John Ternus Apple CEO | नेतृत्वाचे नवे युग

Tim Cook
Tim Cook
Published on
Updated on

गणेश काळे, संगणकतज्ज्ञ

तंत्रज्ञान विश्वातील महाकाय कंपनी असलेल्या ‘अ‍ॅपल’ने नुकतीच आपल्या नेतृत्व बदलाची घोषणा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या दीड दशकापासून अ‍ॅपलला जागतिक बाजारपेठेत सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवणारे टिम कूक आता मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून पायउतार होत असून, त्यांच्या जागी जॉन टर्नस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही एका नव्या युगाची नांदी मानली जात आहे.

कॉर्पोरेट जगतामध्ये टीम लीडर बदलणे ही बाब सामान्य असते. अलीकडील काळात कंपनीचे सीईओही वरचेवर बदलत असल्याचे दिसून आले आहे. असे असताना ‘अ‍ॅपल’च्या टीम कूक यांच्या निवृत्तीची आणि त्यांच्या जागी आलेल्या जॉन टर्नस यांची इतकी चर्चा होण्याचे कारण काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे; पण त्याचे प्रमुख कारण म्हणजे,अ‍ॅपल या महाकाय कंपनीचा अवाढव्य पसारा आणि तो निर्माण करण्यामध्ये टीम कूक यांनी दिलेले योगदान. अ‍ॅपल ही जगातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली तंत्रज्ञान कंपनी असून तिची स्थापना दि. 1 एप्रिल 1976 रोजी स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझ्नियाक आणि रोनाल्ड वेन यांनी केली. आज ही कंपनी केवळ आयफोनसाठीच नाही, तर मॅक कॉम्प्युटर, आयपॅड, अ‍ॅपल वॉच आणि विविध सॉफ्टवेअर सेवांसाठी जागतिक स्तरावर ओळखली जाते. आर्थिक कामगिरीच्या बाबतीत अ‍ॅपलने नवे विक्रम प्रस्थापित केले असून 2025 च्या आर्थिक वर्षात कंपनीची वार्षिक उलाढाल 416 अब्ज डॉलर्स इतकी नोंदवण्यात आली होती.

चालू वर्षीच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 143.8 अब्ज डॉलर्सचा विक्रमी महसूल मिळवला असून त्यात आयफोन विक्रीचा वाटा सर्वाधिक म्हणजेच 85.3 अब्ज डॉलर्स इतका आहे. आज जगभरातील 27 हून अधिक देशांमध्ये अ‍ॅपलचे 540 पेक्षा जास्त स्वतःचे रिटेल स्टोअर्स अर्थात आऊटलेटस् आहेत. सध्या जगभरात अ‍ॅपलची 2.5 अब्जांहून अधिक सक्रिय उपकरणे वापरली जात आहेत. 2011 मध्ये ज्यावेळी स्टीव्ह जॉब्ज यांच्या निधनानंतर टिम कूक यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली, तेव्हा त्यांच्यासमोर एक उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा वारसा पुढे नेण्याचे मोठे आव्हान होते. तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक दिग्गजांना कूक हे आव्हान पेलू शकतील की नाही, अशी शंका होती; मात्र मागील 14 वर्षांच्या काळात कूक यांनी केवळ स्वतःला सिद्धच केले नाही, तर अ‍ॅपलला अशा उंचीवर नेऊन ठेवले की, जिथे पोहोचणे कोणत्याही कंपनीसाठी स्वप्नवत आहे. वयाच्या 65 व्या वर्षी टिम कूक यांनी आता निवृत्तीची घोषणा केली असून, येत्या सप्टेंबर महिन्यात ते आपले पद सोडणार आहेत. त्यांच्या जागी जॉन टर्नस हे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून धुरा सांभाळणार आहेत, तर कूक हे ‘एमेरिटस’ म्हणजेच कार्याध्यक्ष म्हणून मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहतील.

