ब्रिटनच्या निवडणुकीत सुनाक यांची कसाेटी

ब्रिटनच्या निवडणुकीत सुनाक यांची कसाेटी

[author title="डॉ. योगेश प्र. जाधव" image="http://"][/author]

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा निर्णय का घेतला असावा, याची सध्या चर्चा सुरू आहे. सुनाक यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हाचा काळ अत्यंत कठीण होता. मात्र गेल्या दीड वर्षाच्या काळात सुनाक यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा गाडा सावरण्यात बरेच यश मिळवले आहे. त्याचा राजकीय लाभ सुनाक यांना मिळू शकेल, असे जाणकारांना वाटते. मात्र जनमत चाचण्यांमध्ये हुजूर पक्षाला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सत्ता कायम राखण्यासाठी सुनाक यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल असे दिसते.

वर्षभराच्या कालावधीत जगभरातील सुमारे 70 देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने 2024 हे निवडणुकांचे वर्ष म्हणून संबोधले जात आहे. यामध्ये ब्रिटनचा समावेश नव्हता. परंतु तेथेही अनपेक्षितपणे सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी अलीकडेच '10, ड्राऊनिंग स्ट्रीट' या ठिकाणावरून भर पावसात केलेल्या भाषणात या निवडणुकांची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वास्तविक सुनाक यांच्या नेतृत्वाखालील हुजूर पक्षाचा म्हणजेच कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या सरकारचा कार्यकाळ डिसेंबर 2024 मध्ये संपणार होता आणि जानेवारी 2025 मध्ये तेथे सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. पण तोपर्यंत वाट न पाहता सुनाक यांनी 6 जुलै 2024 निवडणुका घेण्याची घोषणा केली. नियोजित वेळेपेक्षा सहा महिने आधी निवडणुका घेण्याचा निर्णय पंतप्रधान सुनाक यांनी का घेतला याबाबत सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. त्याची मीमांसा करण्यापूर्वी ब्रिटनच्या संसदीय निवडणुकांची काही वैशिष्ट्ये जाणून घेणे औचित्याचे ठरेल.

भारतातील निवडणुकांमध्ये गेल्या काही वर्षांत मतदान यंत्रांद्वारे निवडणुका घेतल्या जात असल्या तरी ब्रिटनमध्ये मतपेटीच्या आधारे निवडणुका घेतल्या जातात. ब्रिटनमध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती मतदानासाठी पात्र मानली जाते. तेथे सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडते. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये (लोअर हाऊस) एकूण 650 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला 326 जागांची गरज आहे. 2019 मध्ये माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 365 जागा जिंकल्या होत्या. ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंड या चार देशांमधील मतदार मतदान करतात. कारण ग्रेट ब्रिटन या चार देशांचे प्रतिनिधित्व करतो.

यामध्ये स्कॉटलंडमधील 57 जागा, वेल्समधील 32 जागा आणि उत्तर आयर्लंडमधील 18 जागांचा समावेश आहे. मुदतीपूर्व सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी ब्रिटनची संसद बरखास्त करण्याचा निर्णय पंतप्रधानांचा असला तरी त्यासाठी तेथील राजाची संमती गरजेची असते. त्यानुसार प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून सुनाक यांनी यासाठीची परवानगी मिळवली आहे. सध्याच्या संसदेचा कार्यकाळ 30 मे रोजी संपुष्टात आला आहे. नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येईपर्यंत सध्याचे मंत्री आपापल्या पदावर कायम राहतील. वास्तविक सुनाक यांनी या निवडणुकासंदर्भात आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांनाही कल्पना दिली नसल्याचे आता समोर आले आहे.

