Garfield Sobers | असा गॅरी पुन्हा होणे नाही!

Garfield Sobers |
Garfield Sobers | असा गॅरी पुन्हा होणे नाही!
Published on
Updated on

श्रीराम शिधये

वेस्ट इंडिजचे अष्टपैलू क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांचं नुकतंच देहावसान झालं. गॅरी या नावाने जग त्यांना ओळखत असे. सातत्यपूर्ण कष्ट करण्यावर, सराव करण्यावर त्यांचा गाढ विश्वास होता. त्यांचं व्यक्तिमत्त्व लोभस होतं, चाल डौलदार होती. जगातल्या अनेक खेळाडूंशी त्यांचे सौहार्दाचे संबंध होते. काही भारतीय खेळाडूंनाही त्यांनी गोलंदाजीतील कानमंत्र दिला. त्यांचा खेळ अचाट आणि अफाट होता; पण तितकेच ते विनम्र आणि सौजन्यशील होते.

‘लोक म्हणतात की, मी प्रतिभावंत आहे; पण खरं सांगू का? मी जे काही मिळवलं, त्यामागं मी सातत्यानं केलेले कष्टच आहेत’, असं सर गारफिल्ड सोबर्स यांनी एकदा सांगून टाकलं. 'गॅरी सोबर्स' याच नावानं ते क्रिकेटच्या जगात प्रसिद्ध होते. ज्यांनी त्यांचा खेळ प्रत्यक्ष बघितला आहे, त्यांना त्याची उंच कॉलर असलेली, डौलदार चालीची मैदानावरची मूर्ती सहज आठवेल. आणि तशी ती आठवावी, अशीच कामगिरी त्यांनी केली आहे. परिपूर्ण अष्टपैलू क्रिककेटपटू म्हणजे काय, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गॅरी सोबर्स. फलंदाजी, फिरकी गोलंदाजी, जलद गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या प्रत्येक प्रांतात ते अजोड होते; पण याहीपेक्षा ते स्वभावानं अतिशय उमदे होते. एक माणूस म्हणूनही खूप मोठे होते. क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्यायचा असतो, अशी त्यांची धारणा होती आणि त्यामध्ये अखेरपर्यंत बदल झाला नाही.

अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं १९७०-७१ मध्ये वेस्ट इंडिजचा दौरा केला. ती कसोटी मालिका भारतानं १-० अशी जिंकली. सुनील गावस्कर, दिलीप सरदेसाई आणि एकनाथ सोलकर यांनी तो दौरा संस्मरणीय केला. दुसरी कसोटी भारतानं जिंकली; पण पहिल्याच कसोटीत भारतानं वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिला होता. ते सांगायला अजित वाडेकर हे वेस्ट इंडिजच्या तंबूत गेले. त्यांनी कर्णधार सोबर्स यांना फॉलोऑन देत असल्याचं सांगितलं, तेव्हा सोबर्स वैतागले. नियम नीट बघ, असं त्यांनी वाडेकर यांना सुनावलं; पण पावसामुळं सामना पाच नाही, चार दिवसांचा झाला आहे आणि नियमाप्रमाणं चार दिवसांच्या सामन्यात २०० धावांचा नाही, तर १५० धावांचा पुढावा (लीड) आवश्यक असल्याचं वाडेकर यांनी सोबर्स यांना सांगितलं. तेव्हा सोबर्स यांचा नाईलाज झाला; पण पाच कसोटी सामन्यांच्या त्या मालिकेत वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा (५९७) करणारे सोबर्सच होते. विशेष म्हणजे, ज्या कप्तानानं आापल्याला हरवलं, त्याच्याशी त्यांनी अबोला धरला नाही. मनात कटुता ठेवली नाही. एकंदरच भारत, भारतीय खेळाडू आणि भारतीय क्रिकेट यांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम होतं. सद्‌भावना होत्या.

त्या मालिकेत एकनाथ सोलकर यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रांतांत चामकदार कामगिरी केली होती. कठीण प्रसंगांत त्यांनीच दिलीप सरदेसाई यांना साथ दिली होती. पहिल्या कसाेटीत सुरुवातीला चापडणार्‍या सोलकर यांना नंतर आपला सूर सापडला होता. त्यांच्या चिकाटीवर आणि खेळावर सोबर्स प्रसन्न झाले. त्यांनी सोलकर यांना गोलंदाजीतल्या काही गोष्टींचे कानमंत्र दिले. सोबर्स मुंबईत आले की, ज्येष्ठ क्रिककेटपटू माधव आपटे यांच्या घरी जात असत. अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर यांना भेटत असत. दिलदार व्यक्तिमत्त्वाच्या सोबर्स यांच्याबरोबर खेळतानाच्या सुरेेख आठवणी सुनील गावस्कर, सलीम दुराणी यांच्याकडे आहेत. त्यांची कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडली असल्याची आठवण दिलीप वेंगसरकर यांच्याकडे आहे.

