क्रिकेटच्या प्रभावाचा गावगाडा

क्रिकेटच्या प्रभावाचा गावगाडा

'तेंडल्या' हा सिनेमा म्हणजे गोष्ट कशी सांगावी याचा आदर्श वस्तुपाठ. अप्रतिम कथनशैली. सर्वात लाखमोलाचा गुण म्हणजे सहजता. माणसं जशी आहेत तशी भेटतात. 'तेंडल्या'मध्ये भेटतो तो क्रिकेटच्या प्रभावाचा गावगाडा. या गावगाड्याच्या तपशिलाचा भरगच्च पसारा. तो सहज नजाकतीनं मांडलाय. तो स्तंभीत करतो. त्याच्या गुंतवळीत जीव पार गुंतून जातो.

सध्या अनेक विषयांवर मराठी चित्रपट झळकत आहेत. त्यांची संख्याही लक्षणीय आहे. नानाविध विषय ते कथनशैलीचे प्रयोग, असा प्रवास सुरू आहे. अनेक शक्यता ते आजमावताना दिसतात. काही वेळा नालेसाठी आणला घोडा… या म्हणीप्रमाणं प्रयोग, शैली, आकृतिबंधासाठी आशयाची फरफट होताना दिसते. अशावेळी गोष्टीवरचा झोत भलतीकडंच लोंबकळत राहतो. आश्वासकता अशी की, तरुणांची मांदियाळी अभ्यासपूर्ण निर्मिती करत आहे. लघुपटापासून चित्रपटापर्यंत सर्व प्रकार ते सक्षमतेनं हाताळत आहेत.

काही वर्षांपूर्वी मराठी चित्रपट पाहायला जायचं म्हणजे पोटात गोळा यायचा. कारण काय? तर शंभरातलं दोन-चार सोडलं तर बाकी चित्रपट म्हणजे आनंदी-आनंदच. अलीकडंच एक चित्रपट झळकून गेला. 'रौंदळ.' 'रौंदळ' म्हणजे नष्ट करणं. पार सुपडासाफच राव. आता काय-काय नष्ट करायचं? साखर कारखानदाराची हत्या करायची. विषयच संपला. किती सोपा मार्ग आहे ना? विषय संपवायचा? महाराष्ट्रातील तमाम ऊस उत्पादकांचं प्रश्न कसं सुटतील? तर चुटकीसरशी. सेकंदाचं काम. एक तर साखर कारखानदाराची हत्या करायची; नाही तर सरळ कारखान्यावर बॉम्बच टाकायचा. मग, आमचा ऊस कोणत्या इष्टस्थळी म्हणजे कोणत्या कारखान्यात घालवायचा? असलं प्रश्न पडू द्यायचं नाहीत. प्रश्न पडू लागलं की, भेजा शोर करता है… त्यामुळं रौंदळ करा… नष्ट करा. ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर भाष्य करणारा हा चित्रपट. त्याविषयी बरंच कायबाय बोललं गेलं.

चित्रपटानं एखाद्या प्रश्नाची सर्वंकष मांडणी करावी. इतकं केलं तरी खूप झालं. उत्कृष्ट कलाकृतीनं म्हणजेच चित्रपटानं उत्तराचं किमान सूचन केलं, तरी आणखी खूप झालं. छान गोष्ट, छान पद्धतीनं सांगावी. गोष्टीच्या गुंतवळीत रसिकाचा जीव कसा गुंतेल ते बघावं. घरातल्या सामानाची यादी करताना किती बारीकसारीक जिन्नस आपण लिहून काढतो; मग चित्रपट लिहिताना का नाही असा विचार होत? परवा 'फुलराणी' पाहिला. चित्रपट कसा लिहू नये, याचा आदर्श वस्तुपाठच. गोष्ट सांगायची सोडून आमचं मराठी चित्रपटवालं मास्तरकीच करतात, तीही दांडगी. पब्लिकच्या धडावर डोकं असतं, त्यानलाबी कळतं. ते चांगला विचार करू शकतात, हे यांच्या गावीही नसतं. प्रबोधनाचा दांडगा सोस. कोटस्, सुविचारांचा स्फोटच.

अनेक मराठी चित्रपटांतील कंटाळवाणी मास्तरकी बोअर करून सोडते. त्यामुळं त्यांना पब्लिकची वाट बघत बसावं लागतं. एका चित्रकर्मीनं पन्नासच्या घरात चित्रपट काढलं. ना शेंडा-ना बुडका. त्यांच्या कैक चित्रपटांत प्रबोधनाबरोबच असते ती कवितांची प्रचंड दगडफेक. उदाहरण पाहू. 'गोदाकाठ'… टोकाच्या चंगळवादी जीवनशैलीमुळं आत्मनाशाच्या वाटेवरील तरुणीला आत्मभान येतं… ती निसर्गात रमते… चंगळवादाला रामराम करते… कॉर्पोरेट जगताचा तिला तिटकारा आलेला असतो… रोज रोज नशापान तरी किती करायचं? कॉर्पोरेट जगात काय असतं, याचा तर्काधिष्ठित कोणताही तपशील चित्रकर्मी देत नाहीत. निसर्गाला सामोरा जात जगणार्‍या सामान्यांच्या जीवनशैलीचीही हीच तर्‍हा. ना समस्येचा उभा-आडवा छेद, ना उत्तराचा पसारा. केवळ आणि केवळ कविताच कविता. निसर्गाची हानी इतका एकच पैलू घेऊन 'गोदाकाठ'चा पसारा उभा करता आला असता; पण नाही. धड ना अय्याशी जीवनाचा पट, धड ना निसर्गाशी एकरूप सामान्याचा जीवनपट. न पटणारी भैरवी म्हणजे या दोन जीवनशैलींचं झालं म्हणं एकजीव रसायन. प्रश्नांची सोपी मांडणी, सोपी सुटसुटीत उत्तरं.