दोन वर्षांपूर्वी ऋषी सुनाक यांनी अशाच अनपेक्षितपणे ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होत जगाला धक्का दिला होता. त्यांच्या निवडीनंतर भारतामध्ये आनंदोत्सव साजरा झाला होता. याचे कारण दीडशे वर्षेे ज्या भारतावर इंग्रजांनी राज्य केले, त्याच देशाच्या सर्वोच्चपदी मूळ भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान झाल्याने कालचक्राचे एक वर्तुळ पूर्ण झाले. अर्थात ऋषी सुनाक यांनी ज्या काळात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, तो काळ अत्यंत कठीण होता. कोरोना महामारीमुळे युरोपमधील ज्या अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याच्या स्थितीत आल्या, त्यामध्ये ब्रिटन अग्रस्थानी होता. याचे कारण कोरोनाची लाट येण्यापूर्वीच 'ब्रेक्झिट'चा निर्णय घेत इंग्लंड युरोपियन महासंघातून बाहेर पडला होता.

स्वतंत्रपणे आपल्या अर्थकारणाची उभारणी करत त्याला नवीन आकारमान देत असतानाच हे अराजक समोर येऊन ठेपले होते. दुसरीकडे, रशिया आणि युक्रेन युद्धाचा भडका उडाल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊन महागाईचा आगडोंब उसळला होता. या दोन्ही तडाख्यांमुळे ब्रिटनमधील औद्योगिकीकरणाला, कृषी अर्थकारणाला, रोजगारनिर्मितीला प्रचंड झळ बसली होती. त्यातून ब्रिटनला बाहेर काढण्याचे शिवधनुष्य ऋषी सुनाक यांना पेलायचे होते. गेल्या तीन दशकांपासून सुनाक यांचा हुजूर पक्ष सत्तेत आहे. या पक्षामध्ये अंतर्गत गटबाजीला उधाण आल्यामुळे इंग्लंडच्या आर्थिक व राष्ट्रीय विकासाला मर्यादा येत असल्याचे जनमत तयार झाले होते.

ऋषी सुनाक यांच्याकडे पंतप्रधानपदाचा पदभार देणार्‍या बोरिस जॉन्सन यांची गच्छंती झालेले प्रकरण हुजूर पक्षाविषयीचा असंतोष वाढण्यास हातभार लावून गेले होते. अशा सर्व अत्यंत नकारात्मकतेने भरलेल्या काळात सुनाक यांच्याकडे पंतप्रधानपद आले असल्याने ते या पदाला कितपत न्याय देणार याविषयी साशंकताही व्यक्त केली जात होती. मुळात त्यांच्या पंतप्रधानपदाला खुद्द हुजूर पक्षामधूनच अंतर्गत विरोध होता. त्यामुळे पक्षांतर्गत समन्वय साधून ब्रिटनच्या अर्थकारणाला दिशा देण्यात सुनाक यांना यश येईल का, असा प्रश्न उपस्थित होत होता. तथापि गेल्या दीड वर्षाच्या काळात पंतप्रधान सुनाक यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा गाडा सावरण्यामध्ये बर्‍याच प्रमाणात यश मिळवल्याचे दिसून आले.

विशेषतः ब्रिटनमध्ये महागाईने कळस गाठल्यामुळे बराच असंतोष निर्माण झाला होता. तेथील महागाईचा दर दोन आकड्यांवर गेला होता. परंतु आता तो घसरून दोन टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात सुनाक यांना यश आले आहे. बोरिस जॉन्सन आणि लिझ ट्रस या पूर्वसुरींच्या कारभाराने डागाळलेली पक्षाची प्रतिमा सावरण्यातही ते यशस्वी ठरले. त्यामुळे या स्थितीचा राजकीय लाभ घेण्यासाठी सुनाक यांनी मुदतपूर्व निवडणुकांची घोषणा केली असावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

पंतप्रधानपदावरील व्यक्तीचे स्वतःचे एक आकलन असते. ऋषी सुनाक हे गेली अनेक वर्षे ब्रिटनचे अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण पाहात आले आहेत. त्यामुळे त्यांनी वर्तमानातील स्थितीचा परामर्श घेऊन सहा महिने आधी निवडणुकांची घोषणा केल्याचे दिसत असले तरी ब्रिटनमधील राजकारण-समाजकारणाची दुसरी बाजूही लक्षात घेणे गरजेचे आहे.