टिम कूक यांची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे, त्यांनी अ‍ॅपलमध्ये राबवलेली वारसा हक्क प्रक्रिया. कॉर्पोरेट विश्वात अनेकदा मोठ्या नेत्यांच्या निवृत्तीनंतर कंपन्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते; परंतु कूक यांनी अत्यंत शांतपणे आणि नियोजित पद्धतीने ही प्रक्रिया राबवली आहे. स्टीव्ह जॉब्स हे एक दूरद़ृष्टी असलेले निर्माते होते, तर टिम कूक हे एक निष्णात व्यवस्थापक ठरले. जॉब्स यांच्या काळात अ‍ॅॅपलचे बाजारमूल्य 350 अब्ज डॉलर्स होते; पण कूक यांच्या कार्यकाळात ते तब्बल 3.9 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले. जगातील पहिली 1 ट्रिलियन आणि त्यानंतर 2 ट्रिलियन डॉलर्सची कंपनी बनण्याचा मान अ‍ॅपलला कूक यांच्या नेतृत्वाखालीच मिळाला. त्यांनी केवळ उत्पादनांवर लक्ष केंद्रित न करता कंपनीच्या पुरवठा साखळीत आणि आर्थिक नियोजनात केलेल्या बदलांमुळेच अ‍ॅपल आज 50 वर्षांची होऊनही अधिक मजबूत स्थितीत उभी आहे.

जॉब्स हे त्यांच्या क्रांतिकारक कल्पनांसाठी आणि उत्पादनांच्या रचनेसाठी ओळखले जात, तर कूक यांनी त्यांच्या व्यावहारिक द़ृष्टिकोनातून अ‍ॅपलचा जागतिक विस्तार केला. त्यांनी केवळ आयफोनवर अवलंबून न राहता अ‍ॅपल वॉच, एअरपॉडस् आणि सेवा क्षेत्रातील (अ‍ॅप स्टोअर, आयक्लाऊड, अ‍ॅपल म्युझिक) महसूल वाढवण्यावर भर दिला. त्यांच्याच काळात अ‍ॅपलने उत्पादनासाठी चीनवरील अवलंबित्व कमी करून भारतासारख्या देशांत आपली पाळेमुळे घट्ट केली. कूक यांच्या काळात अ‍ॅपलने केवळ जुन्या उत्पादनांमध्ये सुधारणा करतानाच काही नवीन श्रेणीही यशस्वीपणे सादर केल्या. यामध्ये ‘अ‍ॅॅपल वॉच’चे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 2014 मध्ये सादर करण्यात आलेले हे घड्याळ आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय वेअरेबल डिव्हाईस बनले आहे. कूक यांनी बीटस् कंपनीचे केलेले अधिग्रहण हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात धाडसी निर्णयांपैकी एक मानले जाते. ‘अ‍ॅपल टीव्ही प्लस’ या स्ट्रीमिंग सेवेद्वारे कंपनीने हॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या शर्यतीत अ‍ॅपल मागे पडल्याची टीका अनेकदा झाली. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांनी जेव्हा एआयमध्ये मोठी गुंतवणूक केली, तेव्हा कूक यांनी सावध पवित्रा घेतला होता. त्यांनी घाई करण्याऐवजी ग्राहकांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षेला प्राधान्य देत ‘अ‍ॅपल इंटेलिजन्स’ सादर केले. तंत्रज्ञान हे केवळ दाखवण्यासाठी नसावे, तर ते लोकांच्या दैनंदिन जीवनात सुरक्षितपणे सामावून घेणारे असावे. येणार्‍या काळात जेव्हा एआयसज्ज एम-5 चिप्स बाजारात येतील, तेव्हा कूक यांची ही दीर्घकालीन रणनीती किती योग्य होती, हे स्पष्ट होईल. कूक यांच्या कार्यकाळात कंपनीचे बाजारमूल्य 350 अब्ज डॉलर्सवरून तब्बल 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पार गेले, जे कोणत्याही जागतिक कंपनीसाठी एक स्वप्नवत यश आहे. जॉन टर्नस यांच्यासमोरही आव्हानांचे मोठे डोंगर उभे आहेत. सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे तंत्रज्ञान जगाची दिशा ठरवत आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसारख्या कंपन्या एआय क्षेत्रात वेगाने पुढे जात असताना अ‍ॅपलला या शर्यतीत आपले वर्चस्व सिद्ध करावे लागेल.

