

सुलोचनादीदी चित्रपटाची निवड करण्याआधी संपूर्ण कथानक वाचून काढत असत. साकारणार असलेल्या व्यक्तिरेखेसंदर्भात भवतालातलं निरीक्षण करत. चित्रीकरणादरम्यान हळूहळू त्यांच्यातील सुलोचना मागे पडायची आणि त्या भूमिकेत समरसून जायच्या. दीदींनी मराठीचा सुवर्णकाळ, पडझड सगळं काही पाहिलं. मराठी चित्रपटांचा जाणता, कळता होत गेलेल्या प्रवासाच्या साक्षीदार आणि वाटेकरी असल्याबाबत त्या सदैव कृतार्थ भाव व्यक्त करायच्या. त्या पडद्यावर जशा होत्या, तशाच प्रत्यक्ष आयुष्यातही…
आम्हा सर्व कलावंतांच्या सुलोचना'दीदीं'च्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीतील एक वात्सल्यसिंधू हरपली आहे. दीदींच्या सहवासातील अनेक क्षण, दुधावरच्या सायीसारखे त्यांचे मायेचे शब्द, पाठीवरून फिरलेला त्यांचा कौतुकाचा आणि आशीर्वादाचा हात, असे किती तरी मौल्यवान क्षण त्यांच्या जाण्याचे वृत्त ऐकल्यानंतर मनात आठवू लागले. सहा दशकांहून अधिक काळ आपल्या सहजसुंदर अभिनयाने दीदींनी रसिकमनावर मोहिनी घातली. 'एकटी', 'वहिनीच्या बांगड्या' अशा पूर्वीच्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आई, बहीण अशा भूमिका केल्या. ऐतिहासिक चित्रपटांमधूनही त्यांनी काम केले. नायिकेच्या भूमिकेतही त्यांना मराठी रसिक प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती. पडद्यावरील अभिनयामुळे त्या महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाचा जणू एक भाग बनल्या.
आपल्या घरातील आई, वहिनी, बहीण अशा अनेक रूपांमध्ये महाराष्ट्राने त्यांच्यावर प्रेम केले. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्या अनेक आघाडीच्या नायकांच्या आई बनल्या. पृथ्वीराज कपूरपासून राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर या कपूर खानदानातील दुुसर्या पिढीबरोबरही त्यांनी काम केलं. दिलीपकुमारपासून अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत अनेक नायकांची 'माँ' म्हणून सुलोचनादीदी प्रत्येक प्रेक्षकाला भावल्या. त्यांच्या चेहर्यावरील समईच्या शुभ्र कळ्यांसारखे तेजस्वी भाव, सात्त्विकता यामुळे आपल्याच घरातील ही गृहिणी असल्याचा भास प्रत्येकाला झाला. त्यांच्या या सहजसुंदर अभिनयामुळे हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकांनी दीदींवर मनापासून प्रेम केलं. दीदी या खर्या अर्थाने 'महाराष्ट्रकन्या' होत्या. कोल्हापूरजवळच्या खडकलाट या छोट्याशा गावी जन्मलेल्या दीदींनी ज्या तन्मयतेने आणि ज्या निष्ठेने कारकिर्दीचा प्रवास केला, तो अचंबित करणारा होता. त्यांच्या जन्मगावाच्या नावात 'खडक' असला, तरी दीदींच्या व्यक्तिमत्त्वात मात्र मायेचा ओलावा आणि हृदयात वात्सल्याचा झरा होता. याची प्रचिती मी अनेकदा घेतली आहे.
दीदींबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्यच समजते. त्यांच्याबरोबर 'सतीची पुण्याई' या चित्रपटात मी भूमिका केली. त्यावेळी त्यांच्या स्वभावातील कोमलता, ऋजुता याचा अनुभव मी अनेकदा घेतला. नंतरच्या काळातही दीदींकडून होणार्या मायेच्या वर्षावाची मी धनी झाले. सुलोचनाबाई या आम्हा सर्व कलावंतांच्या 'आई'च होत्या. आईने आपल्या मुलीवर करावी तशी त्यांनी माझ्यावर माया केली. कलाकार म्हणून सुलोचनाबाई ग्रेट होत्या. त्या चित्रपटाच्या पदड्यावर दिसल्या तशाच प्रत्यक्षातही. पडद्यावर त्यांनी वात्सल्यमूर्ती आईच्या अनेक भूमिका रंगवल्या. त्यांना प्रत्यक्ष भेटतानाही या वात्सल्याचा अनुभव अनेकदा मला आला. या वात्सल्याबरोबरच त्यांच्या स्वभावातील कणखरपणाही जाणवण्यासारखा होत्या. आमच्यासारख्या कलावंतांना दीदींनी मोठे संस्कार दिले. कलाकार कितीही मोठा असला, तरी त्याने कसं साधं राहायला हवं, याचा वस्तुपाठच सुलोचनाबाईंनी घालून दिला. कलाकारांना प्रोत्साहन देण्याची आणि एखादी गोष्ट समजावून सांगण्याची त्यांची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण होती. मला तर त्या आईसारख्याच आहेत. मी साकारलेल्या अनेक भूमिकांचं सुलोचनाबाई नेहमीच कौतुक करत. एखादी गोष्ट चुकत असे तेव्हा त्यांच्याच भाषेत समजावून सांगत.
