TikTok Star Khaby Lame | कंटेंटचा अवलिया

TikTok Star Khaby Lame
TikTok Star Khaby Lame | कंटेंटचा अवलिया
Published on
Updated on

महेश कोळी, संगणक अभियंता

जेव्हा जग कोरोना महामारीच्या अंध:कारात चाचपडत होते आणि टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगाराचे साधन हिरावले जात होते, तेव्हा इटलीतील एका कारखान्यात काम करणार्‍या सामान्य तरुणाने शांत राहून जागतिक कीर्तीचे शिखर गाठले. तो तरुण म्हणजे आजचा ‘टिकटॉक’ सुपरस्टार खाबी लॅम. कोणत्याही संवादाशिवाय, केवळ हाताच्या हालचालींतून आणि चेहर्‍यावरील मिश्कील हावभावातून जगभरातील कोट्यवधी चाहत्यांना खळखळून हसवणारा हा अवलिया सध्या एका अवाढव्य करारामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. हाँगकाँगस्थित ‘रिच स्पार्कल होल्डिंग्ज’ या कंपनीने खाबी लॅमशी संबंधित ‘स्टेप डिस्टिंक्टिव्ह लिमिटेड’ ही कंपनी विकत घेतल्याची घोषणा केली असून, या व्यवहाराचे मूल्य सुमारे 8,900 कोटी रुपये इतके प्रचंड आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या ‘कंटेंट क्रिएटर इकॉनॉमी’ एक अत्यंत शक्तिशाली स्तंभ म्हणून उभी राहिली आहे. 2026 च्या सुरुवातीला या क्षेत्राचे मूल्य 250 अब्ज डॉलर्सच्या (सुमारे 20 लाख कोटी रुपये) पार गेले असून, सोशल मीडिया हे आता केवळ मनोरंजनाचे साधन न राहता गुंतवणुकीचे एक महाकाय व्यासपीठ बनले आहे. ‘यूट्यूब’, ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘टिकटॉक’ यासारख्या प्लॅटफॉर्ममुळे सामान्य तरुणांना जागतिकस्तरावर ‘ब्रँड’ होण्याची संधी मिळाली आहे. आजच्या काळात जाहिरातदार पारंपरिक माध्यमांपेक्षा या डिजिटल तार्‍यांवर अधिक विश्वास दाखवत आहेत; कारण त्यांच्याकडे कोट्यवधीचा प्रेक्षकवर्ग आणि थेट संवाद साधण्याची ताकद आहे. अशाच एका जागतिक लाटेवर स्वार होऊन यशाची नवी व्याख्या लिहिणारा चेहरा म्हणजे खाबी लॅम.

जगात सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा ‘टिकटॉक कंटेट क्रिएटर’ म्हणून सेरिंगेखाबाने लॅम ऊर्फ खाबी लॅम याची ओळख आहे. त्याला ‘टिकटॉक किंग’ असेही म्हटले जाते. खाबीचे ‘टिकटॉकवर 16 कोटींपेक्षा अधिक, तर इन्स्टाग्रामवर सुमारे आठ कोटी फॉलोअर्स आहेत. अमेरिकेच्या विल स्मिथसारखा अभिनेता बनण्याची इच्छा बाळगणारा खाबी फुटबॉलचा कमालीचा चाहता आहे. त्याला लिहिण्याचीदेखील हौस आहे. अलीकडेच खाबीशी संबंधित एका वृत्ताने सोशल मीडिया विश्वात एका बातमीने खळबळ उडवून दिली. हाँगकाँगस्थित ‘रिच स्पार्कल होल्डिंग्ज’ या कंपनीने खाबी लॅमशी संबंधित ‘स्टेप डिस्टिंक्टिव्ह लिमिटेड’ ही कंपनी विकत घेतल्याची घोषणा केली. या व्यवहाराचे मूल्य 975 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 8,900 कोटी रुपये इतके प्रचंड असल्याने, खाबी एका रात्रीत अब्जाधीश झाल्याच्या आणि त्याने वयाच्या 25 व्या वर्षी निवृत्ती घेतल्याच्या चर्चा रंगल्या. या कराराचे स्वरूप गुंतागुंतीचे असले, तरी यामुळे खाबीचे नाव जगभरातील माध्यमांमध्ये चर्चेत आले.

खाबी लॅमचा जीवन प्रवास अतिशय रंजक आणि उद्बोधक आहे. सहा वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीमध्ये त्याच्या यशाची बीजे दडलेली आहेत. त्याकाळी संपूर्ण जग ठप्प झाले होते. अशा काळात उत्तर इटलीच्या एका कारखान्यात काम करणार्‍या एका साधारण तरुणाला नोकरीवरून काढून टाकले जाते. उत्पन्नाचा मार्ग बंद झाल्याने पुढे काय करावे, हे त्याला काहीच सुचत नव्हते; पण त्याच्याकडे असणारे एक कौशल्य लॉकडाऊनचा सामना करणार्‍या कोट्यवधी लोकांकडे नव्हते. ते म्हणजे त्याच्याकडे एक वेगळी अभिनयशैली होती. या गुणवैशिष्ट्याचा वापर करून पाहण्याचे खाबीने ठरवले. यासाठी त्याने एकदा खोलीत पडलेला मोबाईल उचलला आणि अवघड ‘लाईफ हॅक्स’ व्हिडीओचे अतिशय सोप्या पद्धतीने विडंबन करण्यास सुरुवात केली. ‘लाईफ हॅक्स’ ही एक लोकप्रिय शैली असून, ती वापरकर्त्यास काम करण्याच्या टिप्स सांगण्याच्या नावावर गोंधळ निर्माण करते. त्या तरुणाने आवाज न करता केवळ हावभावावर व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली. तो काही न बोलता अवघड ‘लाईफ हॅक्स’ची खिल्ली उडवत हात मोकळे ठेवून ‘हे इतकं सोपं आहे ना’ असे म्हणत व्हिडीओ समाप्त करायचा. त्या तरुणाचे मौन हीच त्याची शक्ती ठरली. या बळावरच हा कारखान्यातील मजूर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारा टिकटॉक स्टार बनला. आज त्याची ओळख जगप्रसिद्ध इन्फ्लूएन्सर सेरिंगेखाबाने लॅम अशी करून दिली जाते. जगभरात त्याचे व्हिडीओ चाहते मोठ्या आवडीने पाहतात. त्याला प्रेमाने ‘टिकटॉकचा राजा,’ असेही म्हणतात. अलीकडेच त्याने एका कंपनीसमवेत केलेला 8,900 कोटी रुपयांचा करार हा कोणत्याही कंटेंट क्रिएटरने केलेल्या करारांमधील सर्वात मोठा मानला जात आहे.