एका महान नेत्याच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणे आणि कंपनीला यशाच्या शिखरावर नेणे, हेच टिम कूक यांचे सर्वात मोठे यश आहे. जॉन टर्नस यांच्याकडे सूत्रे सोपवताना कूक यांनी एक असा वारसा मागे ठेवला आहे, जो पुढील अनेक दशके तंत्रज्ञान विश्वावर आपली मोहोर उमटवत राहील. नवे सीईओ जॉन टर्नस हा अ‍ॅपलसाठी नवा चेहरा नाही. गेल्या 25 वर्षांपासून ते कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 1997 मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर 2001 मध्ये ते अ‍ॅपलमध्ये रुजू झाले. त्यांनी आयफोन, आयपॅड आणि मॅक यांसारख्या प्रमुख उत्पादनांच्या हार्डवेअर इंजिनिअरिंगचे नेतृत्व केले आहे. विशेषतः अ‍ॅपलच्या स्वतःच्या ‘एम-सीरिज’ चिप्स (अ‍ॅपल सिलिकॉन) विकसित करण्यात टर्नस यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. कूक यांच्या तुलनेत टर्नस हे उत्पादनांच्या तांत्रिक रचनेत अधिक खोलवर गुंतलेले आहेत. त्यामुळे त्यांना ‘द आर्किटेक्ट’ असेही म्हटले जाते.

टर्नस यांच्यासमोर भविष्यातील आव्हाने मोठी आहेत. सध्या संपूर्ण जग कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि प्रगत सॉफ्टवेअरच्या दिशेने वेगाने बदलत आहे. गुगल आणि मेटासारख्या कंपन्यांनी एआय क्षेत्रात मोठी झेप घेतली असताना अ‍ॅपलला या स्पर्धेत आपले स्थान टिकवून ठेवावे लागेल. तसेच, व्हिजन प्रोसारख्या नवीन उपकरणांना बाजारपेठेत यश मिळवून देणे आणि फोल्डेबल फोनच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देणे, ही टर्नस यांची मुख्य परीक्षा असेल. कूक यांनी कंपनीला आर्थिकद़ृष्ट्या स्थिर आणि अवाढव्य बनवले. आता टर्नस यांना स्टीव्ह जॉब्स यांच्या काळात असणारा तंत्रज्ञानातील नावीन्याचा जोश पुन्हा निर्माण करावा लागेल. त्यांची कार्यशैली ही कूक यांच्याप्रमाणेच शांत आणि संयमी मानली जाते. ते सहकार्‍यांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कूक यांनी टर्नस यांच्याबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढताना म्हटले आहे की, त्यांच्याकडे इंजिनिअरचे डोके आणि नावीन्यपूर्ण शोध लावणार्‍याचा आत्मा आहे. अ‍ॅपलसारख्या महाकाय जहाजाचे सुकाणू हाती घेतल्यानंतर टर्नस तंत्रज्ञान आणि व्यापार यांचा समतोल साधत अ‍ॅपलची मक्तेदारी कशी टिकवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आयफोनमध्ये एआयचा वापर कशाप्रकारे प्रभावीपणे करता येईल आणि वापरकर्त्यांचा अनुभव कसा बदलता येईल, हे टर्नस यांच्यासमोरील सर्वात मोठे तांत्रिक आव्हान असेल. याशिवाय, जागतिक राजकारणातील अस्थिरता आणि चीनसोबतचे व्यापार संबंध हेदेखील एक महत्त्वाचे आव्हान आहे. अ‍ॅॅपलचा बराचसा पुरवठा साखळीचा भाग चीनवर अवलंबून असल्याने इतर देशांमध्ये उत्पादनाचे पर्याय शोधणे आणि ते यशस्वी करणे, ही टर्नस यांच्यासाठी तारेवरची कसरत ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news