सुलोचनादीदींची अभिनयाबाबत एक विशिष्ट अशी कार्यपद्धती ठरलेली होती. कोणत्याही चित्रपटाची निवड करण्याआधी त्या चित्रपटाची कथा पूर्णपणाने वाचून काढत असत. त्यातील त्यांच्या वाट्याला आलेली भूमिका कुणाची आहे, हे लक्षात घेत असत. यानंतर आपण साकारणार असलेल्या व्यक्तिरेखेसंदर्भात भवतालातलं निरीक्षण सुरू करत. लग्न झालेल्या बाईची भूमिका करायची असेल, तर दागिने नेमके कुठले लागतात, विधवा स्त्रीची भूमिका असेल तर साधेपणा म्हणजे नेमकं काय हवं, या बारीकसारीक मुद्द्यांविषयी त्यांच्या मनात विचारचक्र सुरू व्हायचं. हळूहळू काम करता करता त्यांच्यातील सुलोचना मागे पडायची आणि भूमिकेत समरसून जायच्या. सुलोचनादीदींनी मराठीचा सुवर्णकाळ, पडझड सगळं काही पाहिलं. मराठी चित्रपटांचा जाणता, कळता होत गेलेल्या प्रवासाच्या साक्षीदार आणि वाटेकरी असल्याबाबत त्या सदैव कृतार्थ भाव व्यक्त करायच्या.
माझ्या आईचेही सुलोचनाबाईंशी स्नेहाचे संबंध होते. आईची एखादी गोष्ट मी ऐकेनाशी झाले की, ती लगेच सुलोचनाबाईंना सांगत असे. तिला माहीत होतं भालजी पेंढारकर, चारुदत्त सरपोतदार आणि सुलोचनादीदी यांचा शब्द मी खाली पडू देणार नाही. त्यामुळे आईची एखादी गोष्ट मी ऐकली नाही, तर ती सुलोचनाबाईंना सांगायची; मग आईने आपल्या मुलीला सांगावं तशा सुलोचनाबाई मला म्हणायच्या, 'आशा, अगं तू एवढी चांगली मुलगी. आईचं का ऐकत नाहीस? मला त्या समजावून सांगायच्या. आता माझी आई हयात नाही. ती गेली तेव्हा सुलोचनाबाई मला भेटायला आल्या होत्या. आईच्याच मायेने त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. आई गेल्यावर सुलोचनाबार्ईंचाच मला मोठा आधार वाटला होता; पण ही मायेची ऊबही आता हरपली आहे.
भालजी पेंढारकर (बाबा) यांच्या तालमीत सुलोचनाबाई तयार झाल्या. भालजींनाच त्या आपले गुरू मानत. 'मराठा तितुका मेळवावा' या चित्रपटामध्ये सुलोचनादीदींनी राजमाता जिजाऊंची व्यक्तिरेखा साकारली होती. भालजी पेंढारकर त्यांना मार्गदर्शन करायचे. याबाबतचा एक किस्सा त्या सांगत असत.
या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुरुवातीला दीदींनी खूप आत्मविश्वासाने काम केले; पण नंतर मध्येच त्या खचून गेल्या. आपण ही भूमिका पेलू शकत नाही, असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे नकार देण्याचा निर्णय घेऊन त्या बाबांपाशी गेल्या; पण त्यांचे म्हणणे ऐकून भालजी पेंढारकर चांगलेच रागावले.
हातात घेतलेले काम असे सोडून कसे चालेल, तुला जमतंय की नाही हे ठरवणारी तू कोण, अशा शब्दांत त्यांनी दीदींची कानउघाडणी केली होती; पण यातून त्यांचं मन वळवण्याचा बाबांनी प्रयत्न केला. पुढे हा चित्रपट अतिशय गाजला आणि दीदींच्या भूमिकेचेही कौतुक झाले. या चित्रपटामुळे माझ्यातली सुलोचना खर्या अर्थाने घडली, असे त्या सांगत. इतकेच नव्हे, तर या भूमिकेबद्दल स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्याला सोन्याचा नेकलेस भेट म्हणून दिल्याची हृद्य आठवण त्या सांगत. भालजी पेंढारकर हे माझेही गुरू असल्यामुळे आम्हा दोघींतील स्नेहबंध अधिक फुलले. चित्रपटांमध्ये सुलोचनाबाईंनी ज्या प्रकारच्या भूमिका साकारल्या तशाच सोज्वळ भूमिका माझ्याही वाट्याला आल्या. महाराष्ट्राची ताई म्हणून मला ओळखलं जाऊ लागलं; पण 'सुलोचना' शतकात एकदाच होऊ शकते. दीदी आयुष्य अत्यंत सकारात्मकतेनं जगल्या. जीवन हे सकारात्मकतेनं जगण्यासाठी आहे, कोणत्याही नैराश्याला त्यात थारा असता कामा नये, यश हे मेहनतीच्या मागून येतं, अशी विचारांची खूप मौलिक शिदोरी दीदींनी अनेकांना दिली. त्यांच्या सावलीवर पाय ठेवून चालता आलं तरी आपण स्वत:ला नशीबवान समजायला हवं.
आशा काळे,
ज्येष्ठ अभिनेत्री