प्रारंभिक आयुष्य

खाबी लॅमचा जन्म 9 मार्च 2000 मध्ये सेनेगल येथे झाला. तो एक वर्षाचा असताना त्याचे कुटुंबीय इटलीत आले आणि ट्युरिनजवळील चिवासो येथे राहू लागले. खाबीचे प्राथमिक शिक्षण इटलीच्या स्थानिक शाळेत झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने काही काळ मदरशातही अभ्यास केला. कालांतराने त्याने एका कारखान्यात सीएनसी मशिन ऑपरेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. शिवाय, लहानसहान नोकर्‍यादेखील केल्या. विशेष म्हणजे, दोन दशकांपेक्षा अधिक काळ इटलीत वास्तव्य केल्यानंतर त्याला 2022 मध्ये नागरिकत्व मिळाले. ऑक्टोबर 2020 मध्ये त्याने जायरा नुची नावाच्या एका इन्फ्लूएन्सरशी साखरपुडा केला. मात्र, हे संबंध पुढे जाऊ शकले नाहीत. त्यानंतर लॅम याने मॉडेल वेडी थेम्बेहिले जुएलशी नोव्हेंबर 2023 मध्ये विवाह केला. मात्र, हा विवाहदेखील सहा महिनेच टिकला.

खाबी हा केवळ कॉमेडी स्टार नाही, तर व्यक्तिश: अत्यंत साधा आणि सरळ आहे. पहिल्या कमाईतून त्याने सातजणांच्या कुटुंबासाठी मोठे घर घेतले, जेणेकरून सर्वजण एकत्र राहतील. तो ‘युनिसेफ’चा सदिच्छादूतही आहे. तसेच, मुले आणि तरुणांना स्वप्ने पाहणे आणि आव्हानांचा मुकाबला करणे यासाठी प्रेरणा देतो.

अमेरिकेत वास्तव्य करण्याचे स्वप्न

अमेरिकेत वास्तव्य करणे हे त्याचे स्वप्न आहे. तो अमेरिकी अभिनेता आणि रॅपर विल स्मिथसारखा होऊ इच्छितो. याशिवाय एडी मर्फीलादेखील तो आदर्श मानतो. त्याचे ‘टिकटॉक’वर 16 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. याशिवाय, इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सची संख्यादेखील विक्रमी आहे. खाबीला चित्रपट पाहण्याची आवड आहे. फावल्या वेळात तो व्हिडीओ गेम खेळणे, लेटेस्ट फॅशन किंवा मॉडेलिंग ट्रेंडस्सह अपडेट राहतो आणि हा त्याच्या जीवनशैलीचा भाग आहे. शाळेत असताना फुटबॉल आणि बास्केटबॉलची आवड जोपासली. फुटबॉलचा तो जबरदस्त चाहता आहे. या कारणामुळे तो त्याच्या व्हिडीओत अनेकदा फुटबॉलसारखीच जर्सी घातलेला दिसतो. त्याचा आवडीचा संघ जुवेंटस् एफसी आहे. त्याला कार्टून पाहणे आणि मंगा (जपानी कॉमिक्स) वाचणेदेखील आवडते. लॅमला लिहिण्याचादेखील छंद आहे. तो सध्या एका चित्रपटासाठी कथादेखील लिहीत आहे.

अमेरिकेत राहण्याच्या प्रेमापोटी त्याला काही वेळ तुरुंगाचीदेखील हवा खावी लागली आहे. सहा जून 2025 मध्ये खाबी लॅम यास व्हिसा कालावधीची मर्यादा ओलांडल्याच्या कारणावरून यूएस इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंटच्या (आयसीई) अधिकार्‍यांनी लास वेगास येथे ताब्यात घेतले. नंतर त्यास स्वच्छेने देश सोडण्याची परवानगी देण्यात आली. शेवटी त्याने अमेरिका सोडली. तो इटालियन भाषेत निष्णात आहे. शिवाय, इंग्रजी, स्पॅनिश, वोलोफ (सेनेगलची भाषा) देखील बोलतो. तो पोर्तुगाली भाषा मोडक्यातोडक्या शब्दांत बोलतो; पण त्याच्याकडे सादरीकरणाची आणि अभिनयाची जी अजोड शैली आहे आणि ती जपण्यासाठी, खुलवण्यासाठी तो ज्या प्रकारची अपार मेहनत करतो, त्यातूनच आज त्याला जागतिक कीर्ती लाभली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news