मध्ये मिळालेल्या लोकसभेच्या आठ जागा कायम राखत आम्ही त्यात आणखी वाढ करू, असा विश्वास ते व्यक्त करतात.

बीजेडीने गतनिवडणुकीत 12 जागा जिंकल्या होत्या; तर काँग्रेसने एक. विधानसभेत बीजेडीला 113 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला 23, काँग्रेसला 9 आणि अपक्षांना 2 जागा होत्या. यावेळी तिरंगी लढत असल्याने ही निवडणूक भाजपला कठीण ठरत आहे. निवडणुकीचे वातावरण फिरलेले आहे की नाही हे चार जूनलाच कळेल. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर 77 वर्षीय नवीन पटनायक हे 2000 पासून मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना सहाव्यांदा संधी मिळू शकते. तसे झाल्यास ते काही महिन्यांतच राज्यातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे व्यक्ती ठरतील. नवीन पटनायक यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आतापर्यंत कधीही पराभावाचे तोंड पाहिले नाही. सध्या ते दोन विधानसभा मतदारसंघांतून उभे आहेत. हिजिली आणि कांताबंजी. विजयानंतर ते एक जागा पांडियन यांना सोडू शकतात. बीजेडीची कामगिरी चांगली राहिली तर पांडियन यांच्या नेतृत्वाच्या वैधतेवर शिक्कामोर्तब होईल आणि त्यांची राजकीय उंची वाढेल. याउलट घडले तर संपूर्ण खापर पांडियन यांच्यावर फोडले जाईल.

पांडियन हे परप्रांतीय आहेत की नाही हे त्यांनी जनतेवर सोपविले आहे. भाजपला ओडिशा अस्मितेवर बोलण्याचा अधिकार नाही, असे पटनायक म्हणतात. बीजू पटनायक यांना भारतरत्न सन्मानास पात्र ठरवले नाही आणि ओडिशाच्या 1817 च्या पायका बंडाला देखील मान्यता दिली नाही, असे ते म्हणतात. तूर्त मोफत सुविधांच्या आश्वासनांमुळे मतदारराजा समाधानी असल्याने पांडियन हे कोणत्या गावचे आहेत याच्याशी त्याला काही देणे-घेणे नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news