अलीकडेच ब्रिटनमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये आणि महत्त्वाच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी हुजूर पक्षाची पीछेहाट झाली आहे. पंतप्रधान ऋषी सुनाक यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. ब्रिटनमधील विरोधी पक्ष असणार्‍या मजूर पक्षाने म्हणजेच लेबर पार्टीने या स्थानिक निवडणुकांमध्ये निर्णायक आघाडी घेतली आहे. हुजूर पक्षाकडून मजूर पक्षाकडे तब्बल 26 टक्के मते गेली असल्याचे मतमोजणीतून समोर आले असून ब्रिटनमध्ये 1945पासून झालेल्या पोटनिवडणुकांमधील हा तिसर्‍या क्रमांकाचा मतदार बदल मानला जात आहे.

मजूर पक्षाचे नेते किअर स्टार्मर यांनी या विजयानंतर आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सत्तांतर होणार असे भाकीत वर्तवले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हुजूर पक्षाने 11 पैकी 10 शहरांमधील सत्ता गमावली असून त्यांच्या नगरसेवकांची संख्या तब्बल 470 ने घटली आहे. यापूर्वी पक्षाचे एक हजार नगरसेवक होते. दुसरीकडे, सुनाक यांचा तडकाफडकी निवडणुका जाहीर करण्याचा निर्णय हुजूर पक्षातील सदस्यांनाही रुचलेला नाहीये. परिणामी, या निवडणुकीपूर्वी पक्षाच्या 78 खासदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यात कॅबिनेट मंत्री मायकेल गोव्ह आणि अँड्रिया लीडसम या मोठ्या नावांचाही समावेश आहे. या दोघांनीही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. माजी पंतप्रधान थेरेसा यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. इतकेच नाही तर माजी संरक्षण मंत्री बेन वॉलेस यांनी आघाडीचे राजकारण सोडण्याचा निर्णय आधीच जाहीर केला आहे.

ही सर्व परिस्थिती पाहता ऋषी सुनाक यांना या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शक्यतेला आणखी बळकटी मिळाली आहे ती ब्रिटनमधील सर्वेक्षणांनी. ब्रिटन, अमेरिकेसारख्या देशांमध्ये अशा सर्वेक्षणांना शास्त्रीय आधार असतो आणि त्यांचे राजकारणात महत्त्वही काहीसे वेगळे असते. ब्रिटनमधील एका संस्थेच्या सर्वेक्षणानुसार जुलै महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीत हुजूर पक्षाचा धुव्वा उडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तीन अंकी जागांवर विजय मिळवणे कसेबसे या पक्षाला शक्य होईल, असे हे सर्वेक्षण दर्शवते. दुसरीकडे मजूर पक्षाला 650 जागांपैकी तब्बल 468 जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे ऋषी सुनाक यांंचा राजकीय डाव यशस्वी होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रिटनमध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्ष आणि लेबर पार्टीमध्ये सुनाक यांचा सामना मजूर पक्षाचे नेते सर केयर स्टारमर यांच्यात होत आहे. केयर स्टारमर हे इंग्लंडमधील सार्वजनिक अभियोगांचे माजी संचालक आणि एप्रिल 2020 पासून मजूर पक्षाचे नेते आहेत. अनेक ओपिनियन पोलमध्ये लेबर पार्टी सुनाक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षापेक्षा खूप पुढे आहे. तथापि कंझर्व्हेटिव्ह आणि लेबरनंतर स्कॉटिश नॅशनल पार्टी, लिबरल डेमोक्रॅटस् आणि डेमोक्रॅटिक युनियनिस्ट पार्टी हे ब्रिटनमधील तीन सर्वात मोठे पक्ष आहेत.

