Indian cricketers tribute: शूरा मी वंदिले!

यंदा विजयश्रीचे हे वंदन सूर्यकुमार व त्याच्या सहकारी शूरवीरांसाठीचे होते.
Indian cricketers tribute: शूरा मी वंदिले!
Published on
Updated on
विवेक कुलकर्णी

जगात सुगंध आणि सूर या दोनच गोष्टी अशा आहेत, ज्या सिद्ध करायला मध्यस्थाची गरज भासत नाही, असे ‌‘पुल‌’नी लिहून ठेवलंय. यंदाच्या आयसीसी टी-20 विश्वचषक विजयाने जणू तेच अधोरेखित केले. यंदा एकवेळ तर आपण सेमीफायनलसाठी तरी पात्र होतो की नाही, असाच प्रश्न होता; पण विजयश्री नेहमी शुरांना वंदन करते. यंदा विजयश्रीचे हे वंदन सूर्यकुमार व त्याच्या सहकारी शूरवीरांसाठीचे होते.

सब्र कभी मत खो ना, क्योंकि हर बडी कामयाबी वक्त माँगती है.... संजू सॅमसनच्या बाबतीत ही शेरोशायरी अगदी तंतोतंत लागू पडते. 2024 मध्ये टी 20 क्रिकेटमध्ये हैदराबादेत शतक झळकावणाऱ्या सॅमसनने पुढे केवळ पाच आठवड्यांच्या कालावधीत दरबान, जोहान्सबर्गमध्येदेखील धावांचा धडाका कायम ठेवला होता; पण जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध 5 डावांत जेमतेम 46 धावांमध्येच तो गारद होत गेला आणि नंतर त्याला प्लेईंग इलेव्हनमधली जागा गमवावी लागली. आश्चर्य म्हणजे, त्यावेळी प्रशिक्षक गौतम गंभीर सांगायचे, नेटस्‌‍मध्ये संजू सॅमसनचे फटके अगदी घोटवल्यासारखे लागतात. याचाच अर्थ प्रत्यक्ष लढतीत तो कच खात होता. अशावेळी गरज होती ती संघ व्यवस्थापनाने त्याच्या पाठीशी उभे राहण्याची! संघ व्यवस्थापन पाठीशी उभे राहिले आणि सॅमसनने शेवटच्या 3 निर्णायक लढतींत याचे चीज करून दाखवले. प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू असतो, हेच जणू अधोरेखित झाले.

स्पर्धेच्या सुरुवातीला अगदी पहिल्या अकरातही नसलेल्या या धुरंधराने स्पर्धा संपेतोवर आपला स्वत:चा नवा बेंचमार्क प्रस्थापित केला होता. व्हिव रिचर्डसची 79 धावांची खेळी, मोहिंदर अमरनाथची 83 धावांची खेळी, अरविंद डीसिल्वाची 96 धावांची खेळी या मांदियाळीत संजू सॅमसन आपल्या 89 धावांच्या खेळीसह अगदी सन्मानाने दाखल झाला.

अभिषेक शर्माचीही बातच न्यारी! तीन वेळा शून्यावर बाद, एकदा 15 धावांवर बाद; पण तरीही संघ व्यवस्थापन त्याच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यानेही निर्णायक बाद फेरीतील लढतीत त्याच्यावरील विश्वास सार्थ करून दाखवला. न्यूझीलंडविरुद्ध निर्णायक फायनलमधील त्याची झंझावाती खेळी प्रतिस्पर्ध्यांसह टीकाकारांचीही तोंडे बंद करणारी ठरली. सुनील गावसकरांनी त्याला खूप मोलाचा सल्ला दिला होता, ‌‘अगदी पहिल्याच चेंडूपासून तुटून पडण्याची काहीच गरज नाही. थोडा वेळ खेळपट्टीवर थांब. धावा आपोआप होऊ लागतील.‌’ झालेही तसेच. अभिषेकने थोडा वेळ खेळपट्टीवर फक्त थांबून राहण्यावर भर दिला. सावध पवित्र्यावर भर दिला. काही चेंडू निर्धाव जाऊ दिले. नंतर मात्र तो सेट झाला. त्याची फटकेबाजी सुरू झाली. गावसकरांचा सल्ला त्याच्यासाठी अल्लाउद्दीनचा दिवा ठरला. पुढे चेंडू जणू त्याला फुटबॉलसारखा दिसू लागला. त्याने फटक्यांची मनमुराद लयलूट केली.