बहुतेक चित्रपटांच्या स्टोरी टेलिंगची ही व्यथा. मुदलातच मोठा खोडा. 'श्वास' चित्रपट आल्यावर मराठी चित्रपटांनी कात टाकल्याची आवई उठवली गेली. खरं तर नानाविध विषयांवरील चित्रपट येऊ लागलेले इतकेच. नानाविध विषय आणि दर्जा याची गल्लत केली गेली ती बोरू आणि दांडके बहाद्दरांकडून. उदाहरणं कैक देता येतात; पण या गोष्ट सांगण्याच्या कलेचीच म्हणजेच पटकथेचीच पंचाईत असलेल्या प्रपाताला छेद दिला तो 'सैराट'नं. गोष्टीविषयी मतभेद असू शकतात; पण उन्मादी जाणिवेच्या 'सैराट'नं …सौ सुनार की एक लोहार की… म्हणतात तसा हातोडा घातला. भाषेपासून कैक प्रकारचं हातोडं. त्यानंतर निर्मितीच्या वर्तुळाच्या बाहेरील लोकांची निर्मितीही झळकू लागली. त्यांनी त्यांच्या गोष्टी त्यांच्या व्याकरणासह आणल्या. जे लोकसमूहाला भावू लागलं. गोष्ट आणि रसिकांचं मेतकूट जमू लागलं. असंच एक उत्तम मेतकूट जमलेला ताजा चित्रपट म्हणजे 'तेंडल्या.'

'तेंडल्या.' गोष्ट कशी सांगावी याचा आदर्श वस्तुपाठ. अप्रतिम कथनशैली. चला, मी अभिनय करून दाखवतो आणि तुम्हाला गोष्ट दावतोच असली भंपकगिरीच नाही. सर्वात लाखमोलाचा गुण म्हणजे सहजता. पाण्यासारखं वाहत राहणं. पोहण्यात नाही आव. माणसं जशी आहेत तशी भेटतात. गोष्ट आपल्यासमोर घडते. सर्वप्रकारचा अस्सलपणा घेऊन. भलत्याच प्रमाण भाषेचा दहशतवाद नाही. हीच गुणसंपदा 'सैराट'मध्ये होती. फोटो काढायचा म्हटलं तरी हरेक जाणिवा तेजतर्रार होतात. त्यामुळं चित्रभाषेचं आव्हान मोठं असतं. 'सैराट', 'तेंडल्या'सारख्या चित्रपटात 'काशीनाथ घाणेकर' स्टाईल नाही. गावाकडच्या गोष्टींची गावाकडच्या पद्धतीनंच गळाभेट.

'तेंडल्या'मध्ये भेटतो तो क्रिकेटच्या प्रभावाचा गावगाडा. या गावगाड्याच्या तपशिलाचा भरगच्च पसारा. तो सहज नजाकतीनं मांडलाय. तो स्तंभीत करतो. त्याच्या गुंतवळीत जीव पार गुंतून जातो. नाहीतर सध्या क्रीएटिव्ह दिग्दर्शकांचा सुळसुळाट झालेला आहे. हरेकाला अजय देवगणसारख्या 'सिंघम'ची पेशकश करायची आहे. गणितं सारी आर्थिक असतात महाराजा, असू द्या. गाव म्हणजे काय? गावकी म्हणजे काय? गावगाडा म्हणजे काय? गावाकडची बेरकी, इब्लीस माणसं म्हणजे काय? यासारखं सारंसारं 'तेंडल्या'मध्ये चिमटीत छान पकडून मांडलंय. आशयाची धमणी विलक्षण नजाकतीनं पकडली आहे. हरेक प्रसंग आशय समृद्ध करत एका उंचीवर घेऊन जातो. आपण इराणचाच एखादा चित्रपट पाहतो आहोत की काय, असं वाटत राहतं. आपण या गावगाड्याचा एक भाग बनून या गावात जातो. मराठी चित्रपटांमध्ये भूगोलाचा पत्ताच गायब झालेला काळही आपण पाहिला. आठवा अशोक आणि लक्षाच्या विनोदी चित्रपटांची लाट. मराठी चित्रपटात भूगोल दाखवा आणि हजार रुपये मिळवा, अशी अवस्था.

'तेंडल्या'मध्ये क्रिक्रेट प्रेमानं वेड्या झालेल्या जीवांची गोष्ट भेटते. अपवाद वगळता सर्व नवोदित मंडळींची ही पहिलीच निर्मिती. तरीही पहिलेपणाच्या कोणत्याही खाणाखुणा भेटत नाहीत. या गोष्टीत निसरड्या वाटा अनेक होत्या; पण तेथे चित्रकर्मींनी विलक्षण संयमानं रस्ता पकडलाय. आशयाला कोठेही भरकटू न देता, बरबटू न देता चित्रभाषेचा विलक्षण प्रभावी वापर केलेला आहे. मराठीच काय, कैक हिंदी चित्रपटांतही लहान मुले ही अकाली प्रौढत्व आल्यासारखी बरळतात. 'तेंडल्या'मध्ये तर लहान मुलांची फौजच भेटते. वयसुलभ वागणारी फौज. या फौजेनं इतकी धमाल उडवली आहे की, चित्रपट पुन्हा, पुन्हा पाहावा वाटेल. मुलांची सहजता, त्यांचं बोलणं बोलणंच वाटतं, ते वाटत नाहीत कादरखानी डॉयलॉग्ज. भरतवाक्य काय तर 'तेंडल्या' थिएटरात जाऊन पाहायला पाहिजे इतका झकास झालाय.

-सुरेश गुदले

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news