ज्यांच्या आठवणींमध्ये मनापासून रमावं असंच लोभस व्यक्तिमत्त्व सोबर्स यांचं होतं. त्यांच्याबरोबर खेळणारा वेस्ट इंडिजचा चार्ली डेव्हिस म्हणतो, ‘ते फारच साधे होते. आपल्यामध्ये अनेक विशेष गोष्टी आहेत, याची त्यांना अजिबातच जाणीव नाही असं वाटावं, असंच त्यांचं वागणं असे,’ असं चार्ली म्हणतो. याच चार्लीनं भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत (१९७०-७१), सोबर्स यांच्या खालोखाल ५२९ धावा केल्या होत्या. त्याला गॅरी यांचा जवळून सहवास लाभला होता. त्यामुळं त्याचं मत आणि निरीक्षणं फार महत्त्वाची आहेत. वेस्ट इंडिजच्या संघातील अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी गॅरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यातून गॅरी यांच्याबद्दल आदर आणि प्रेम या भावनांचं दर्शन होतं. चार्लीची श्रद्धांजली ही त्यातलीच एक. आपल्या सहकार्‍यांचंच नाही, तर जगातल्या ज्या देशांत क्रिकेट हा खेळ खेळला जातो, त्या देशांतील खेळाडूंमध्ये गॅरी यांच्याबद्दल आदराचीच भावना दिसते.

आपल्या अचाट खेळानं, साध्या वागणुकीनं आणि नम्र वृत्तीनं जगभर चाहते मिळविणार्‍या गॅरी यांचा जन्म १९३६मध्ये बार्बाडोस येथे झाला. त्यांचे वडील शेमाँट आणि आई थेल्मा यांना एकंदर सात मुलं झाली. गॅरी हे त्यातले सहावे! त्यांचे वडील हे एका व्यापारी जहाजावर खलाशी होते. दुसर्‍या महायुद्धामध्ये त्यांचं जहाज जर्मनीनं सोडलेल्या शस्त्रामुळं बुडालं. त्यावेळी गॅरी यांचे वय सहा वर्षांचं होतं. पुढं त्यांना त्यांच्या आईनं वाढवलं. रस्त्यावर टेनिसच्या चेंडूनं खेळता खेळता गॅरी त्या खेळात एकदम तयार झाले. सुरुवातीला ते बार्बाडोस क्रिकेट लीगमध्ये दोन क्लबतर्फे खेळले. वयाच्या १५व्या वर्षी त्यांनी पोलिसांच्या संघात प्रवेश केला. दोन वर्षांत त्यांना बार्बाडोसच्या संघात निवडण्यात आलं. १९५२मध्ये भारताच्या संघानं वेस्ट इंडिजचा दौरा केला. या संघाविरुद्ध खेळण्यासाठी पहिल्या कसोटीतच गॅरी यांची फिरकी गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली. त्या सामन्यात त्यांनी ८९ षटकं टाकली आणि सात बळी मिळवले. भारताचे ज्येष्ठ फलंदाज पॉली उम्रीगर यांना त्यांनीच बाद केलं. १९५४मध्ये ते इंग्लंडविरुद्धच्या कसोटीतही खेळले.

हळूहळू त्यांनी आपलं संघातलं स्थान पक्कं केलं; पण त्यांचं नाव सर्वतोमुखी झालं, ते १९५७-५८मध्ये झालेल्या पाकिस्तानच्या मालिकेमुळं. त्या मालिकेच्या तिसर्‍या कसोटीत त्यांनी नाबाद ३६५ धावा फटकावल्या. त्यानंतरच्या काळात त्यांनी अनेकदा चकित करणारे पराक्रम केले. उदाहरणार्थ, एकाच मालिकेत ७००पेक्षा जास्त धावा आणि २० फलंदाजांना बाद करण्याची किमया करणारे गॅरी हे एकमेव अष्टपैलू खेळाडू आहेत. ही कामगिरी त्यांनी १९६६ मध्ये इंग्लंडविरुद्ध केली. एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तीन हजारांपेक्षा जास्त धावा आणि १०० पेक्षा जास्त फलंदाजांना बाद करण्याचा पराक्रम करणारेही ते एकमेव अष्टपैलू क्रिकेटर आहेत. हा पराक्रम त्यांनी इंग्लंडविरुद्धच केला. असा भीमपराक्रम करणारे गॅरी मैदानाबाहेर कमालीचं स्वच्छंंदी जीवन जगले. त्यांनी जीवनाचा ‘सर्वांगीण’ उपभोग घेतला; मात्र त्याचा आपल्या खेळावर कधीही परिणाम होऊ दिला नाही.

क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे, या समजुतीला त्यांनी तडा जाऊ दिला नाही. त्यांच्या एकंदर आयुष्याकडं पाहिलं की लक्षात येतं, असा गॅरी पुन्हा होणे नाही! त्यांच्या पुण्यस्मृतीला मनापासून सलाम!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news