इशान किशन हादेखील आणखी एक जोशपूर्ण खेळाडू अर्धशतक झळकावण्यात यशस्वी ठरला आणि भारताने 270 धावांचा टप्पाही सहज सर होईल, असेच स्पष्ट संकेत दिले. आगेकूच जोरदार सुरू होती; पण याचवेळी एकाच षटकात सेट झालेल्या सॅमसन, इशानसह कर्णधार सूर्यादेखील आल्या पावली पॅव्हेलियनमध्ये परतला आणि धावांना अक्षरश: ब्रेक लागला. मधल्या 17 चेंडूंत तर भारताला अगदी साधा चौकारही मारता आला नव्हता; पण 8 चेंडूंत 26 धावा फटकावणाऱ्या दुबेचे थैमान मैदानावर आले आणि किवीज संघाच्या वर्चस्वाचा त्याने पालापाचोळा केला. भारताची धावसंख्या अडीचशे पार गेली.

किवीज ताफ्यात ॲलन फिनसारखा जगातील कोणत्याही गोलंदाजीच्या सहजपणे चिंधड्या उडवू शकणारा लढवय्या फलंदाज कोणत्याही क्षणी मुसंडी मारण्यासाठी सज्ज होता; पण त्याचा महत्त्वाचा अडसर प्रारंभीच दूर झाला. बुमराहने 4, तर अक्षरने 3 बळी घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आणि भारतासाठी विश्वचषक जेतेपदाचे दरवाजे सताड उघडे झाले. न्यूझीलंडचा एकेक गड नंतर ढासळत गेला आणि एकवेळ अशीही आली, ज्यावेळी विजयश्री भारताला म्हणाली, शूरा मी वंदिले!

धनाजीचा घोडा मुसलमानांना पाण्यात दिसायचा म्हणे! तसे पुढील काही दिवस न्यूझीलंडच्या अख्ख्या संघाला आता सॅमसन, अभिषेक, इशान आता पाण्यात दिसतील. शेन वॉर्न एकदा बोलून गेला होता, मला स्वप्नातही पुढे सरसावत षटकार खेचणारा सचिन दिसतो. आता न्यूझीलंडच्या खेळाडूंना हर एक षटकात 20 धावांची कत्तल करू पाहणारे भारतीय फलंदाज दिसतील.

प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठीदेखील हा विजय अगदी हवाहवासा! खोलीभर सुगंध पसरण्यासाठी अत्तराची सगळी कुपी नाकात भरावी लागत नाही. अगदी एक फायादेखील त्यासाठी पुरेसा असतो. तसेच या विश्वचषक जेतेपदाच्या यशाचे आहे. अभिषेक, सॅमसन, इशानची फटकेबाजी व अक्षर-बुमराहची गोलंदाजी भारतासाठी सुगंध पसरवणारे फाया ठरले.

एकवेळ अशी होती की, गंभीर संघाच्या अपयशाने सातत्याने टीकेचे धनी होत होते. त्यांची कुठलीच रणनीती औषधाची मात्रा ठरत नव्हती; पण खेळपट्टीवरची चिकाटी त्यांनी प्रशिक्षणातही कायम ठेवली. संघबांधणीवर जोर दिला. कधी राहुलभाई (द्रविड), तर कधी व्हीव्हीएस लक्ष्मणची त्याला मोट बांधली. मजल दरमजल प्रवास करत गेले आणि रविवारचा दिवस असाही आला, ज्यावेळी यशश्रीने जेतेपदाची माळ भारताच्या गळ्यात घातली. रंगपंचमीच्या दिवशी देशभरात दिवाळी साजरी झाली.‌‘लहरा दो, लहरा दो‌’ हा नारा देशभरात गुंजला.

विजयाच्या अखेरच्या क्षणी खेळाडूंच्या चेहऱ्यावरून ओसंडून जाणाऱ्या आनंदरेषा खऱ्याअर्थाने समस्त भारतीयांच्या भावनांचे प्रतिबिंब ठरल्या. हा विजय ट्रॉफीचा तर होताच; त्याहीपेक्षा जिद्दीचा आणि सांंघिकतेचा होता. कधी बुमराह, कधी पंड्या, कधी इशान तर कधी सॅमसन संघाच्या मदतीला धावून येत गेले आणि एकेक गड सर करून देत गेले. कधी निराशेची सावली, कधी आशेचा किरण अशा मजल दरमजल प्रवासात भारताने जेतेपदाची मजल मारली. भारताने विश्वचषक जिंकताच खेळाडूंच्या डोळ्यांत साठलेले अश्रू विजयाची दास्ताँ सांगणारे होते. जिद्दीने, प्रचंड तडफेने आणि लढवया बाण्याने खेचून आणलेल्या विजयाची दास्ताँ! ब्रेव्हो इंडिया!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news