लोकप्रियता ही कोणत्याही नेत्याची सर्वात मोठी ताकद असते. यामुळे त्यांना जनमतावर प्रभाव पाडता येतो, त्यांच्या अजेंड्याला पाठिंबा मिळवता येतो आणि निवडणुका जिंकता येतात. नेते अनेकदा त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेतात. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 मधील पाकिस्तानबरोबरच्या युद्धातील विजयानंतरची वाढती लोकप्रियता आणि बांगलादेश मुक्ती युद्धातील यशानंतर नियोजित तारखेच्या जवळपास वर्षभर आधी निवडणुका घेण्याची घोषणा केली होती. ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनाक यांनीही तोच कित्ता गिरवल्याचे दिसत आहे. कमी झालेली महागाई, स्थलांतरितासंदर्भातील निर्णय, अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्याचे प्रयत्न यांमुळे जनतेला मिळालेला काहीसा दिलासा मतात परावर्तित होईल असा त्यांचा अंदाज आहे. परंतु ग्रेट ब्रिटनमधील केवळ 18 टक्के लोकांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी ऋषी सुनाक यांना पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सुनाक यांचा गेम प्लॅन फसणार की यशस्वी होणार हे येणारा काळच सांगेल.

भारताच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास मूळ भारतीय वंशाची व्यक्ती पुन्हा इंग्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान होणे ही भावनिकतेच्या दृष्टीने आपली इच्छा असणे स्वाभाविक आहे. ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तींचीही तीच धारणा असण्याची शक्यता आहे. त्या पलीकडे परराष्ट्र संबंधांच्या दृष्टीनेही याला एक वेगळे महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऋषी सुनाक यांच्यातील पर्सनल केमिस्ट्री चांगली असल्याचे दिसून आले आहे. याचा फायदा असा झाला की, गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या मुक्त व्यापार कराराच्या चर्चा परिणामकारकतेच्या दिशेने पुढे गेल्या होत्या. किंबहुना भारतातील निवडणुका लांबणीवर पडल्या असत्या तर कदाचित हा करार पूर्णही झाला असता, असे काहींचे म्हणणे होते.

हा मुक्त व्यापार करार दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण असून भारतामध्ये त्या माध्यमातून मोठी आर्थिक गुंतवणूक होणार आहे. त्यातून रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. तसेच ब्रिटनची बाजारपेठ खुली झाल्याने आपल्या निर्यातीला चालना मिळणार आहे. त्यादृष्टीने विचार करता हुजूर पक्षाचा या निवडणुकीत विजय होणे भारतासाठी आवश्यक आहे. कारण मजूर पक्षाची या कराराविषयीची धारणा काहीशी वेगळी असल्याने ते या कराराचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास चार पावले पुढे आलेली या कराराची चर्चा आठ पावले मागे जाऊ शकते. अर्थात भारताचा जागतिक राजकारणातील वाढता प्रभाव आणि आपली 140 कोटी लोकसंख्या असणारी बाजारपेठ यांमुळे ब्रिटनमध्ये सत्तेत येणार्‍या कोणत्याही पक्षाला या कराराबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण ब्रेक्झिटनंतर इंग्लंड जगभरात नव्या बाजारपेठांच्या शोधात आहे. त्यादृष्टीने भारतासोबतचा हा करार पूर्णत्वाला नेण्याची अपरिहार्यता तेथील नव्या सरकारसाठी असेल. जर मजूर पक्षाने निवडणूक जिंकली तर केयर स्टारमर पंतप्रधान होऊ शकतात. ऋषी सुनाक यांना आपल्या अडीच वर्षांतील कामगिरीवर निवडणूक जिंकण्याची आशा आहे. परंतु 'द टेलिग्राफ' या ब्रिटिश वृत्तपत्राने म्हटल्यानुसार मुदतीपूर्वी निवडणुकांची घोषणा करून ऋषी सुनाक यांनी एक मोठा डाव खेळला आहे. तो अंगलट येतो की यशस्वी होतो, याचे उत्तर 5 जुलैनंतर समोर येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news